म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेच्या १८ व्या तुकडीचा दीक्षांत समारोह गुरुवार, दि. ७ मार्च २०२२ रोजी अतिशय उत्साहात पार पडला. या वेळी शाळेतील छात्रांनी सादर केलेली चित्तथरारक सैनिकी प्रात्यक्षिके उपस्थितांच्या कौतुकाचा विषय ठरली.  मुळशी तालुक्यात कासार आंबोली येथे असलेल्या शाळेच्या प्रांगणात झालेल्या या ‘पासिंग आऊट परेड’चे नेतृत्त्व स्कूल कॅप्टन तेजस्वी लांबा या विद्यार्थिनीने केले. शाळेतील इ. ६ ते १२ वी च्या ४५० विद्यार्थिनींनी या वेळी संचलनाद्वारे मान्यवरांना मानवंदना दिली.

पुणे महानगर विकास प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. सुहास दिवसे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सी.ए. श्री. योगेश दीक्षित यांची यावेळी विशेष उपस्थिती होती. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली आणि संस्थेच्या नियामक मंडळाचे मा. अध्यक्ष आर्किटेक्ट श्री. राजीव सहस्रबुद्धे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

संस्थेच्या नियामक मंडळाच्या सदस्या व शाला समितीच्या अध्यक्षा डॉ. माधवी मेहेंदळे, शाला समितीच्या महामात्रा प्रा. चित्रा नगरकर, सदस्य मा. श्री. बाबासाहेब शिंदे, संस्थेच्या नियामक मंडळाचे सदस्य मा. अॅड. सागर नेवसे, संस्थेच्या आजीव सदस्य मंडळाचे सदस्य मा. सुधीर भोसले, संस्थेचे सचिव प्रा. डॉ. भरत व्हनकटे, सहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे, म.ए.सो. क्रीडावर्धिनीचे समन्वयक प्रा. शैलेश आपटे, शाळेच्या प्राचार्या डॉ. सुलभा विधाते या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

विद्यार्थिनींच्या शानदार संचलनानंतर इयत्ता १२ वी च्या छात्रांची पासिंग आऊट परेड झाली. त्यानंतर शाळेच्या छात्रांनी रायफल शुटिंग, अश्वारोहण, धनुर्विद्या, कराटे, मर्दानी खेळ, रोप मल्लखांब, लेझीम आणि योगासनांची प्रात्यक्षिके सादर केली.

पासिंग आऊट परेड व छात्रांची चित्तथरारक प्रात्यक्षिके पाहून आपण भारावून गेल्याचे प्रमुख पाहुणे डॉ. सुहास दिवसे यांनी सांगितले. आपल्या अध्यक्षीय मनोगतात एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांनी कोरोना महामारीच्या आपत्तीनंतर प्रात्यक्षिकांचे सुंदर सादरीकरण केल्याबद्दल सर्व विद्यार्थिनींचे व शिक्षकांचे कौतुक केले.

याप्रसंगी ‘टाकाऊतून टिकाऊ’ या संकल्पनेनुसार शाळेच्या आवारातील भरारी विमानाचे शिल्प, एन.सी.सी. कक्ष व आर्ट वॉल यांचे उद्घघाटन प्रमुख पाहुणे डॉ. सुहास दिवसे यांच्या हस्ते करण्यात आले.

‘Sword of Honour’ हा पुरस्कार कु. वृंदा पवार हिला तर ‘उत्कृष्ट विद्यार्थिनी’ हा पुरस्कार कु. साक्षी टेकवडे यांना देण्यात आला. ‘उत्कृष्ट प्रात्यक्षिक सादरीकरणा’चा पुरस्कार रायफल शुटिंगला मिळाला.  ऑनररी कॅप्टन (निवृत्त) श्री.चंद्रकांत बनसोडे यांनी मार्गदर्शन केले. राष्ट्रीय स्तरावर उत्तम कामगिरी करणाऱ्या विद्यार्थिनी कु. देवयानी चव्हाण, कु. गीता धनवडे व  कु. गिरीजा जोगळेकर यांना तर शाळेचे उपमुख्याध्यापक श्री. अनंत कुलकर्णी, सौ. मंजिरी पाटील, श्री. रविंद्र उराडे, सौ. वैशाली शिंदे या शिक्षकांना त्यांच्या शैक्षणिक योगदानाबद्दल या वेळी सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. माधवी मेहेंदळे यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.अद्वैत जगधने यांनी तर उपमुख्याध्यापक श्री. अनंत कुलकर्णी यांनी आभार प्रदर्शन केले.

सैनिकी शाळेतील एन. सी. सी. कक्षाचे उदघाटन

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष  एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) आणि म. ए. सो. च्या नियामक मंडळाचे मा. अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते शाळेतील एन. सी. सी.  कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. या ठिकाणी एन. सी. सी. ची माहिती देणारे फलक तसेच एन. सी. सी. च्या छात्रांनी केलेल्या विविध उपक्रमांची माहिती ए. एन.ओ. (Associate NCC Officer – ANO) थर्ड ऑफिसर राजश्री गोफणे यांनी छायाचित्रांच्या आधारे करून दिली.

याप्रसंगी ए. एन. ओ. प्रशिक्षणामध्ये ‘ग्राऊंड स्किल टेस्ट’ तसेच सर्वोत्तम गुणांसह प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल शाळेतील ए. एन. ओ. थर्ड ऑफिसर राजश्री गोफणे यांना सन्मानित करण्यात आले.

Scroll to Top
Skip to content