“काळ आणि परिस्थिती बदलत राहते पण शिक्षण आणि संस्कार ही मूळ तत्वे कायम राहतात, त्यांची गरज कायम असते त्यामुळे ती विसरून चालणार नाही. संस्कारक्षम शिक्षक असल्याशिवाय सक्षम विद्यार्थी घडत नाहीत, चांगले शिक्षक निर्माण करणे हे देखील तितकेच महत्वाचे आहे. शिक्षण संस्थांनी आपली जबाबदारी ओळखून शिक्षणाशी संबंधित सर्व घटकांना बरोबर घेऊन काम करणे आवश्यक आहे. व्हीजन डॉक्युमेंट तयार करून त्यानुसार वाटचाल करणे आणि त्याचा कालबद्ध आढावा घेत राहणे हे संस्थेच्या यशस्वी वाटचालीसाठी आवश्यक आहे,” असे प्रतिपादन महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे मा. अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांनी आज (रविवार दि. १९ नोव्हेंबर २०२३) संस्थेच्या १६३ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केले.

संस्थेच्या मुख्य कार्यालयात झालेल्या या छोटेखानी कार्यक्रमात संस्थेचे संस्थापक आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके, कै. वामन प्रभाकर भावे आणि कै. लक्ष्मण नरहर इंदापूरकर यांच्या प्रतिमांना मान्यवरांनी पुष्पांजली अर्पण केली.

संस्थेचे मा. उपाध्यक्ष श्री. प्रदीपजी नाईक, संस्थेच्या नियामक मंडळाचे मा. अध्यक्ष श्री. बाबासाहेब शिंदे, मा. उपाध्यक्षा सौ. आनंदीताई पाटील, संस्थेच्या नियामक मंडळाचे सदस्य मा. देवदत्त भिशीकर, मा. विजय भालेराव, डॉ. विवेक कानडे, सीए राहुल मिरासदार, डॉ. राजीव हजिरनीस, मा. अजय पुरोहित, संस्थेच्या आजीव सदस्य मंडळाचे मा. अध्यक्ष डॉ. आनंद लेले, आजीव सदस्य मंडळाचे सदस्य व संस्थेचे माजी सचिव डॉ. भरत व्हनकटे, आजीव सदस्य मंडळाच्या सदस्या डॉ. मानसी भाटे व डॉ. नेहा देशपांडे, संस्थेचे माजी सचिव प्रा. र.वि. कुलकर्णी व प्रा. वि.ना. शुक्ल, मएसो क्रीडावर्धिनीचे समन्वयक प्रा. शैलेश आपटे तसेच संस्थेचे सचिव डॉ. अतुल कुलकर्णी, सहाय्यक सचिव मा. सुधीर भोसले, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन आंबर्डेकर उपस्थित होते. संस्थेच्या मुख्य कार्यालयातील कर्मचारीवृंद देखील यावेळी उपस्थित होता.

संस्थेचे सचिव डॉ. अतुल कुलकर्णी यांनी कार्यक्रमाच्या सुरवातीला केलेल्या प्रास्ताविकात शिक्षण क्षेत्रात अनेक बदल झाले परंतू संस्थेच्या संस्थापकांनी ज्या उद्देशाने संस्था स्थापन केली, ते मूळ उद्देश कायम राखत गेल्या १६३ वर्षात संस्थेने यशस्वी वाटलाच केल्याचे सांगितले. हीच परंपरा यापुढील काळात देखील कायम राखली जाईल असा विश्वास व्यक्त केला.

संस्थेच्या नियामक मंडळाचे मा. अध्यक्ष श्री. बाबासाहेब शिंदे या वेळी बोलताना म्हणाले की, “ महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या स्थापनेला आज १६३ वर्ष पूर्ण होत आहेत. वाढदिवसाच्या दिवशी व्यक्तीच्या जीवनात एक वर्ष कमी होते, परंतू संस्थेच्या वाटचालीत एक वर्ष वाढणे ही चांगली घटना असते. संस्थेचे कार्य वाढणे, त्याचा विस्तार होणे, संस्था बहरणे ही आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट असते. संस्थेच्या वाटचालीत अनेकांचे योगदान आहे. संस्थेच्या नव्या नियामक मंडळ आणि आजीव सदस्य मंडळाच्या सदस्यांच्या सहकार्याने संस्थेच्या कार्याला अधिक गती देता येईल. दूरगामी विचार करून संस्थेच्या १७५ व्या वर्षी संस्थेच्या शाखांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ७५ हजारांवर पोहोचेल यादृष्टीने प्रयत्न करू या. त्यासाठी सर्वांनीच झोकून देऊन काम केले तर संस्थेच्या वाटचालीत भरीव योगदान दिल्याचे समाधान सर्वांनाच मिळेल.”

संस्थेचे मा. उपाध्यक्ष श्री. प्रदीपजी नाईक यांनी आपल्या भाषणात, विद्यार्थ्यांना घडवणारे संस्कारक्षम आणि सक्षम शिक्षक मिळणे हे फार मोठे आव्हान असून असे शिक्षक घडवणे हे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीसारख्या प्रदीर्घ परंपरा असलेल्या संस्थेचे कर्तव्य आहे. त्यासाठी आपण प्रयत्न करू या. विद्यार्थ्यांना ज्याप्रमाणे डॉक्टर, इंजिनिअर व्हावे असे वाटते, त्याचप्रमाणे शिक्षक व्हावे असे वाटले पाहिजे असे संस्कार करण्याची आवश्यकता आहे, असे सांगितले.

संस्थेचे सचिव मा. सुधीर भोसले यांनी आभार प्रदर्शन केले. संस्थेच्या प्रत्येक घटकाचे संस्थेच्या कार्यात योगदान, संस्थेचे स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्याच्या दृष्टीने प्रयत्न, आगामी पाच वर्षांचे नियोजन त्याचप्रमाणे माजी विद्यार्थी संघ अर्थात ‘MAA’ च्या कार्याला गती देण्यासाठीचे नियोजन यादृष्टीने काम सुरू असल्याचे सांगितले. संस्थेच्या आजीव सदस्य मंडळातील ५० टक्के सदस्य संस्थेचेच माजी विद्यार्थी आहेत आणि ही आनंदाची बाब असल्याचे या वेळी सांगितले.

कार्यक्रमापूर्वी संस्थेच्या मुख्य कार्यालयाच्या प्रवेशद्वारापाशी असलेल्या संस्थेच्या संस्थापकांच्या भित्तीचित्रावर मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.

Scroll to Top
Skip to content