महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या बारामतीमधील इंग्लिश मिडियम स्कूलचे म.ए.सो. हरिभाऊ गजानन देशपांडे इंग्लिश मिडियम स्कूल असे नामकरण माजी केंद्रीय मंत्री आणि मएसोचे माजी विद्यार्थी मा. श्री. शरद पवार यांच्या हस्ते सोमवार, दि. ५ नोव्हेंबर २०१८ रोजी करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर राज्याचे माजी उपमुख्यमंत्री मा. श्री. अजित पवार, म.ए.सो.चे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), उपाध्यक्ष मा. श्री. प्रदीप नाईक, संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष मा. श्री. राजीव सहस्त्रबुद्धे, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे, कै. हरिभाऊ देशपांडे यांचे जेष्ठ चिरंजीव श्री. अजितराव देशपांडे, संस्थेच्या नियामक मंडळाचे सदस्य व शाला समितीचे अध्यक्ष अडव्होकेट धनंजय खुर्जेकर, शाळेचे महामात्र प्रा.गोविंद कुलकर्णी, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सोनाली क्षीरसागर उपस्थित होते. या कार्यक्रमाला सौ. प्रतिभाताई पवार, खासदार सौ. सुप्रियाताई सुळे, डॉ. रजनीताई इंदुलकर, म.ए.सो.च्या नियामक मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. माधव भट, साहाय्यक सचिव प्रा. सुधीर गाडे, शाळा समितीचे सदस्य प्रा. सुधीर भोसले व श्री. बाबासाहेब शिंदे, स्थानिक सल्लागार समितीचे सर्व सदस्य, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सचिन आंबर्डेकर तसेच सर्व पवार व देशपांडे कुटुंबीय आवर्जून उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना मा. शरद पवार म्हणाले की, “ शाळेत उत्तम शिक्षक आणि मुख्याध्यापक यांची योजना करण्याबरोबरच शिक्षक व पालक यांच्यातील सुसंवाद ही महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची परंपरा आहे. बारामतीतील अनेक पिढ्या घडवण्याचे काम संस्था अविरतपणे करत आहे. हरिभाऊ देशपांडे देखील याच मुशीत घडले. शिक्षणाच्या विस्तारासाठी त्यांनी मुक्तहस्ते दानदेखील दिले. बारामतीमधील सामाजिक, शैक्षणिक कार्यामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असायचा. आपली संपत्ती समाजासाठी देण्याची इच्छा त्यांनी प्रत्यक्षात उतरवून दाखवली. अशा हरिभाऊ देशपांडे यांचे नाव या शाळेला देण्यात आले याचा मला आनंद आहे. म.ए.सो.च्या शाळेत मला देखील उत्तम संस्कार आणि शिस्तीचे धडे मिळाले. मी जीवनाच्या विविध क्षेत्रात यशस्वी झालो, याचे श्रेय माझी शाळा व माझी आई यांना आहे. आम्हा तीन भावडांना ‘पद्म’ पुरस्कार मिळाले आहेत. एकाच आईच्या तीन मुलांना आणि ‘मएसो’च्या एकाच शाळेतील तीन माजी विद्यार्थ्यांना ‘पद्म’ पुरस्काराने गौरवण्यात आले याचा अभिमान वाटतो.” कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळा समितीचे अध्यक्ष मा. धनंजय खुर्जेकर यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, “वाढती विद्यार्थी संख्या आणि कालानुरुप शिक्षण पद्धती यांचा मेळ घालण्यासाठी शाळेच्या वास्तुचा विस्तार करण्यात आला आहे. स्वावलंबी आणि कौशल्ययुक्त पिढी घडवण्यासाठी शाळेत सातत्याने विविध उपक्रम सुरु असतात. कै. हरिभाऊ देशपांडे यांच्या दातृत्वामुळेच हे शक्य झाले आहे, त्यामुळे त्यांचे ऋण कधीही फेडता येणार नाहीत.” अजित देशपांडे आपल्या आठवणींना उजाळा देताना म्हणाले की, “ देशपांडे कुटुंबीय आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी यांच्यातील संबंध घनिष्ट आहेत. शाळेतील गुरुजनांनी आपले कर्तव्य चोखपणे बजावले त्यामुळेच आम्ही सर्व भावंडे आणि शाळेतील विद्यार्थी घडलो. माझे वडील हरिभाऊंचे वर्णन ‘पाण्या तुझा रंग कसा, ज्याला जसा हवा तसा’ असे करता येईल. त्यांना कलाकारांबद्ल अतिशय जिव्हाळा होता. भाऊंच्या सामाजिक कार्यात मा. शरद पवार यांचे सहकार्य असायचे, त्या दोघांचे संबंध अत्यंत स्नेहपूर्ण होते. वडिलांकडून मला आवाजाची देणगी मिळाली, त्यामुळेच मी आकाशवाणी आणि दूरदर्शन सारख्या माध्यमांमध्ये यशस्वी होऊ शकलो.” कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) म्हणाले की, “बारामतीकरांचे म.ए.सो. वर खूप प्रेम आहे, त्यामुळेच येथील संस्थेच्या शाळा प्रगती करत आहेत. हरिभाऊ देशपांडे यांच्या दातृत्वातूनच ही शाळा उभी राहिली आहे. त्यांनी आईची भूमिका पार पाडली आहे, त्यांचे आशीर्वाद शाळेच्या पाठीशी आहेत. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना देशाचे सक्षम नागरिक बनवण्याची जबाबदारी आता शाळेवर आहे आणि अशाप्रकारे सक्षम झाल्यावरच शाळेतील विद्यार्थ्यांना मा. हरिभाऊ देशपांडे यांच्या कार्याची महती कळेल. पुढील पिढी घडविण्याची जबाबदारी आपल्या सर्वांचीच आहे आणि त्यासाठी तुमच्या सर्वांच्या मार्गदर्शनाची गरज आहे.” शाळेचे महामात्र प्रा. गोविंद कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सोनाली क्षीरसागर यांनी आभार प्रदर्शन केले. शाळेतील विद्यार्थिनींनी कार्यक्रमाच्या प्रारंभी ‘मएसो गीत’ व शेवटी पसायदान सादर केले.