“१९७१ साली बांगला देशाच्या मुक्तीसाठी पाकिस्तानविरूद्ध झालेल्या युद्धात तीनही सेनादलांमधील उत्कृष्ठ समन्वयामुळेच भारताला निर्विवाद यश मिळाले,” असे प्रतिपादन या युद्धात प्रत्यक्ष भाग घेतलेले ग्रुप कॅप्टन हेमंत सरदेसाई (निवृत्त) यांनी आज येथे केले. १९७१ साली झालेल्या युद्धातील विजयाला ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी आणि सेंटर फॉर अॅडव्हान्स्ड स्ट्रॅटेजिक स्टडीज (कॅस) या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने गेले वर्षभर व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती. या व्याख्यानमालेचा समारोप आज ग्रुप कॅप्टन हेमंत सरदेसाई (निवृत्त) आणि लेफ्टनंट जनरल विनायक पाटणकर (निवृत्त) यांच्या व्याख्यानाने झाला. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे कमांडंट एअर मार्शल संजीव कपूर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आणि सेंटर फॉर अॅडव्हान्स्ड स्ट्रॅटेजिक स्टडीज (कॅस)चे संचालक एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव रा. सहस्रबुद्धे, संस्थेचे सहाय्यक सचिव इंजिनिअर सुधीर गाडे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

शरदचंद्र फाटक आणि पूजा शशांक फाटक यांनी लिहिलेल्या ‘The Valiants : Martyrs of Indo-Pak War1971’ या पुस्तकाचे प्रकाशन या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमापूर्वी मएसो राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेतील छात्रांनी एअर मार्शल संजीव कपूर यांना मानवंदना दिली.

युद्धभूमीवरील परिस्थितीचे वर्णन करताना ग्रुप कॅप्टन हेमंत सरदेसाई (निवृत्त) म्हणाले की, ३ डिसेंबर १९७१ या दिवशी युद्धाची अधिकृत घोषणा झाल्यानंतर नौदलाच्या विमानांनी चितगांवची हवाईपट्टी उद्ध्वस्त केली. बांगला देश मुक्तीवाहिनीतील सैनिकांनी तेथे असलेल्या इंधनाच्या साठ्याला आग लावली. दुसऱ्या दिवशी म्हणजे ४ डिसेंबरला गोरखपूरमधून हवेत झेपावलेल्या भारतीय हवाई दलाच्या विमानांनी रात्रीच्या वेळेत तेजगांववर बॉम्बवर्षाव केला. ४ आणि ५ डिसेंबर या दोन दिवसांमध्ये आपल्या हवाई दलाची ६ हंटर विमानांबरोबरच सुखोई विमान देखील पाकिस्तानच्या सैन्याने पाडले. त्यामुळे आपल्या सैन्यदलांनी रणनीति बदलली आणि शत्रूच्या विमानतळांवरील धावपट्ट्या उद्ध्वस्त करायला सुरवात केली. हवाईदलाच्या संरक्षणात पायदळाचे सैनिक ढाका शहराकडे कूच करत होते. हवाई हल्यात ढाक्यातील गव्हर्नर हाऊस जेव्हा बेचिराख झाले तेव्हा हे युद्ध आपल्या हातातून गेल्याची जाणीव पाकिस्तानच्या सैन्याला झाली.

लेफ्टनंट जनरल विनायक पाटणकर (निवृत्त) यांनी आपल्या व्याख्यानात १९७१ च्या युद्धातील हवाईमार्गाने केलेल्या कारवाईचे (Air Born) महत्व विशद केले. आपल्या सैन्याचा मार्ग रोखण्यासाठी शत्रूने निर्माण केलेले विविध प्रकारचे अडथळे दूर करून शत्रूच्या प्रदेशात घुसण्यासाठी हीच कारवाई उपयोगी ठरते. १९७१ च्या युद्धात भारताने पूर्व पाकिस्तानातील तँगाईलच्या परिसरात अशी कारवाई केली होती. पूर्व पाकिस्तानात म्हणजेच आताच्या बांगला देशात नद्यांची पात्रे खूपच रूंद आहेत आणि या नद्या समुद्राच्या दिशेने पुढे जातात तशी ही रूंदी वाढत जाते. तसेच या नद्यांचे पात्र ओलांडण्यासाठी फारच कमी पूल आहेत. त्यामुळे हवाईमार्गाने कारवाई करणे आवश्यक होते. कलाईकुंडा आणि पानागढ या भागात पॅराशूटच्या मदतीने भारताचे सातशे ते आठशे जवान शस्त्रास्त्रांसह उतरले. प्रत्यक्षात या संख्येचा नेमका अंदाज न आल्याने ‘बीबीसी’ या ब्रिटीश रेडिओ वाहिनीने पाच हजार सैनिक उतरल्याची बातमी दिली. पाकिस्तानी सैन्य त्यावेळी चीनकडून लष्करी मदतीच्या प्रतिक्षेत होते त्यामुळे हे चीनचेच सैनिक असावेत असा त्यांच्या समज झाला. पाकिस्तानी सैन्याचे प्रमुख जनरल नियाझी हे परिस्थितीचे आकलन करण्यात चुकले आणि रावळपिंडीतील लष्करी मुख्यालयाला त्यांनी तसा संदेश देखील पाठविला. या परिस्थितीचा फायदा भारतीय घेत भारतीय फौजांनी ढाका ताब्यात घेतले.  

एअर मार्शल संजीव कपूर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात, स्वर्णिम विजय वर्षाचे औचित्य साधून व्याख्यानमालेचे आयोजन केल्याबद्दल महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी आणि सेंटर फॉर अॅडव्हान्स्ड स्ट्रॅटेजिक स्टडीज (कॅस) चे अभिनंदन केले. १९७१ च्या युद्धातील नायकांना प्रत्यक्ष भेटण्याची आणि ऐकण्याची संधी या व्याख्यानमालेमुळे आजच्या युवा पिढीला मिळाली ही फार मोठी गोष्ट आहे असे ते म्हणाले. केंद्र सरकारने राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत मुलींसाठी प्रवेशाची दारे खुली केल्यानंतर सुमारे २ लाख मुलींनी अर्ज केल्याची माहिती त्यांनी दिली. हवाई दलात रूजू झालेल्या महिला वैमानिक पुरूष वैमानिकांच्या तुलनेत कुठेच कमी नाहीत असा आपला अनुभव असल्याचे त्यांनी सांगितले. युवा पिढीने आपल्या देशाचा इतिहास जाणून घेतला पाहिजे कारण तो आपल्याला खूप काही शिकवतो. ज्ञान संपादन करण्यासाठी जगभरातून माणसे आपल्या देशात येत होती. नालंदा आणि तक्षशीला या विद्यापीठात प्रवेश मिळावा यासाठी जगभरातील ४० देशांमधील विद्यार्थी अनेक महिने पायी प्रवास करून भारतात येत असत. आपल्या पूर्वजांकडील ज्ञान मिळवण्यासाठी ज्याप्रमाणे लोक भारतात आले तसेच काही जण या देशातील संपत्ती लुटायला आले. एकेकाळी इंग्लंड हा जगाचा कारखाना होता. त्यांना लागणाऱ्या कच्च्या मालाच्या शोधात ब्रिटीश भारतात आले, आणि त्यांनी आपला देश लुटला. जगाच्या एकूण उत्पन्नात असलेला भारताचा ३३ टक्के वाटा घसरून तो केवळ एक टक्क्यापर्यंत घसरला. आज इंग्लंडची जागा चीनने घेतली आहे आणि तो जगाची लूट करतो आहे. १९९१ पासून भारताची परिस्थिती बदलत आहे. २०२५ पर्यंत भारताची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन होईल. त्यामुळे युवा पिढीने मोठी स्वप्ने बघितली पाहिजेत, असे ते म्हणाले.

कार्यक्रमाच्या सुरवातील एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांनी प्रास्ताविक केले.

इंजिनिअर सुधीर गाडे यांनी आभार प्रदर्शन तर डॉ. लीना चांदोरकर यांनी सूत्रसंचालन केले.

 

Scroll to Top
Skip to content