“१९७१ साली झालेल्या पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात एएन-१२ या विमानांनी केलेली कामगिरी विलक्षण होती. पाकिस्तानने केलेल्या आगळीकीनंतर १९७१ च्या ३ डिसेंबरच्या रात्री युद्धाला तोंड फुटले. त्यावेळी हवाई हल्ल्यांसाठी सर्वप्रथम एएन-१२ विमानांचाच उपयोग करण्यात आला. मुळात ही विमाने माल वाहतुकीसाठीची होती, परंतू भारतीय हवाई दलाची बॉम्ब हल्ल्याची क्षमता मोठ्या प्रमाणावर वाढवण्यासाठी त्यात सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता,” अशी माहिती ग्रुप कॅप्टन ए.जी. बेवूर (निवृत्त) यांनी आज व्याख्यानात दिली.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी आणि सेंटर फॉर अडव्हान्स स्ट्रॅटेजिक स्टडीज (कॅस) यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या ‘द एअर ऑपरेशन्स’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. १९७१ च्या बांग्लादेश मुक्ती संग्रामात भारतीय सैन्यांनी केलेली हवाई वाहतूक आणि हेलिकॉप्टरच्या कारवाईची माहिती ग्रुप कॅप्टन ए.जी. बेवूर (निवृत्त) आणि एअर कमोडोर आर.एम.श्रीधरन (निवृत्त) यांनी यावेळी दिली.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आणि सेंटर फॉर अडव्हान्स स्ट्रॅटेजिक स्टडीज (कॅस) चे संचालक एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव सहस्रबुद्धे, ‘कॅस’चे उपसंचालक मेजर जनरल शिशिर महाजन (निवृत्त),  आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. भरत व्हनकटे या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते. मएसो ऑडिटोरीअममध्ये मर्यादित निमंत्रितांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त). छायाचित्रात (डावीकडून) डॉ. भरत व्हनकटे, आर्किटेक्ट राजीव सहस्रबुद्धे, ग्रुप कॅप्टन ए.जी. बेवूर (निवृत्त), एअर कमोडोर आर.एम.श्रीधरन (निवृत्त), मेजर जनरल शिशिर महाजन (निवृत्त).

भारतीय लष्कराने १६ डिसेंबर १९७१ रोजी पाकिस्तानवर निर्णायक विजय मिळवत लष्करी वर्चस्व सिद्ध केले. हा दिवस ‘विजय दिवस’ म्हणून साजरा केला जातो. यंदा या दैदिप्यमान विजयाचे ५० वे वर्ष. त्यानिमित्ताने भारताने आजपर्यंत विविध युद्धांमध्ये मिळविलेल्या विजयांची माहिती समाजाला करून देण्यासाठी वर्षभर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यातील हे सहावे व्याख्यान होते.

“१९६१ सालापासून एएन-१२ विमानांच्या दोन स्क्वॉड्रन भारतीय हवाई दलात कार्यरत होत्या. या विमानांनी ३२ वर्षे सेवा बजावली. लेह-लडाखमध्ये शस्त्रास्त्रे आणि मालवाहतूक करण्यासाठीच त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात होता. १९६३ ते १९८६ या काळात हे विमान दर शनिवारी जोरहाट, गुवाहाटी, बडडोगरा असा प्रवास करून दिल्लीला परत येत असे. आयएल-७६ विमानांकडे ही कामगिरी सोपवण्यात येईपर्यंत एएन-१२ विमान तिथे कार्यरत होते. १९७० साली या विमानाचा वापर बॉम्ब हल्ल्यांसाठी करण्याचा निर्णय घेण्यात आला. अहमदनगर जवळील के. के. रेंजमध्ये त्यासाठीच्या चाचण्या मोठ्या प्रमाणावर घेण्यात आल्या. तेव्हा १९७१ च्या युद्धाची कोणतीच शक्यता नव्हती. परंतू भारतीय हवाई दलाची बॉम्ब हल्ल्याची क्षमता मोठ्या प्रमाणावर वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. १९७१ च्या मध्यावर हवाई दलाने बॉम्बहल्यांसाठी मोठ्या प्रमाणावर वैमानिक व अन्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यास सुरवात केली. त्यासाठीची नियमावलीदेखील तयार करण्यात आली होती. याच वेळी एक कोटी शरणार्थी बांग्लादेशातून भारतात आले होते. या परिस्थितीवर एकच उपाय दिसत होता तो म्हणजे बांग्लादेशची निर्मिती! त्यासाठी थेट कारवाई आणि पाकिस्तानमधील अनेक ठिकाणांवर बॉम्बहल्ले करणे आवश्यक होते. १९७१ च्या ऑगस्ट महिन्यात सर्वांना युद्धाची जाणीव झाली होती. दुसरीकडे हवाई दलाने देखील प्रशिक्षणाचा वेग वाढवला होता. एएन-१२ विमाने शत्रूच्या विमानविरोधी तोफांच्या सहजपणे टप्प्यात येणारी आणि शत्रूच्या विमानांच्या नजरेत येऊ शकतील अशी होती. या विमानांमध्ये स्वसंरक्षणाची कोणतीही यंत्रणा नव्हती. दहा हजार किलोग्रॅम वजन वाहून नेण्याच्या या विमानांच्या क्षमतेचा वापर तेवढ्याच वजनाचा अतिसंवेदनशील दारुगोळा नेण्यासाठी करता येईल अशी सुधारणा त्यात करण्यात आली. याच विमानांद्वारे पूर्व आणि पश्चिम पाकिस्तानातील रडार शोधण्यात आली होती. १९७१ च्या ३ डिसेंबरच्या रात्री पाकिस्तानने केलेल्या आगळीकीनंतर युद्धाला तोंड फुटले. त्यावेळी हवाई हल्ल्यांसाठी सर्वप्रथम एएन-१२ विमानांचाच उपयोग करण्यात आला. पहिल्यांदा चंगा-मंगा त्यानंतर सुलेमानकी ब्रीज आणि नंतर फोर्ट अब्बास या ठिकाणांवर या विमानांनी हवाई हल्ले केले. पीरपंजाल पर्वतरांगांमध्येदेखील या विमानांचा वापर करण्यात आला होता”, असेही ग्रुप कॅप्टन ए.जी. बेवूर (निवृत्त) यांनी या वेळी सांगितले.

एअर कमोडोर आर.एम.श्रीधरन (निवृत्त) यांनी यावेळी रात्रीच्या वेळी हेलिकॉप्टरद्वारे करण्यात आलेल्या कैलाशर ते सिल्हेट या जगातील पहिल्या विशेष कारवाईची माहिती दिली.

एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. भरत व्हनकटे यांनी आभार प्रदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लिना चांदोरकर यांनी केले.

 

 

 

 

Scroll to Top
Skip to content