विज्ञानातील क्लिष्ट संकल्पना प्रयोगाद्वारे होणार सोप्या
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेमधील लेफ्टनंट कर्नल कै. सुहास गोगटे विश्व जिज्ञासा प्रयोगशाळेचे उद्घाटन व हस्तांतरण सोहळा श्रीमती गोगटे यांच्या हस्ते आज (शनिवार, दि. १२ नोव्हेंबर २०२२) पार पडला.
११ नोव्हेंबर – राष्ट्रीय शिक्षण दिवस, १४ नोव्हेंबर – बाल दिन व १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचा वर्धापन दिन, या दिवसांचे औचित्य साधून म. ए. सो. राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेने विज्ञान आठवडा आयोजित केला आहे, याची सुरुवात विश्व जिज्ञासा प्रयोगशाळेच्या हस्तांतरण सोहळ्याने झाली. प्रयोगशाळेमधील ३-डी प्रिंटर च्या साह्याने तयार करण्यात आलेल्या समया मोबाईल ॲपद्वारे प्रज्वलित करून अत्यंत नावीन्यपूर्ण पद्धतीने या सोहळ्याची सुरुवात करण्यात आली. श्रीमती गोगटे यांनी पती लेफ्टनंट कर्नल कै. सुहास गोगटे यांच्या स्मरणार्थ दिलेल्या देणगीतून ही प्रयोगशाळा साकारण्यात आली आहे.
विश्व जिज्ञासा प्रयोगशाळेचा फायदा सैनिकी शाळेतील छात्रांबरोबरच प्रशालेच्या परिसरातील ग्रामीण विद्यार्थ्यांना होणार असून विज्ञानातील संकल्पना त्यांना प्रत्यक्ष प्रयोगाद्वारे समजून घेता येणार आहेत. कृतिशील सहभागातून ही प्रयोगशाळा शैक्षणिक क्षेत्रातील एक नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून मैलाचा दगड ठरेल, याच्या वापरातून विद्यार्थिनींनी मूलभूत संकलनांचा अभ्यास करावा व यशाची शिखरे सर करावीत अशी अपेक्षा प्रमुख अतिथी श्रीमती गोगटे यांनी या वेळी व्यक्त केली.
या कार्यक्रमाला ‘मएसो’च्या नियामक मंडळाचे मा. अध्यक्ष आर्कि. राजीव सहस्त्रबुद्धे, शाळा समितीच्या मा. अध्यक्षा डॉ. माधवी मेहंदळे, शाळा समितीच्या महामात्रा डॉ. मानसी भाटे, मुळशी तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री. विठ्ठल कु़भार, सचिव श्री.सतीश शिंदे, प्रशालाचे कमांडंट म. यज्ञरामण, प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुवर्णा कांबळे, उपमुख्याध्यापक श्री अनंत कुलकर्णी, पर्यवेक्षक श्री. शाम नांगरे व श्री. संदीप पवार तसेच शाळेच्या पालक-शिक्षक संघाचे सदस्य श्री. सागर दळवी, तसेच कॅ. वैद्य उपस्थित होते.
या प्रयोगशाळेच्या उभारणीसाठी सैनिकी शाळेच्या विज्ञान शिक्षिका श्रीमती मंजिरी पाटील व संपूर्ण विज्ञान विभागाने कॅम्पस डायरेक्टर श्रीमती गीतांजली बोधनकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष प्रयत्न केले.