म. ए. सो. आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी डॉ. विलास उगले

म.ए.सो. आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या प्राचार्य पदाची सूत्रे डॉ. विलास उगले यांनी आज (शुक्रवार, दि. १ सप्टेंबर २०२३) स्वीकारली. या प्रसंगी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे सदस्य विजय भालेराव, ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ. ए. पी. कुलकर्णी, महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. शरयू साठे, संस्थेचे साहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन आंबर्डेकर उपस्थित होते.

डॉ. उगले तीन दशकांहून अधिक काळ शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. यापूर्वी ते सर परशुराम भाऊ महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. डॉ. उगले यांचे एम. ए., एम. एड., पीएच. डी. असे शिक्षण झाले असून ‘आर्थिक भूगोल’ हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे. “ पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यामधील महादेव कोळी समाजाच्या सामाजिक-आर्थिक विकासाच्या समस्या आणि संभावना” हा त्यांच्या शोधनिबंधाचा विषय आहे. राज्य व राष्ट्रीय स्तरावरील परिषदांमध्ये त्यांनी अनेक पेपर्स सादर केले आहेत.

डॉ. उगले यांची तीन पुस्तके प्रकाशित झाली असून अनेक विद्यार्थ्यांना पीएच. डी. साठी त्यांनी मार्गदर्शन केले आहे.  सध्या ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विविध समितींवर कार्यरत असून यापूर्वी ते विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद व अधिसभेचे सदस्य होते.

राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी या नात्याने त्यांनी अनेक उपक्रमांमध्ये सहभाग घेतला असून त्याबद्दल विद्यापीठाकडून त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

पाणी, नदी स्वच्छता आणि लहान धरणांचे महत्व या विषयांमध्ये ते काम करतात.  त्यांच्या या कामाची दखल घेऊन स्वयंसेवी संस्था आणि केंद्र सरकार यांच्या वतीने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.