महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या गौरव समारंभात बोलताना डॉ. सौ. लीना देशपांडे. छायाचित्रात (डावीकडून) डॉ. अतुल कुलकर्णी, बाबासाहेब शिंदे, एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), प्रदीप नाईक आणि सौ. आनंदी पाटील

“माणसाची उंची वाढली तरच व्यावसायिक यश मिळते”

पुणे, दि. २४ : “जीवनात ज्ञान आणि कौशल्य पुरेसे ठरत नाही तर आपली मनोवृत्ती काय आहे यावर यश अवलंबून असते. ज्ञान, कौशल्य, मनोवृत्ती, मूल्ये आणि एक माणूस म्हणून परिस्थितीची जाणीव असणे आवश्यक असते. या गुणांचा संगम व्यक्तिमत्त्वात असतो तेव्हाच मोठेपण मिळते. रोजच्या जगण्यात आपण विशिष्ट मते घेऊन वावरत असतो. मात्र, त्याकडे जागरुकपणे लक्ष देण्याची गरज असते. दुसऱ्या व्यक्तीच्या भावना जाणून घेतल्याने अशक्य गोष्टी शक्य होतात. माणसाची उंची वाढली तरच व्यावसायिक यश मिळते,” अशा शद्बात भारत फोर्ज लिमिटेडच्या मनुष्यबळ विकास विभागाच्या सहयोगी उपाध्यक्ष आणि सीएसआर विभाग प्रमुख डॉ. सौ. लीना देशपांडे यांनी आज पदवीप्राप्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या विविध महाविद्यालयातील पदवी व पदव्युत्तर परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या गौरव समारंभात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या समारंभाला महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष प्रदीप नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती.

या वेळी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे, उपाध्यक्षा सौ. आनंदी पाटील, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. अतुल कुलकर्णी व्यासपीठावर उपस्थित होते.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळ आणि आजीव सदस्य मंडळाचे सदस्य देखील या समारंभाला उपस्थित होते.

कोथरूडमधील मयूर कॉलनीत असलेल्या म.ए.सो. ऑडिटोरियममध्ये आज (सोमवार, दि. २४ नोव्हेंबर २०२५) हा समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये मान्यवरांच्या हस्ते ४० गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.

पदवी व पदव्युत्तर परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या गुणवंत विद्यार्थ्यांसमवेत डॉ. अतुल कुलकर्णी, बाबासाहेब शिंदे, एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), डॉ. सौ. लीना देशपांडे प्रदीप नाईक, सौ. आनंदी पाटील आणि संस्थेचे पदाधिकारी व अन्य मान्यवर

डॉ. देशपांडे पुढे म्हणाल्या, “ सातत्य, नम्रता, कष्ट करण्याची वृत्ती, सकारात्मक विचार, अपयश पचवण्याची तयारी आणि निग्रह यातच यशाचे गमक आहे. परिस्थितीनुसार बदल करणे हे आवश्यकच असते पण त्याचबरोबर भविष्यातील संधी आणि आव्हाने यांचा वेध घेणे अतिशय महत्वाचे असते. विद्यार्थ्यांनी क्रमिक अभ्यासक्रमाबरोबरच आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, इंटरनेट ऑफ थिंग्ज, मशिल लर्निंग यासारखे नवीन तंत्रज्ञान देखील आत्मसात केले पाहिजे. संवादकौशल्य हा कळीचा विषय आहे. आपल्याकडे असलेल्या क्षमता आणि कौशल्य ठामपणे मांडण्याचे सध्याचे दिवस आहेत, त्यादृष्टीने आवश्यक असलेली संवाद कौशल्ये प्रत्येकाने शिकली पाहिजेत.”

समारंभाच्या प्रारंभी डॉ. लीना देशपांडे यांचे स्वागत आणि परिचय सौ. आनंदी पाटील यांनी करून दिला. डॉ. लीना देशपांडे यांना नवी दिल्लीत दि. २१ नोव्हेंबर रोजी झालेल्या १६ व्या इंडिया सीएसआर समिटमध्ये इंडिया सीएसआर पर्सन ऑफ द इयर २०२५ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याबद्ल त्यांचे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांच्या हस्ते डॉ. देशपांडे यांचा सत्कार करण्यात आला.

समारंभाचे प्रास्ताविक करताना बाबासाहेब शिंदे म्हणाले की, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने कायमच विद्यार्थ्यांना काळानुरुप शिक्षण उपलब्ध करून दिले आहे. संशोधन आणि कौशल्य विकासाला संस्था आवर्जून प्राधान्य देत आहे. मूल्याधिष्ठित आणि परवडणारे शिक्षण देण्याचा वारसा जपत संस्थेची वाटचाल सुरू आहे. समाजातील सर्व  घटकांना शिक्षण उपलब्ध करून देण्याचा संस्थेचा प्रयत्न असतो. संस्थेचे आजी-माजी विद्यार्थी, शिक्षक, पालक, हितचिंतक आणि समाजहितैषी व्यक्तींच्या पाठबळावर हे शक्य होत आले आहे.

आपल्या अध्यक्षीय भाषणात एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) म्हणाले की, देश पारतंत्र्यात असताना लॉर्ड मेकॉले याच्या शिक्षणविषयक धोरणांच्या विरोधात जात महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या संस्थापकांनी राष्ट्रीय शिक्षण देण्याचे प्रयत्न केले. संस्थेच्या परंपरेने जपलेली संस्कृती आणि संस्कार विद्यार्थ्यांच्या वागण्या-बोलण्यातून दिसून येतात, जीवनात निश्चितपणे ते उपयोगी पडतील. जीवनात कितीही यश मिळाले तरी पाय जमीनीवर घट्ट राहतील याकडे लक्ष द्यावे लागते.

गौरवप्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांच्या वतीने संस्थेच्या विविध शाखांमधील पाच विद्यार्थ्यांनी प्रातिनिधिक स्वरुपात मनोगत व्यक्त केले.

मानसी ऊस्तूरीकर यांनी समारंभाचे सूत्रसंचालन तर डॉ. अतुल कुलकर्णी यांनी आभारप्रदर्शन केले.

“महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके, वामन प्रभाकर भावे आणि लक्ष्मण नरहर इंदापूरकर यांची पुण्याई आणि गेल्या १६५ वर्षांची तपश्चर्या यांच्या बळावर संस्थेला आपल्या कार्यात यश मिळत आले आहे आणि नांवलौकिक प्राप्त झाला आहे. शिक्षण क्षेत्रात सातत्याने बदल होत आहेत, मोठ्या प्रमाणावर परदेशी विद्यापीठांची कॅम्पस सुरू होत आहेत. ‘मएसो’समोर निर्माण होणाऱ्या अशा आव्हानांबरोबरच अल्प मुदतीचे अभ्यासक्रम, कौशल्यविकास, विकासामुळे निर्माण होणाऱ्या आरोग्यविषयक गरजा अशा विविध स्वरुपाच्या संधी उपलब्ध आहेत,” अशा शब्दात महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांनी संस्थेच्या भावी वाटचालीविषयी भूमिका मांडली. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या १६५ व्या वर्धापनदिनानिमित्त संस्थेच्या मुख्य कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

या प्रसंगी संस्थेचे मा. उपाध्यक्ष श्री. प्रदीप नाईक, संस्थेच्या नियामक मंडळाचे मा. अध्यक्ष श्री. बाबासाहेब शिंदे, मा. उपाध्यक्षा सौ. आनंदी पाटील, संस्थेच्या नियामक मंडळाचे आणि आजीव सदस्य मंडळाचे मा. सदस्य, संस्थेचे माजी प्रबंधक श्री. अनिल जोशी, निवृत्त उप-प्रबंधक श्री. अजित बागाईतकर, संस्थेचे मा. सचिव डॉ. अतुल कुलकर्णी, मा. सहाय्यक सचिव श्री. सुधीर भोसले, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सचिन आंबर्डेकर आणि संस्थेच्या मुख्य कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मा. पदाधिकाऱ्यांनी संस्थेच्या संस्थापकांच्या प्रतिमांना पुष्पांजली अर्पण केली. या वेळी संस्थेच्या नियामक मंडळाचे मा. सदस्य डॉ. गोविंद कुलकर्णी आणि संस्थेच्या मुख्य कार्यालयातील सहकारी श्री. सुधीर दाते यांनी शद्बबद्ध केलेल्या ‘मएसो’च्या कार्यावर आधारित गीतांचे सादरीकरण करण्यात आले. त्यानंतर संस्थेच्या भावे प्राथमिक शाळा, रेणुका स्वरुप प्रशाला आणि सौ. विमलाबाई गरवारे प्रशाला या तीन शाळांमधील निवडक विद्यार्थी आणि त्यांच्या शिक्षकांनी मुखोद्गत केलेल्या श्रीमद्भगवद्गीतेमधील १५ व्या अध्यायाचे सामुहिक पठन केले. नियामक मंडळाचे मा. सदस्य डॉ. दिलीप शेठ यांनी या अध्यायाचे विवेचन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा. डॉ. अतुल कुलकर्णी यांनी केले. काळानुरुप वाटचाल करत असताना संस्था आपल्या संस्कृतीला अनुसरून विविध उपक्रम राबवित असल्याचे सांगितले. भौतिक साधनांमध्ये वाढ होत असताना संस्थेच्या नवीन अभ्यासक्रमांना मिळणाऱ्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

मा. श्री. बाबासाहेब शिंदे म्हणाले, “संस्थेचा समृद्ध वारसा पुढे घेऊन जात असताना सद्यःस्थितीतील आव्हाने आणि संधी यांचा मागोवा घेण्याची गरज आहे. संस्थेची स्थापना झाल्यापासून गेल्या १६५ वर्षांमध्ये झालेला पुणे शहराचा विस्तार आणि संस्थेचा विस्तार याचा विचार करता संस्थेच्या कार्याचा अजूनही विस्तार होण्याची गरज आहे. परदेशी विद्यापीठांची वाढणारी संख्या लक्षात घेऊन हा विस्तार केला पाहिजे. संस्थेच्या प्रयत्नांना समाजाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे इंजिनिअरिंग आणि विधी महाविद्यालयात झालेल्या शंभर टक्के प्रवेशांवरून दिसून आले आहे. इंजिनिअरिंग कॉलेजप्रमाणेच लोटे – घाणेखुंट येथील परशुराम हॉस्पिटलसाठी देणगीदारांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांनी तीन कोटी रुपयांचा निधी उभा केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेल्या वैचारिक बांधिलकीमुळे समाजातील विविध घटकांना संस्थेशी निगडीत होण्याची इच्छा आहे. तसेच शिक्षण क्षेत्रात आणि शासकीय पातळीवर आज अतिशय सकारात्मक वातावरण आहे. या संधीचा फायदा आपण करून घेतला पाहिजे. त्यामुळेच संस्थेतील प्रत्येक घटकाने संस्थेच्या विस्तारासाठी प्रयत्न करावा. संस्थेला १७५ व्या वर्षी एक वेगळी उंची प्राप्त झालेली दिसेल.”

मा. श्री. प्रदीप नाईक आपल्या भाषणात म्हणाले की, संस्थेच्या वाटचालीत गेले एक वर्ष अनेक वैशिष्ट्यांनी भरलेले आहे. इंजिनिअरिंग आणि विधी महाविद्यालयाच्या माध्यमातून खूप मोठे यश संस्थेला मिळाले आहे. देशहिताच्या दृष्टीने महत्वाच्या अनेक क्षेत्रांमध्ये काम करणे अद्याप बाकी आहे. क्रीडा आणि कृषी या क्षेत्रांचा त्यादृष्टीने विचार केला पाहिजे. शेतीचे घटणारे प्रमाण रोखण्यासाठी विविध स्पर्धा, उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये जागरुकता निर्माण करता येऊ शकते.

या कार्यक्रमात पश्चिम महाराष्ट्रातील अतिवृष्टीग्रस्त भागातील आपत्ती निवारणासाठी संस्थेच्या विविध शाखांमधील कर्मचाऱ्यांनी जमा केलेला ५ लाख ५१ हजार रुपयांचा निधी मा. भूषण गोखले यांच्या हस्ते सेवा भारती या संस्थेच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे आपत्ती निवारण प्रमुख श्री. सदानंद कुलकर्णी यांच्याकडे सुपुर्द केला. श्री. कुलकर्णी यांनी सेवा भारतीतर्फे सुरू असलेले आपत्ती निवारण कार्य आणि निधीचा विनियोग याविषयी माहिती दिली.

संस्थेच्या मुख्य कार्यालयातील निवृत्त कर्मचारी श्री. वामन शेंडे दरवर्षी संस्थेच्या वर्धापनदिनी कृतज्ञतेच्या भावनेने संस्थेला निधी देतात. त्यांनी दिलेल्या निधीचा धनादेश मा. बाबासाहेब शिंदे यांच्या हस्ते संस्थेचे मा. अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला. तसेच संस्थेच्या आजीव सदस्य मंडळाचे मा. सदस्य डॉ. निर्भय पिंपळे, डॉ. नेहा देशपांडे आणि सौ. प्रणिती जोगळेकर यांनी देखील आपला निधी मा. गोखले सरांकडे सुपुर्द केला.

कार्यक्रमाच्या शेवटी मा. श्री. सुधीर भोसले यांनी आभार प्रदर्शन केले.

Scroll to Top
Skip to content