पुणे, दि. २८ : “ जगाच्या इतिहासात आपल्या देशाची ओळख ज्ञान देणारा देश म्हणून आहे. त्यामुळे आक्रमकांनी देशातील महाविद्यालये, नालंदासारखी विद्यापीठ नष्ट केले. ब्रिटिशांनी विज्ञानाच्या आधारे आपल्या देशातील नागरिकांची मति भ्रमित केली. आपल्या देशातील ज्ञान आणि ते देणारे ग्रंथ निकृष्ट दर्जाचे ठरवले. भारतातील ज्ञान तर्कसंगत नाही, ते भ्रामक समजुती आणि अंधश्रद्धेवर आधारित आहे, हे समाजमनावर बिंबवले. हे ज्ञान देणारी भाषा संस्कृत असल्याने त्यांनी ती भाषा मृत भाषा ठरवली. सुशिक्षितांनी हे सर्व सत्य मानले. भारतीय ज्ञान परंपरेतील विषय आजही आपल्या देशात शिकवले जात नाहीत आणि गेल्या ७५ वर्षात आपण ते पुर्स्थापित करू शकलो नाही, इतका आपल्यावर ब्रिटिशांचा प्रभाव आहे”, असे प्रतिपादन विज्ञान भारतीचे राष्ट्रीय संघटन सचिव मा. जयंतराव सहस्रबुद्धे यांनी आज येथे केले.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीतर्फे ‘स्वराज्य – ७५: स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव’ ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. त्यातील दुसरे पुष्प गुंफताना मा. जयंतराव सहस्रबुद्धे बोलत होते. राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या व्याख्यानाचा विषय होता, ‘भारताचा स्वातंत्र्य लढा व विज्ञान’. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष मा. प्रदीपजी नाईक होते.

म.ए.सो. इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड करिअर कोर्सेस आणि म.ए.सो. सिनीअर कॉलेज यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष मा. प्रदीप नाईक होते. या वेळी व्यासपीठावर म. ए. सो. च्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट मा. राजीव सहस्रबुद्धे, संस्थेच्या ‘स्वराज्य – ७५ समिती’ च्या अध्यक्ष सौ. आनंदीताई पाटील, म.ए.सो. इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड करिअर कोर्सेसचे संचालक डॉ. संतोष कुलकर्णी, म.ए.सो. सिनीअर कॉलेजचे प्रभारी प्राचार्य डॉ. रवींद्र वैद्य, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे आणि सहाय्यक सचिव इंजिनिअर सुधीर गाडे उपस्थित होते.

कोविड – १९ च्या पार्श्वभूमीवर सर्व शासकीय नियमांचे पालन करून मर्यादित निमंत्रितांच्या उपस्थितीत मयूर कॉलनीतील म.ए.सो. ऑडिटोरिअममध्ये हे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. संस्थेच्या फेसबुक आणि युट्यूब चॅनेलद्वारे त्याचे थेट प्रक्षेपण करण्यात आले.

या वेळी बोलताना मा. जयंतराव सहस्रबुद्धे यांनी पुढे सांगितले की, भारतातील थोर वैज्ञानिक चंद्रशेखर व्यंकटरमण यांनी आपले शोधकार्य २८ फेब्रुवारी १९२८ रोजी प्रसिद्ध केले म्हणून दरवर्षी २८ फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. आपल्या संशोधनाला नोबेल पुरस्कार मिळणार असा त्यांना आत्मविश्वास होता, त्यामुळे त्यांनी पुरस्कार स्वीकारण्यासाठी स्विडनमध्ये जाण्याकरिता जहाजाचे टिकट देखील काढले होते. त्यांच्या अपेक्षेप्रमाणे १९३० साली त्यांना नोबेल पुरस्कार जाहीर झाला. तो स्वीकारताना रमण यांनी हा पुरस्कार स्वतंत्र देशाच्या ध्वजाखाली स्वीकारू शकत नसल्याचे शल्य व्यक्त केले. तसेच तो पुरस्कार देशाच्या स्वातंत्र्य योद्ध्यांना समर्पित केला.  चंद्रशेखर व्यंकटरमण हे केवळ वैज्ञानिक नव्हते तर ते स्वातंत्र्य योद्धेदेखील होते, याकडे दुर्लक्ष होते. भारतीय विज्ञानाची किर्तीपताका जगासमोर नेणाऱ्यांची नावे, स्वातंत्र्य प्राप्तीसाठी योगदान दिलेल्या विज्ञान क्षेत्रातील व्यक्तींची नावे जगासमोर येत नाहीत. देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्याचे ७५ वे वर्ष साजरे करताना ५ सूत्रे समोर ठेवली आहेत… १. स्वातंत्र्य चळवळ, २. नवनवीन कल्पना, ३. उपलब्धी किंवा यश, ४. वर्तमान व भविष्याची योग्य दिशेने वाटचाल आणि ५. समृद्ध भविष्य घडविण्याचा संकल्प. यातील पहिल्या सूत्राचे योग्यप्रकारे आकलन करून घेतल्याशिवाय अन्य सूत्रांची निश्चित दिशा समजणार नाही. देशाच्या स्वातंत्र चळवळीचे आकलन करून घेताना हे लक्षात येते की, आक्रमकांचा उद्देश हा नेहमीच प्रदेश जिंकणे आणि तेथील संस्कृती नष्ट करणे होता. त्यातून आत्मगौरव आणि आत्मविश्वास नाहीसा होतो आणि ज्येत्याचे अनुकरण करण्याची प्रवृत्ती निर्माण होते. देशाची अस्मिता आणि ‘स्व’ संपवण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या पद्धतीने केला गेला. ब्रिटिशांनी केलेले आक्रमण वेगळ्या स्वरुपाचे होते. ते का यशस्वी झाले? देशाची ओळख नष्ट करण्यासाठी त्यांच्याकडे कोणते साधन होते?  याचा विचार केला तर लक्षात येते की ब्रिटिशांनी विज्ञानाच्या सहाय्याने आपली मति भ्रमित केली. रेल्वे, तार खाते, ॲलोपॅथी याबरोबरच त्यांनी पहिल्या औद्योगिक क्रांतीमुळे उभ्या राहिलेल्या कारखान्यांच्या भांडवलाची आणि कच्च्या मालाची गरज पूर्ण करण्यासाठी, आपल्या देशातील नैसर्गिक साधन संपत्तीची लूट करण्यासाठी सर्व्हे ऑफ इंडियासारख्या विविध सर्वेक्षण संस्था निर्माण केल्या, जंगलात राहणाऱ्या लोकांना जंगलापासून दूर करण्यासाठी जंगल कायदा निर्माण केला. आज आपण आपल्या देशाची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलर व्हावी यासाठी प्रयत्नशील आहोत,  पण ब्रिटिशांनी १९० वर्षांच्या राजवटीत त्याच्या ९ पट म्हणजे ४५ ट्रिलियन डॉलर इतकी भारताची लूट केली. होमिओपॅथी ही तर्कशुद्ध उपचार पद्धती शत्रूराष्ट्र असलेल्या जर्मनीमध्ये विकसित झाली असल्याने ब्रिटिशांनी ते छद्मविज्ञान ठरवले. ब्रिटिशांनी स्थापन केलेल्या कलकत्ता मेडिकल कॉलेजमध्ये शिकलेले महेंद्रलाल सरकार यांनी जेव्हा होमिओपॅथीचा पुरस्कार केला तेव्हा त्यांच्यावर सरकारी बहिष्कार घालण्यात आला. त्यानंतर महेंद्रलाल सरकार यांनी भारतीय विज्ञानाचे पुनर्रुज्जीवन करण्यासाठी कलकत्ता मेडिकल जर्नल सुरू केले. स्वदेशी भावनेचा अविष्कार करण्यासाठी समाजाच्या सहयोगाने इंडियन असोसिएशन फॉर द कल्टिव्हेशन ऑफ सायन्स या संस्थेची स्थापना केली. पूर्णपणे स्वदेशी आणि निव्वळ राष्ट्रीय ध्येयाने सुरू झालेल्या या संस्थेमुळे विज्ञान क्षेत्रात स्वदेशी चळवळीचा उदय झाला आणि या संस्थेतून देशभक्त शास्त्रज्ञ तयार झाले. चंद्रशेखर व्यंकटरमण यांनी देखील याच संस्थेत संशोधन कार्य केले. देशाच्या स्वातंत्र्याला लढा हा केवळ राजकीय नव्हता तर विज्ञानाच्या क्षेत्रातदेखील तो तितक्याच प्रखरतेने लढला गेला. स्वतंत्र भारत हा संशोधन करून ज्ञान निर्माण करेल त्यासाठी शास्त्रज्ञांनी दिलेली दिशा समजून घेतली पाहिजे.

संस्थेचे उपाध्यक्ष मा. प्रदीप नाईक आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना देशाची मानसिकता, परंपरा, आत्मविश्वास पुनर्स्थापित करण्याची गरज आहे. भूतकाळातील न्यायावर मात करून भविष्यात कोणी आपल्या देशाची लूट करू शकणार नाही असे सामर्थ्य निर्माण करण्याची आवश्यकता आहे.  आत्मनिर्भर, जगाला दिशा दाखविणारा भारत निर्माण करण्याचा संकल्प युवा पिढीने करावा.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन म. ए. सो. इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड करिअर कोर्सेसमधील सहाय्यक प्राध्यापक डॉ. पूनम वाठारकर यांनी केले.

Scroll to Top
Skip to content