“शिक्षणामुळे चरितार्थाची सोय होते पण संगीतामुळे मिळणारा आनंद जीवन समृद्ध करतो. संगीतामुळे चित्तवृत्ती एकवटल्या जात असल्याने चित्तशुद्धी होते. परिणामी गुन्हेगारी वृत्तीला आळा बसतो, संगीताचा समाजमनावर होणारा हा फार मोठा परिणाम आहे, ” असे प्रतिपादन तालयोगी पद्मश्री पंडित सुरेश तळवलकर यांनी आज येथे केले. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या भावे प्राथमिक शाळेच्या नूतनीकृत सभागृहाचे उद्धाटन आज (गुरूवार, दि. ९ नोव्हेंबर २०२३) त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी पं. तळवलकर बोलत होते.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष मा. प्रदीप नाईक यांची विशेष उपस्थिती होती. संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे आणि संस्थेचे सचिव डॉ. अतुल कुलकर्णी या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित होते.
मएसो कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्टस् च्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या “नमन नटवरा विस्मयकारा…” या नांदीनंतर पं. तळवलकर यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आले.
“सभागृहामध्ये सादर केलेल्या कार्यक्रमामुळे कलाकाराला अनुभवाची शिदोरी मिळते, त्या आठवणी त्याला प्रेरणा देणाऱ्या असतात, त्यातून कलाकार घडत असतो. मएसो भावे प्राथमिक शाळेच्या सभागृहाशी माझे ऋणानुबंध आहेत. माझे गुरू पं. पंढरीनाथ नागेशकर यांचे कार्यक्रम देखील या सभागृहात झाले आहेत. त्यामुळे नूतनीकरण झालेल्या या सभागृहाचे उद्धाटन माझ्या हस्ते होत आहे याचे मला अप्रूप आणि अभिमान वाटतो आहे,” असे तालयोगी पं. सुरेश तळवलकर यावेळी म्हणाले.
मा. बाबासाहेब शिंदे यांनी कार्यक्रमाच्या प्रारंभी केलेल्या प्रास्ताविकात शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या या सभागृहाच्या नूतनीकरणामागील भूमिका मांडली.
एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, “सैन्यदलांच्या परेडमध्ये देखील एक संगीत असते, त्यातील बीट बिघडले तर परेडची शान कमी होते. संगीतामुळे गुन्हेगारी कमी होते हा पंडितजींनी मांडलेला विचार अतिशय महत्वाचा आहे. शांतता मिळविण्यासाठी सगळेचजण संगीताकडे वळतात.”
या उद्घाटन समारंभाच्या निमित्ताने मएसो कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्टस् च्या आजी व माजी विद्यार्थिनींनी कथक नृत्यशैलीत गणेश वंदना सादर केली. त्यानंतर कॉलेजमधील प्रा. रश्मी देव, प्रा. अरुंधती कामठे व ऋषिकेश कर्दोडे यांनी दिवंगत ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्या निवडक लेखांचे अभिवाचन केले. प्रा. केदार केळकर आणि ऐश्वर्या कडेकर यांनी रागमाला सादर केली. तसेच मएसो बाल शिक्षण मंदिर इंग्लिश मिडियम स्कूलच्या पूर्व प्राथमिक शाळेतील शिक्षिकांनी भावगीते सादर केली.