अवघ्या महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी, अभिजात कलांची खाण आणि विद्येचे माहेरघर असलेल्या आपल्या पुण्यनगरीमध्ये, तिचा विशेषपणा जपण्यात आणि तो वाढविण्यात गेली, दीडशे वर्षांहूनही अधिक कालावधी शिक्षण क्षेत्रात अग्रगण्य असलेली संस्था म्हणजेच महाराष्ट्र एजुकेशन सोसायटी येत्या १९ नोव्हेंबरला १६० वर्षे पूर्ण करीत आहे. मी स्वतः इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतचे शिक्षण महाराष्ट्र एजुकेशन सोसायटीच्या बाल शिक्षण मंदिर, मराठी माध्यम शाळेतून तर इयत्ता पाचवी ते दहावीचे शिक्षण महाराष्ट्र एजुकेशन सोसायटीच्याच सौ. विमलाबाई गरवारे प्रशालेतून पूर्ण केले आहे. इ. दहावीची दुसरी सहामाही खूपच भावनाशील होती. इ. ११ वी व १२ वी चे शिक्षण मी आबासाहेब गरवारे महाविद्यालयात घेतले. आयुष्यातले ते फुलपंखी दिवस आजही जसेच्या तसे डोळ्यांसमोर उभे राहतात आणि आपण जे काही आहोत त्याची मुळे किती खोलवर आपल्याला शाळेतून मिळालेल्या संस्कारांमध्ये आहेत याची जाणीव होते.

मला आठवतंय, मी १९७५ साली सौ. विमलाबाई गरवारे प्रशालेमध्ये प्रवेश घ्यायला आले त्या वेळेस हॉलमध्ये असलेल्या १९६१ च्या पूररेषेच्या पातळीची आठवण करून देणाऱ्या खुण-रेषेने माझं लक्ष वेधलं आणि त्यानंतरही शाळा सुस्थितीत असल्याचं आश्चर्य आणि अशा शाळेमध्ये प्रवेश घेत आहोत याचा आत्मीय अभिमान माझ्या बालमनाला त्यावेळी कमालीचा जाणवत होता. शाळेचं ग्रंथालय उत्तमोत्तम ग्रंथ संपदेने नटलेलं होतंच, शिवाय सुसज्ज प्रयोगशाळेमध्ये मुक्त विहार करावयाची मुभाही होती. एकत्र शिक्षण असल्यामुळे आम्हा मुला-मुलींमध्ये मार्क्स मिळविण्यासाठी कायम निकोप स्पर्धा असायची.

विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी म्हटले आहे …

“विद्येनेच मनुष्या आले श्रेष्ठत्व या जगामाजी

न दिसे एकही वस्तू विद्येने असाध्य आहे जी” 

शाळेमध्ये अशी विद्या आणि संस्कार रुजविण्यासाठी ज्या ऋषितुल्य शिक्षक वृन्दाचे बहुमूल्य मार्गदर्शन आणि अनमोल सहवास लाभला तो आम्हा विद्यार्थ्यांसाठी अतुलनीय ठेवाच आहे. आमचे अत्रे सर सुंदर अक्षरात संपूर्ण फळ्याचा वापर करायचे. त्यांच्या स्पष्ट आणि करारी आवाजात ज्या पद्धतीने ते इतिहास शिकवायचे त्यातील प्रसंग प्रत्यक्ष डोळ्यांसमोर उभे रहायचे. संस्कृत भाषेची आणि विषयाची अवीट गोडी मेधा ओक बाईंकडून मिळाली, तर विज्ञानाचे केळकर सर दैनंदिन जीवनातले सोपे प्रयोग करायला शिकवायचे. त्यामुळे विज्ञान विषयही आवडायचा. शाळेमध्ये खेळालाही तितकेच महत्व होते. एके वर्षी तर काही अपरिहार्य कारणामुळे शाळेचा वार्षिक स्नेहसमारंभ अचानक रद्द झाला, त्यावेळी गुरुवर्य प्र. ल. गावडे सरांनी अतिशय संयमाने ज्या पद्धतीने आणि कौशल्याने ती परिस्थिती हाताळली त्यावरून अशा कठीण परिस्थितीमध्ये कशाप्रकारे निर्णय घ्यावेत याचा परिपाठच आम्हा विद्यार्थ्यांना मिळाला. मी आठवीत असताना शिक्षकांचा दीर्घकाळ संप सुरु होता, परंतू  संपानंतर जेव्हा शाळा सुरु झाली तेव्हा सर्व शिक्षकांनी शाळेव्यतिरिक्त थांबून संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण केला आणि विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान होवू दिले नाही. त्यावेळेस मात्र माझा अत्यंत आवडता विषय ‘बागकाम’ मात्र करता आले नाही. अशा अनेक आठवणी आहेत त्या मंतरलेल्या दिवसांच्या ज्याने उर भरून येतो, मन भूतकाळात रमून जाते.

मी पुण्याची महापौर झाल्यानंतर शाळेतल्या माझ्या १९८० च्या बॅचने आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने माझं कौतुक केलं. त्या समारंभाला माझे सर्व मित्र-मैत्रिणी आणि मला शिकविणारे जवळपास सर्वच शिक्षकवृंद उपस्थित होते. आम्हा सर्वाना अत्यंत आदरणीय असणाऱ्या गुरुवर्य गावडे सरांनी त्या वेळेच्या आठवणींना उजाळा दिला. माझ्या मित्र-मैत्रिणींनी, माझ्या शिक्षकांनी आणि माझ्या शाळेने दिलेल्या या कौतुकाच्या थापेमुळे आणि माझ्यावर व्यक्त केलेल्या विश्वासामुळे मी अधिक उत्साहाने व जोमाने काम सुरु केले. माझ्या आयुष्यातला तो अतिशय आनंदाचा आणि महत्वपूर्ण दिवस होता. जेव्हा-जेव्हा मला निराश झाल्यासारखं वाटतं त्या वेळेस ज्यांच्या पुस्तकांचा मला आधार असतो त्यांनी, भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी म्हटले आहे,

“It is a shame to dream small, even when we have  the potential to do something great and noteworthy.”

खऱ्या अर्थाने माझ्या शाळेने व ‘मएसो’च्या प्रत्येक एककाने माझ्यासारख्या असंख्य विद्यार्थ्यांना त्यांच्यातील क्षमता आणि सुप्त गुण ओळखून फक्त मोठी स्वप्नेच पहायला शिकवली नाहीत तर ती स्वप्ने पूर्ण करायला, उंच भरारी घ्यायला आमच्या पंखातही  बळ दिले. त्यामुळेच मानसशास्त्रातून एम. ए. ची पदवी संपादन केल्यानंतर तेवढ्यावरच न थांबता मी जर्मन भाषेचे शिक्षण घेतले, पत्रकारिता अभ्यासक्रम पूर्ण केला आणि एम.बी. ए. ची पदवीही मिळवली. “हाती घ्याल ते तडीस न्या” हा माझ्या गुरुजनांनी दिलेला वसा जपताना आणि जगताना राजकारणात प्रवेश केला आणि अनेक समाजोपयोगी कामे मार्गी लावली याचं समाधान वाटतं. खास महिला सक्षमीकरणासाठी ११२ कोटी रुपयांचं बजेट उपलब्ध करून दिलं.

आज महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या विस्तारलेल्या ज्ञानवृक्षाच्या छायेत हजारो विद्यार्थी ‘केजी टू पीजी’ शिक्षण घेत आहेत आणि विश्वसंचारी झेप घेत आहेत. खऱ्या अर्थाने राष्ट्रप्रेमी, सुसंस्कृत, समाजाभिमुख, सुजाण नागरिक निर्माण करणाऱ्या आणि आपले ‘क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे’ हे ब्रीदवाक्य सार्थ ठरवणाऱ्या महाराष्ट्र एजुकेशन सोसायटीला दैदिप्यमान अशा निरंतर वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

Scroll to Top
Skip to content