७७ वा  प्रजासत्ताक दिन शिस्तबद्धतेने आणि उत्साहाच्या वातावरणात साजरा

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शाखांमध्ये ७७ वा प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांद्वारे, शिस्तबद्धतेने आणि उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला.

सासवड येथील मएसो वाघिरे विद्यालयाच्या आवारात झालेल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म.ए.सो. च्या नियामक मंडळाचे मा. अध्यक्ष श्री. बाबासाहेब शिंदे होते. या वेळी प्रशालेचे जेष्ठ सेवक श्री. हनुमंत कारके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर राष्ट्र गीत, राज्य गीत यांचे गायन झाले आणि संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) छात्रांच्या संचलनाने आणि मानवंदनेने शालेय परिसरात देशभक्तीमय वातावरण निर्माण झाले. पूर्व-प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तिपर गीत, प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी लेझीमचे प्रात्यक्षिक, इंग्लिश मिडीयमच्या विद्यार्थ्यांनी टटिंग नृत्य तसेच बालवाडी ते इयत्ता ९ वी च्या विद्यार्थ्यांनी मल्लखांबावरील विविध प्रात्यक्षिके सादर केली.

मा. श्री. बाबासाहेब शिंदे यांनी उपस्थित विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक यांच्यासाठी पाच संकल्प सांगितले. तसेच शिस्त, स्वच्छता आणि प्रामाणिकपणा हे आचरणात आणले तर स्वतःची, राज्याची आणि  देशाची प्रगती होईल असे ते म्हणाले.

मराठी माध्यमाच्या पूर्व-प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच इंग्रजी माध्यमाची शाळा अशा पाचही शाखा या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. शाळांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, अनेक माजी विद्यार्थी आणि पालक या कार्यक्रमाला उपस्थित होते.

म. ए. सो. मुलांचे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील (पूर्वीचे भावे स्कूल) कार्यक्रमाला शाळेतील १९७१ च्या बॅचचे माजी विद्यार्थी असलेले एअर व्हाईस मार्शल किरण प्रभाकर पळसुले व्हीएसएम (निवृत्त) हे प्रमुख पाहुणे होते. त्यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. सदर कार्यक्रमास शाला समितीचे मा. अध्यक्ष डॉ. दिलीप शेठ, महामात्र श्री. सुधीर गाडे, शाळेचे पदाधिकारी, पालक, आजी-माजी विद्यार्थी, शाळेच्या परिसरातील नागरिक मोठ्या  संख्येने उपस्थित होते. यानिमित्ताने सामुदायिक कवायत व विद्यार्थ्यांची विविध प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. तसेच सर्व उपस्थितांनी साक्षरतेची प्रतिज्ञा घेतली.

म. ए. सो. बाल शिक्षण मंदिर, डेक्कन जिमखाना शाळेत ज्येष्ठ शिक्षिका सौ. प्रमिला कांबळे व सौ. विद्या शिरोडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शाला समितीच्या महामात्रा डॉ. अश्विनी पाटील उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रस्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मोनिका खेडलेकर यांनी केले. त्यांनी विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व समजावून सांगितले. प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांनी कवायत, लेझीम, डंबेल्स, सूर्यनमस्कार व तायक्वांदो यांची प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांनी अतिशय उत्तमप्रकारे सादर केली. पूर्व-प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी “नन्हा मुन्ना राही हूं” या देशभक्तीपर गीतावर उत्कृष्टतेने नृत्य सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली. शाळेतील विद्यार्थी रियांश हिंगमिरे व आरोह सातव यांनी मराठी व इंग्रजीमध्ये प्रजासत्ताक दिनाची माहिती सांगितली. शाळेतील शिक्षिका सौ. रोहिणी पवार यांनी दिल्लीतील कर्तव्यपथावरील प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यातील संचलनाची तसेच महाराष्ट्राच्या चित्ररथाची माहिती विद्यार्थ्यांना सांगितली. शाला समितीच्या महामात्रा डॉ. अश्विनी पाटील यांनी ‘आत्मनिर्भर भारत’ होण्यासाठी छोट्या मुलांनी काय करणे अपेक्षित आहे, याची माहिती दिली. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या समूहगीतातून वातावरणात अधिकच जोश निर्माण झाला. ‘भारत माता की जय’ या घोषणांनी कार्यक्रमाची सांगता झाली.

म. ए. सो. सौ. विमलाबाई गरवारे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात ज्येष्ठ शिक्षिका सौ. भारती कुंभार व प्रमुख पाहुणे ज्येष्ठ मराठी साहित्यिक कै. व्यंकटेश माडगूळकर यांचे सुपुत्र श्री. मोहन व्यंकटेश माडगूळकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. शाला समितीचे मा. अध्यक्ष श्री. अजय पुरोहित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. शाळेचे महामात्र डॉ. निर्भय पिंपळे यावेळी उपस्थित होते. घोष पथकातील विद्यार्थ्यांनी वंशीवर राष्ट्रगीत सादर करून वातावरण भारावून टाकले. त्यानंतर ध्वजगीत सादर करण्यात आले. एन. सी. सी. च्या विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध संचलन करून पाहुण्यांना मानवंदना दिली. प्रशालेतील शिक्षक श्री. अनंत कुलकर्णी यांनी भारतीय संविधानाच्या हस्तलिखिताची माहिती दिली व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते भारतीय संविधानाच्या हस्तलिखिताचे प्रकाशन करण्यात आले. मा. श्री. मोहन व्यंकटेश माडगूळकर यांनी विद्यार्थ्यांना मराठी शाळेत शिक्षण घेत असल्याचा अभिमान बाळगण्याचा संदेश दिला. मा. श्री. अजय पुरोहित यांनी “भारत माझा देश आहे” या भावनेचा विसर पडू न देण्याची व आपण विकसित भारताच्या दिशेने वाटचाल करत असल्याची जाणीव ठेवण्याविषयी प्रेरणादायी विचार मांडले. इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी साधन कवायत, तर एन.सी.सी.च्या विद्यार्थ्यांनी आपत्कालीन परिस्थितीत जखमी जवानांना सुरक्षित ठिकाणी नेण्याचे प्रात्यक्षिक सादर केले. इयत्ता आठवीच्या विद्यार्थिनींनी या वेळी प्रेरणादायी गीत सादर केले. उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनींनी लेझीम पथकाचे सादरीकरण करून कार्यक्रमात रंगत भरली.

म. ए. सो. चे. कै. ग. भि. देशपांडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, बारामती येथे झालेल्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बारामती जिल्ह्याचे मा. संघचालक श्री. दिपक पेशवे उपस्थित होते. कोल्हापूर येथील विभागीय मंडळातील शिक्षण उपसंचालक मा. श्री. राजेश क्षीरसागर, बारामती पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी मा. श्री. निलेश गवळी तसेच प्रशालेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित अत्यंत उत्साहात संपन्न झाला. मा. श्री. दिपक पेशवे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आल्यानंतर राष्ट्रगीत, ध्वजगीत, महाराष्ट्र गीताचे सादरीकरण व संविधानाचे वाचन झाले. एन. सी. सी., आर. एस. पी., स्काऊट व गाईड यांच्या पथकांनी घोष पथकाच्या साह्याने प्रमुख पाहुणे व पदाधिकाऱ्यांना मानवंदना दिली. त्यानंतर विविध स्पर्धांत प्राविण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प व पुस्तक देऊन पाहुण्यांच्या हस्ते गौरवण्यात आले.

म.ए.सो.चे सौ.निर्मला हरिभाऊ देशपांडे विद्यालय, बारामती यांनी म.ए.सो.च्या क्रीडावर्धिनीतर्फे आयोजित मएसो क्रीडा करंडक स्पर्धेत विविध खेळात यश संपादन केले. या सर्व खेळातील खेळाडूंना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पदक देऊन गौरविण्यात आले.  त्यानंतर पूर्व प्राथमिक विभागाचे “ऑपरेशन सिंदूर” वर आधारित देशभक्तीपर गीत, प्राथमिक विद्यालयाचे सूर्यनमस्कार, माध्यमिक विद्यालयाचे एन.सी.सी.चे “शौर्य, अनुशासन, धैर्य” यावर आधारित प्रात्यक्षिक, लेझीम प्रात्यक्षिक, सर्व विद्यार्थ्यांचे कवायत प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.

म. ए. सो. हरिभाऊ गजानन देशपांडे इंग्लिश मिडीयम स्कूल, बारामती येथे भारतीय नौसेनेतील अधिकारी श्री. संतोष तोडकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शाला समितीचे मा. अध्यक्ष श्री. अजय पुरोहित, महामात्र डॉ. श्री. गोविंद कुलकर्णी आणि मएसोच्या नियामक मंडळाचे सदस्य मा. श्री. राजीव देशपांडे, स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य मा. श्री. पी. बी. कुलकर्णी हे उपस्थित होते.    कार्यक्रमाची सुरुवात ध्वजवंदनाने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध संचलन सादर केले. इ. ५ वी व ६ वी च्या विद्यार्थ्यांनी मानवी मनोरे सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

म. ए. सो. ज्ञान मंदिर व म. ए. सो. पब्लिक स्कूल, कळंबोली येथे प्रमुख पाहुणे म्हणून नवी मुंबई विमानतळाचे इमिग्रेशन पोलीस निरीक्षक श्री. दिपक आबाजी कदम उपस्थित होते. त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आल्यानंतर विद्यालयातील गायक वृंदाने राष्ट्र गीत, ध्वज गीत व राज्य गीत सादर केले. त्यानंतर आर. एस. पी.च्या विद्यार्थ्यांनी संचलन सादर केले. या संचलनानंतर विद्यार्थ्यांची शालेय परिसरातून रॅली काढण्यात आली. या कार्यक्रमात दोन्ही विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी कवायत, एरोबिक्स, सूर्यनमस्कार व लेझीम इत्यादींचे सादरीकरण केले. देशभक्तीपर गीते व स्फूर्तीदायक भाषणे यावेळी सादर करण्यात आली. म. ए..सो. क्रीडा करंडक विजेत्या खेळाडूंचे व इतर बक्षीस प्राप्त विद्यार्थ्यांचेही यावेळी कौतुक करण्यात आले.

मएसो ज्ञानमंदिर, कळंबोलीने पटकवला ‘मएसो क्रीडा करंडक २०२६’

आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू तेजल हसबनीस यांच्या हस्ते बक्षीस वितरण

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या मएसो क्रीडावर्धिनी आणि कोथरूड येथील मएसो बालशिक्षण मंदिर इंग्लिश मिडीयम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘मएसो क्रीडा करंडक २०२६’ या राज्यस्तरीय आंतरशालेय क्रीडा स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद मएसो ज्ञानमंदिर, कळंबोली या शाळेने पटकावले. स्पर्धेचे हे १४ वे वर्ष होते.

प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ही तीन दिवसीय निवासी क्रीडा स्पर्धा मएसो बालशिक्षण मंदिर इंग्लिश मिडीयम स्कूल, मयूर कॉलनी कोथरूड येथे पार पडली. स्पर्धेचे बक्षीस वितरण रविवार, दि. २५ जानेवारी २०२६ रोजी आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू तेजल हसबनीस यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी ‘मएसो’चे मा. उपाध्यक्ष श्री. प्रदीप नाईक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

‘मएसो’च्या नियामक मंडळाचे मा. अध्यक्ष श्री. बाबासाहेब शिंदे, मएसो क्रीडावर्धिनी व शाला समितीचे मा. अध्यक्ष श्री. विजय भालेराव, ‘मएसो’चे सचिव डॉ. अतुल कुलकर्णी, सहाय्यक सचिव सुधीर भोसले, शाला समितीच्या महामात्र डॉ. नेहा देशपांडे, मुख्याध्यापिका अदिती कुलकर्णी, मंजुषा दुर्वे, सायली देशमुख यांच्यासह संस्थेचे व शाळेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

मा. श्री. बाबासाहेब शिंदे यांनी स्वागत-प्रास्ताविक केले.

‘मएसो क्रीडा करंडक २०२६’ साठी मुले व मुली या गटांत सूर्यनमस्कार, लंगडी, डॉजबॉल आणि गोल खो-खो या खेळांच्या सांघिक मैदानी स्पर्धा घेण्यात आल्या. त्यामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या खेळाडूंना सांघिक व वैयक्तिक बक्षिसे देण्यात आली.

या प्रसंगी मा. तेजल हसबनीस म्हणाल्या, “विद्यार्थ्यांमध्ये लहान वयापासून क्रीडासंस्कृती रुजविण्यासाठी अशा स्पर्धा महत्वाच्या असतात. त्यांच्यात संघभावना, शिस्त, प्रामाणिकपणा, आत्मविश्वास आणि खेळाडूवृत्ती विकसित होते. चांगला माणूस होण्यासाठी खेळांतून प्रोत्साहन मिळते.”

मा. श्री. प्रदीप नाईक यांनी अध्यक्षीय मनोगतात सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. भविष्यात तुमच्यातील काही विद्यार्थी ऑलिम्पिकमध्येही भारताचे प्रतिनिधित्व करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पुढील वर्षीचा ‘मएसो क्रीडा करंडक’ पनवेल येथील मएसो आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालय येथे आयोजित करण्यात येणार असल्याचे मा. श्री. विजय भालेराव यांनी घोषित केले.

डॉ. वैशाली कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर सौ. मंजुषा दुर्वे यांनी आभार मानले.

संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात शाळेच्या सर्व शिक्षिका, क्रीडाशिक्षक यांनी क्रीडास्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

या शाळा ठरल्या विजेत्या

सूर्यनमस्कार स्पर्धेत मुलांमध्ये मएसो ज्ञान मंदिर कळंबोली, मएसो पब्लिक स्कूल कळंबोली, मएसो दामोदर शंकर रेणावीकर विद्या मंदिर अहिल्यानगर, तर मुलींमध्ये मएसो ज्ञान मंदिर कळंबोली, मएसो पब्लिक स्कूल कळंबोली, मएसो बाल विकास मंदिर सासवड

लंगडी स्पर्धेत मुलांमध्ये मएसो सौ. निर्मला हरिभाऊ देशपांडे विद्यालय बारामती, मएसो इंग्लिश मिडीयम स्कूल शिरवळ, मएसो हरिभाऊ गजानान देशपांडे बारामती, तर मुलींमध्ये मएसो इंग्लिश मिडीयम स्कूल शिरवळ, मएसो सौ. निर्मला हरिभाऊ देशपांडे विद्यालय बारामती, मएसो विद्यामंदिर बेलापूर

डॉजबॉल स्पर्धेत मुलांमध्ये मएसो विद्या मंदिर बेलापूर, मएसो ज्ञान मंदिर कळंबोली, मएसो निर्मला हरिभाऊ देशपांडे विद्यालय बारामती, तर मुलींमध्ये मएसो बाल विकास मंदिर सासवड, मएसो निर्मला हरिभाऊ देशपांडे विद्यालय बारामती, मएसो इंग्लिश मिडीयम स्कूल शिरवळ

गोल खोखो स्पर्धेत मुलांमध्ये मएसो निर्मला हरिभाऊ देशपांडे विद्यालय बारामती, मएसो ज्ञान मंदिर कळंबोली, मएसो इंग्लिश मिडीयम स्कूल शिरवळ, तर मुलींमध्ये मएसो ज्ञान मंदिर कळंबोली, मएसो निर्मला हरिभाऊ देशपांडे विद्यालय बारामती, मएसो बाल विकास मंदिर सासवड

या शाळांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकवला.

मनातील जिद्द, सातत्यपूर्ण सरावाने खेळाडू घडतो
आंतरराष्ट्रीय जलतरणपटू मिहीर आंब्रे यांचे मत; ‘मएसो क्रीडा करंडक २०२६’चे उद्घाटन
“खेळामुळे केवळ शारीरिक तंदुरुस्तीच नव्हे, तर आपल्या आयुष्यात उपयोगी पडणाऱ्या अनेक गोष्टी मिळतात. खेळात हार-जीत होणे, यापेक्षाही खिलाडूपणाची भावना मोठी असते. तुमच्या मनातली खेळाविषयीची जिद्द आणि सरावातील सातत्य टिकवून ठेवा, तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. त्यातूनच एक चांगला खेळाडू घडतो”, असे मत छत्रपती पुरस्कारप्राप्त आंतरराष्ट्रीय जलतरणपटू मिहीर आंब्रे यांनी विद्यार्थ्यांशी बोलताना व्यक्त केले.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या (मएसो) क्रीडावर्धिनी आणि मएसो बालशिक्षण मंदिर इंग्लिश मिडीयम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘मएसो क्रीडा करंडक’ या राज्यस्तरीय आंतरशालेय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन मिहीर आंब्रे यांच्या उपस्थितीत मएसो बालशिक्षण मंदिर इंग्लिश मिडीयम स्कूल, मयूर कॉलनी कोथरूड येथे पार पडले. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
यावेळी ‘मएसो’च्या नियामक मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे, उपाध्यक्षा आनंदी पाटील, मएसो क्रीडावर्धिनी व शाला समितीचे अध्यक्ष विजय भालेराव, ‘मएसो’चे सचिव डॉ. अतुल कुलकर्णी, सहाय्यक सचिव सुधीर भोसले, शाला समिती महामात्र डॉ. नेहा देशपांडे, मुख्याध्यापिका अदिती कुलकर्णी, मंजुषा दुर्वे, सायली देशमुख यांच्यासह संस्थेचे व शाळेचे पदाधिकारी उपस्थित होते. मिहीर आंब्रे यांनी स्पर्धेचा शुभंकर ‘वीर’ आणि फुगे सोडून, तसेच ज्योत पेटवून स्पर्धेचे उद्घाटन केले.
मिहीर आंब्रे म्हणाले, “तुमच्याएवढाच छोटा असताना, खेळांची वाट पहायचो. खेळ आपल्याला शिस्त शिकवतात, खिलाडूपणा, एकाग्रता वाढवतात. खेळताना विकसित झालेली कौशल्ये आयुष्यात वेगवेगळ्या प्रसंगी उपयोगी पडतात. शालेय वयातच क्रीडा संस्कृती रुजली, तर आपल्याला मोठेपणी कोणताही खेळ खेळता येतो. खेळ जिंकण्यापेक्षा अधिक उत्कृष्ट कसा खेळता येईल, याकडे लक्ष द्यावे, असा सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) म्हणाले, मिहीर यांच्या क्रीडाप्रेमाची सुरवात इथे शाळेतच झाली. आज त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव मिळवले आहे. असा आदर्श घेतला पाहिजे. मनात जिद्द ठेवा आणि ध्यास घ्या. जीवनाच्या सर्व क्षेत्रात तो उपयोगी पडतो.
मिहीर आंब्रे बालशिक्षण मंदिर शाळेचे माजी विद्यार्थी असल्याने, त्यांनी व्यासपीठीय औपचारिकता बाजूला ठेवत विद्यार्थ्यांमध्ये जाऊन सर्व छोट्या खेळाडूंशी संवाद साधत जीवनातील खेळांचे महत्त्व समजावून सांगितले.
प्रास्ताविकात विजय भालेराव यांनी स्पर्धा पर्यावरणपूरक असल्याचा उल्लेख केला. या स्पर्धेचे हे १४ वे वर्ष असून संस्थेव्यतिरिक्त अन्य पाच शाळांचा सहभाग स्पर्धेत आहे. खेळ शिस्त, संघभावना निर्माण करतात, असे ते म्हणाले.
डॉ. अतुल कुलकर्णी यांनी आभार मानले. डॉ. वैशाली कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.
“यशस्वी आयुष्यासाठी ‘प’चे पंचक महत्वाचे”
म.ए.सो. आबासाहेब गरवारे महाविद्यालयात ‘अभिव्यक्ती’चे आयोजन
“यशस्वी आयुष्य घडवायचे असेल, तर ‘प’चे पंचक अतिशय महत्त्वपूर्ण आहे. प्रेम, पुस्तक, प्रयत्न, पर्यटन आणि पैसे ही ती पंचसूत्री आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध लेखक डॉ. आशुतोष जावडेकर यांनी केले. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या आबासाहेब गरवारे महाविद्यालयात आयोजित केलेल्या ‘अभिव्यक्ती – २६’ या वार्षिक उत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. ‘महाराष्ट्राची लोकधारा’ असा या कार्यक्रमाचा विषय होता. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष श्री. बाबासाहेब शिंदे, म.ए.सो. चे सचिव डॉ. अतुल कुलकर्णी, सहाय्यक सचिव श्री. सुधीर भोसले, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉ. विलास उगले, गायिका प्रांजली बर्वे इत्यादी मान्यवर या वेळी उपस्थित होते. अध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांनी ‘अभिव्यक्ती’ कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.
महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी भरतनाट्यम, मूकअभिनय, गायन-वादन सादर केले. यात महाविद्यालयाच्या ‘आगम कलामंडळा’ने सादर केलेले ‘महाराष्ट्राची लोकधारा’ चे सादरीकरण विशेष आकर्षण ठरले. तसेच ‘विविधतेतून एकता’ आणि ‘शिवरायांची गाथा’ या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. या सांस्कृतिक कार्यक्रमात गायिका प्रांजली बर्वे यांनी यानिमित्ताने एक गाणे सादर केले.
प्राचार्य डॉ. विलास उगले यांनी आपल्या प्रास्ताविकात, आजचा युवा हा उद्याचा राष्ट्रनिर्माता असल्याचे सांगताना विद्यार्थ्यांना स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी ‘अभिव्यक्ती’ हे व्यासपीठ असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने समर्थनम् फाउंडेशनच्या वतीने महाविद्यालयातील दिव्यांग आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक उपयोगासाठी मोबाईल फोनचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे संयोजन प्रा. ज्ञानेश्वर कांबळे, प्रा. सुभाष पालवे आणि प्रा. डॉ. वर्षा तोडमल यांनी केले. डॉ. बाबासाहेब गव्हाणे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

म.ए.सो. आबासाहेब गरवारे महाविद्यालयातील पाच विद्यार्थ्यांची नवी दिल्लीतील प्रजासत्ताकदिनाच्या पथसंचलनासाठी निवड

देशाची राजधानी दिल्लीमध्ये प्रजासत्ताकदिनी कर्तव्यपथावर होणाऱ्या पथसंचलनासाठी (आरडी परेड) म. ए. सो. आबासाहेब गरवारे महाविद्यालयातील पाच विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. महाविद्यालयाच्या आर्मी विंगमधील सिनियर अंडर ऑफिसर कार्तिक बरगे, सिनियर अंडर ऑफिसर जिज्ञासा यादव, कॅडेट हर्षवर्धन तिडके तसेच नेव्हल विंगमधील कॅडेट सृष्टी पवार आणि कॅडेट समर्थ केदारे या पाच विद्यार्थ्यांची कठोर निवड प्रक्रियेनंतर देशातील सर्वोत्तम एन.सी.सी. कॅडेट्समधून या पथसंचलनासाठी निवड झाली आहे.
“विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या शैक्षणिक व सहशैक्षणिक गुणवत्तेची पुन्हा एकदा प्रचिती आली असून, भविष्यातही अशाच प्रकारे विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावर चमकतील,” अशी अपेक्षा महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियमाक मंडळाचे मा. अध्यक्ष श्री. बाबासाहेब शिंदे यांनी व्यक्त केली आणि विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.
“एन.सी.सी.मुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, नेतृत्व आणि राष्ट्रप्रेमाची भावना दृढ होते. या निवडीमुळे महाविद्यालयाचा नावलौकिक वाढला आहे,” अशी भावना महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉ. विलास उगले यांनी व्यक्त केली.
एन.सी.सी. केअर टेकर ऑफिसर डॉ. राजेंद्र जमदाडे व डॉ.माधव इंचुरे यांनी विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण मेहनतीचे कौतुक करत त्यांना पुढील प्रशिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.
राजधानी दिल्लीमधील वास्तव्यादरम्यान हे विद्यार्थी देशातील विविध राज्यांतील कॅडेट्ससोबत परेड, सांस्कृतिक कार्यक्रम, पंतप्रधान रॅली, तसेच विविध राष्ट्रीय महत्त्वाच्या उपक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. त्यांच्या निवडीमुळे इतर विद्यार्थ्यांनाही एन.सी.सी.मध्ये सहभागी होण्यासाठी आणि राष्ट्रीय स्तरावर आपली क्षमता सिद्ध करण्यासाठी प्रेरणा मिळाली आहे. महाविद्यालयात आनंदाचे वातावरण असून हे विद्यार्थी व त्यांच्या पालकांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

रोमहर्षक सैनिकी प्रात्यक्षिकांनी ‘युवा चेतना दिन’ साजरा

युद्धाच्या बातम्या, युद्धातील शौर्याच्या व पराक्रमाच्या कथा वाचायला सर्वांनाच आवडते पण युद्धात होणारी जीवितहानी कधीही भरून काढता येत नाही. म्हणूनच युद्धस्य कथा रम्याः असे म्हटले जाते. तरीही युद्ध झालेच तर ते कसे लढले जाते, प्रत्यक्ष रणभूमीवर लढणारे सैनिक कोणते तंत्र वापरतात, शत्रूवर तुटून पडण्यापूर्वी नियोजन कसे केले जाते, व्यूहरचना नेमकी कशी असते, तोफगोळे आणि विमानांच्या प्रचंड आवाजात देखील परस्परांशी संवाद कसा साधतात हे जाणून घेण्याची संधी मिळाली महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या विविध शाळा व महाविद्यालयांमधील ‘एनसीसी’च्या छात्रांनी सादर केलेल्या रोमहर्षक प्रात्यक्षिकातून. निमित्त होते,  राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीदिनी आयोजित करण्यात आलेल्या ‘युवा चेतना दिना’चे.

कासारआंबोली येथील म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेत सोमवारी, दि. १२ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या या कार्यक्रमाला महिंद्र समुहाच्या एरोस्पेस अँड डिफेन्स, ट्रक्स, बसेस अँड कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट विभागाचे प्रेसिडेंट मा. श्री. विनोद सहाय हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष मा. श्री. प्रदीप नाईक हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे मा. अध्यक्ष श्री. बाबासाहेब शिंदे, नियामक मंडळाच्या मा. उपाध्यक्षा सौ. आनंदी पाटील, नियामक मंडळाचे सदस्य व म.ए.सो. क्रीडावर्धिनीचे मा. अध्यक्ष श्री. विजय भालेराव, ३ महाराष्ट्र एअर स्क्वाड्रन एनसीसी पुणे चे कमांडिंग ऑफिसर विंग कमांडर शैलैंद्र मराठे, २ महाराष्ट्र गर्ल्स बटालियन एनसीसी पुणेचे कमांडिंग ऑफिसर कर्नल किरण राऊल, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे मा. सचिव डॉ. अतुल कुलकर्णी तसेच संस्थेचे मा. सहाय्यक सचिव आणि म.ए.सो. क्रीडावर्धिनीचे महामात्र श्री. सुधीर भोसले यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

म.ए.सो.च्या नियामक मंडळाचे व आजीव सदस्य मंडळाचे सदस्य, सौ. सहाय, महिंद्र उद्योग समुहातील अधिकारीवर्ग, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सचिन आंबर्डेकर तसेच पालक, ग्रामस्थ या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते.

‘एनसीसी’च्या छात्रांनी बॅटल फॉर्मेशन, रायफल ड्रील, सॅमाफोर सिग्नल्स, सायलेंट कम्युनिकेशन, सेक्शन अटॅक अशा विविध प्रात्यक्षिकांद्वारे नेतृत्वक्षमता, संघभावना, समन्वय आणि देशभक्ती यांचा परिचय करून देत उपस्थितांची मने जिंकली. म.ए.सो. आबासाहेब गरवारे महाविद्यालय आणि म.ए.सो. गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्समधील विद्यार्थ्यांनी काश्मीरमध्ये पहेलगाम येथे अतिरेक्यांनी केलेले नृशंस हत्याकांड आणि ‘ऑपरेशन सिंदूर’ यांचे नाट्य, नृत्य आणि संगीताच्या माध्यमातून केलेले सादरीकरण सर्वांच्याच मनाचा ठाव घेणारे होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख पाहुणे आणि मान्यवरांना संचलनाद्वारे मानवंदना देण्यात आली. राजधानी दिल्ली येथीस प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात राष्ट्रीय छात्र सेनेच्या तुकडीत निवड झालेला ज्युनिअर अंडर ऑफिसर अनुराग पांडे याने या संचलनाचे नेतृत्व केले. आयएनएस विक्रांत, तेजस लढाऊ विमान, अग्नी क्षेपणास्त्र यांच्या प्रतिकृतींनी सजलेल्या चित्ररथाने आणि सैनिकी शाळेच्या अश्वारुढ छात्रांनी या शिस्तबद्ध संचलनाची शोभा वाढवली.

विविध क्रीडा प्रकारात विशेष नैपुण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

म.ए.सो. क्रीडावर्धिनीचे मा. अध्यक्ष श्री. विजय भालेराव यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांना अभिवादन करून उपस्थितांना ‘युवा चेतना दिना’च्या शुभेच्छा दिल्या. व्यक्तीच्या जीवनात शिस्त ही महत्वाची असते, सैन्यदलांमध्ये अनुशासनाला सर्वाधिक महत्व दिले जाते. हाच धागा घेऊन आजच्या कार्यक्रमाची आखणी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. म.ए.सो. क्रीडावर्धिनीच्या कार्याचा आढावा घेताना श्री. भालेराव यांनी संस्थेच्या विविध शाखांमधील खेळाडूंनी केलेल्या नेत्रदिपक कामगिरीची माहिती दिली.

प्रमुख पाहुणे मा. श्री. विनोद सहाय आपल्या भाषणात म्हणाले की, एकेकाळी समृद्ध असलेला आपला देश परकीय आक्रमणांमुळे काही शतके गुलामगिरीत होता. आता २०४७ सालापर्यंत विकसित भारताचे ध्येय साध्य करण्याचे उद्दीष्ट मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांसोमर ठेवले आहे. त्यासाठी देशातील सर्व नागरिकांची भूमिका आणि योगदान महत्वाचे आहे. १४० कोटी इतकी प्रचंड लोकसंख्या असलेला देश विकसित होणे याचाच अर्थ जगाचा विकास होणे आहे. ही केवळ देशाच्या नेतृत्वाची जबाबदारी नाही. आपण प्रत्येकाने त्याचे नेतृत्व केले पाहिजे कारण सामान्य माणसांच्या प्रयत्नानेच देश मोठा होते. त्यासाठी जीवनात प्राधान्यक्रम ठरवावा लागेल. राष्ट्र सर्वप्रथम, त्यानंतर संघटना आणि त्यानंतर व्यक्ती हा प्राधान्यक्रम निश्चित केला तर विकसित भारताचे ध्येय साध्य होईल.

दैनंदिन जीवनात शुद्ध आचरण, नीतिमत्ता, नैतिक मूल्ये आणि कायद्याचे पालन यांच्याशी तडजोड न करण्याचा सल्ला मा. सहाय यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला. या तत्वांचे पालन हेच मोठे देशकार्य असून प्रत्येकाने आरोग्यदायी आणि शिस्तबद्ध जीवनशैलीची कास धरली तर विकसित भारताचा संकल्प २०४७ सालापूर्वीच साध्य होईल असे ते म्हणाले.

अध्यक्षीय भाषणात मा. श्री. प्रदीप नाईक म्हणाले की, राजमाता जिजाऊ यांनी तरुणांना युद्धाचे शिक्षण दिले तर योद्धा संन्यासी अशी ओळख असलेल्या स्वामी विवेकानंद यांनी स्वत्वाची ओळख व्हावी यासाठी व्यक्तिमत्वातील दोष दूर करण्यासाठी अंतर्गत संघर्षाची प्रेरणा दिली. प्रत्येकाने या दोघांची शिकवण आत्मसात केली पाहिजे.

या वेळी प्रशालेच्या आवारात छात्रांनी तयार केलेल्या भारतीय नौसेनेच्या ताफ्यातील आयएनएस विक्रांत, आयएनएस इम्फाळ, आयएनएस शिवालिक या युद्धनौकात तसेच तेजस हे लढाऊ विमान, अग्नी क्षेपणास्त्र यांच्या प्रतिकृती (मॉडेल) प्रदर्शित करण्यात आल्या होत्या. त्यांची सखोल तांत्रिक माहिती या छात्रांनी प्रमुख पाहुण्यांसह उपस्थितांना दिली.

म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेच्या विद्यार्थिनींनी गायलेल्या संपूर्ण वंदेमातरम गीताने कार्यक्रमाचा समारोप झाला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. ज्योति खिरीड यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. अतुल कुलकर्णी यांनी केले.

 

एम. ई. एस. कॉलेज ऑफ नर्सिंगचा शपथग्रहण समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न

एम. ई. एस. कॉलेज ऑफ नर्सिंगच्या ए. एन. एम. जी. एन. एम. आणि बी.एससी. (नर्सिंग) च्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा शपथग्रहण समारंभ सोमवार, दि. ३० डिसेंबर २०२५ रोजी अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे माजी अध्यक्ष मा. श्री. रवींद्र वंजारवाडकर व ज्येष्ठ उद्योगपती मा. श्री. अनिरुद्ध देशपांडे यांची विशेष उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष मा. श्री. बाबासाहेब शिंदे होते.

प्राचार्य मिलिंद काळे यांनी सर्व विद्यार्थ्यांना केलेल्या दीपहस्तांतरणाने शपथग्रहण समारंभ पार पडला. प्राचार्य काळे यांनी या वेळी वार्षिक अहवालाचे वाचन केले.

मा. श्री. अनिरुद्ध देशपांडे यांनी आपल्या भाषणात नर्सिंगच्या विद्यार्थ्यांची शिस्त, एकाग्रता, नीटनेटकेपणा, संयम, निष्ठा याविषयी कौतुक केले. नर्सिंगच्या विद्यार्थ्यांचा शपथग्रहण समारंभ पाहून आपल्याला एक वेगळीच ऊर्जा मिळाल्याचे  सांगितले. ते म्हणाले, “माझी आई ससून रुग्णालयामध्ये नर्स होती आणि वडील डॉक्टर असल्यामुळे वैद्यकीय क्षेत्राशी माझा लहानपणापासून संबंध आला, आई-वडिलांचे काम लहानपणापासून बघायला मिळाल्याने या क्षेत्राशी माझे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. बहिणीच्या ट्रान्सप्लांट सर्जरीच्या दरम्यान तिच्याबरोबर परदेशात असताना नर्सेसचे काम किती महत्त्वाचे असते हे मी अगदी जवळून बघितले. त्यामुळे नर्सिंग हा माझा जिव्हाळ्याचा विषय आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पू. सरसंघचालक मोहनजी भागवत यांच्या सूचनेवरून मी केवळ चार पत्रे असलेल्या नंदुरबार येथील शाळेचे भव्य शाळेमध्ये रूपांतर केले आहे. एम. ई. एस. आय. एच. एस. मध्ये सर्वकाही उपलब्ध आहे आणि मला ते फक्त वाढवायचे आहे, हे काम करायला मला आवडेल.” शपथग्रहणाच्या दिमाखदार सोहळ्याने प्रभावित होऊन मा. श्री. अनिरुद्ध देशपांडे यांनी नर्सिंगच्या विद्यार्थिनींसाठी आपल्या आईच्या नावे दरवर्षी दहा लाख रुपये शिष्यवृत्ती म्हणून देण्याचे जाहीर केले आणि आगामी दीड वर्षामध्ये या ठिकाणी एम. ई. एस. कॉलेज ऑफ नर्सिंगची नवीन इमारत दिमाखात उभी राहील याची शाश्वती सर्व पालकांना दिली.

मा. श्री. रवींद्र वंजारवाडकर यांनी आपल्या भाषणात महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या या प्रकल्पाची पार्श्वभूमी, प्रारंभ आणि पुढील वाटचाल याची माहिती दिली. हा सर्व प्रकल्प ज्यांच्या सहकार्याने व सोबतीने पूर्ण झाला त्या कै. अण्णा सावंत, राजूभाई रेडीज अशा अन्य मान्यवरांचे स्मरण केले. कै. अण्णा सावंत यांनी आपले राहते घर रुग्णालयासाठी पहिली तीन वर्षे दिले व स्वतः भाड्याच्या घरात राहत होते याचा उल्लेख आवर्जून केला. विद्यार्थ्यांना शपथग्रहणाचा अर्थ समजावून सांगितला. तसेच “या ज्योतीने सरे आपदा …”  या प्रार्थनेतील ओळींचा अर्थ सांगत रुग्णांच्या आयुष्यातील अंधकार दूर करण्यासाठी तयार राहण्याचा संदेश दिला आणि नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

अध्यक्षीय समारोपात मा. श्री. बाबासाहेब शिंदे यांनी नर्सिंगच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या व एम. ई. एस. कॉलेज ऑफ नर्सिंगची निवड केल्याबद्दल त्यांच्या पालकांचे आभार मानले. कॉलेजची वैशिष्ट्ये विशद करत पुढील दोन वर्षात तुम्हाला सार्थ अभिमान वाटेल अशा इमारतीमध्ये तुमची मुले शिकत असतील असे सांगितले.

समारंभाच्या प्रारंभी सौ. मेघना गोखले यांनी मा. श्री. अनिरुद्ध देशपांडे व मा. श्री. रवींद्र वंजारवाडकर यांचा परिचय करून दिला.

प्रोफेसर शिवप्रसाद हाळेमनी यांनी आभारप्रदर्शन केले.

पसायदानाने समारंभाची सांगता झाली.

Scroll to Top
Skip to content