गुढीपाडव्याचे औचित्य साधून महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी आणि सतीश कुलकर्णी व सामंत परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने तयार करण्यात आलेल्या रामायणावर आधारित दिनदर्शिका आणि बालगोपाळांसाठीच्या ध्वनिचित्रफितीचे प्रकाशन आज (मंगळवार, दि. १३ एप्रिल २०२१) करण्यात आले. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), ‘मएसो’च्या नियामक मंडळाचे मा. अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव सहस्रबुद्धे, उद्योजक मा. सतीश कुलकर्णी, सुमित्र माडगूळकर, रवींद्र खरे आणि ‘मएसो’चे सहाय्यक सचिव इंजिनिअर सुधीर गाडे यावेळी उपस्थित होते.
या ध्वनिचित्रफितीचे संहिता लेखन सौ. प्राजक्ता माडगूळकर यांनी केले असून निवेदन कु. पलोमा माडगूळकर यांनी केले आहे. रवींद्र खरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पार्श्वसंगीत दिले आहे. अमेय घाटपांडे आणि मंथन टन्नू यांनी तांत्रिक बाजू सांभाळली असून या ध्वनिचित्रफितीचे ध्वनीमुद्रण म.ए.सो. स्टुडिओमध्ये करण्यात आले आहे.
प्रभू रामचंद्रांचे आदर्श जीवन कायम नजरेसमोर राहावे या हेतून ही दिनदर्शिका आणि ध्वनिचित्रफित तयार करण्यात आली असून हा प्रकल्प दोन महिन्यात साकारण्यात आल्याचे इंजि. सुधीर गाडे यांनी प्रास्ताविकात सांगितले.
मा. सतीश कुलकर्णी यावेळी म्हणाले, “सातारा जिल्ह्यातील किन्हई या आमच्या गावी १९३५ च्या सुमारास माडगूळकर कुटूंब राहात होते. गावातील राम मंदिरातच ग.दि. माडगूळकर यांना गीत रामायणची प्रेरणा मिळाली असावी. अध्योद्धेचे राममंदिर, राम, महाराष्ट्र, आमचे गाव, ग.दि.माडगूळकर, गीत रामायण हे सगळं कसे जुळवून आणता येईल याचा गेल्या चार वर्षांपासून विचार सुरू होता. रामायणातील प्रसंगांवर आधारित चित्रे उपलब्ध होत नसल्याने हा प्रकल्प पुढे सरकत नव्हता मात्र सुधीर गाडे यांच्यामुळे कन्याकुमारी येथील विवेकानंद केंद्राकडून ही चित्रे उपलब्ध झाली आणि प्रकल्प साकारला. या कामी माडगूळकर कुटुंबाची देखील मदत मिळाली. रामायणातून आपण बरेच काही शिकू शकतो. मर्यादा पुरुषोत्तम राम म्हणजे काय? हे जगभरातील लोकांनी समजून घेतले पाहिजे. रामायण आणि महाभारतातून अनेक गोष्टी शिकाया मिळतात. पुत्रमोहाने कोणती परिस्थिती ओढवते? हे रामायणात कैकेयी आणि भरत तसेच महाभारतात धृतराष्ट्र आणि दुर्योधन यांच्यावरून दिसते. जे आपले नाही ते बळजबरीने आपण मिळवले तर त्याची फळं आपल्याला भोगावी लागतात हे आपल्याला रावणाने केलेले सीतेचे अपहरण आणि कौरवांनी कपटाने बळकावलेले पांडवांचे राज्य या उदाहरणांवरून दिसून येते. भारतात आजही या गोष्टी लागू पडतात.”
ग.दि. माडगूळकर यांचे नातू सुमित्र माडगूळकर म्हणाले, “ज्यांना वाचता येत नाही किंवा मराठी भाषा कळत नाही अशा ३ ते ७ वर्षे वयोगटातील मुलांसाठी रामायणावरील दिनदर्शिका आणि ध्वनिचित्रफित तयार केल्याबद्दल आणि त्यात माडगूळकर कुटुंबीयांना सहभागी करून घेतल्याबद्दल महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे आभार मानतो. पुढच्या पिढीपर्यंत हे सर्व पोहोचावे हा त्यामागील उद्देश आहे. याच उद्देशाने महानगरपालिकेच्या माध्यमातून पुण्यात गदिमांचे स्मारक उभे राहात आहे. त्यातील एक दालन गीत रामायणासाठी राखीव असेल. अयोद्धेतील राममंदिराची एक तरी भिंत गदिमांच्या गीत रामायणाने भरलेली नक्कीच असेल.”
ध्वनिचित्रफितीचे पार्श्वसंगीतकार रवींद्र खरे म्हणाले की, “वाल्मिकी रामायण हा कलात्मकतेने मांडलेला इतिहास आहे. कलात्मकतेमुळे इतिहास दीर्घकाळ टिकतो आणि सर्वदूर त्याचा प्रसार देखील होतो. राजकारण आणि राज्यव्यवहार यांची प्रभू रामचंद्रांनी कायम केलेली प्रथा व पद्धत जगातील सर्वात आदर्श होती. त्यामुळेच त्यांच्यानंतर २५०० वर्षे म्हणजे महाभारत घडेपर्यंत ती टिकून होती, हेच रामाचे मोठेपण आहे. रामभक्तीच्या भावनेच्या भरात रामायणाचा इतिहास मागे पडू नये. लहानपणी अचूकतेचा व ध्येयनिष्ठेचा संस्कार, कुमारवयात चिकित्सा व कुतूहल आणि मोठेपणी वास्तवाचा शोध घेण्यासाठी रामायण वाचले पाहिजे. रामायण हा इतिहास आहे कारण वाल्मिकींनी रामाच्या ८३ पिढ्यांची नावे त्यात दिली आहे. तरूण पिढीने नगररचना, आरोग्यचिकित्सा, भूगोल, तंत्रज्ञान, शस्त्रास्त्रांचे ज्ञान अशी विविध पैलूंनी रामायणाचा अभ्यास केला पाहिजे.”
एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) म्हणाले की, “रामायणावरील दिनदर्शिका आणि ध्वनिचित्रफित तयार करण्यामागचे महत्वाचे कारण म्हणजे लहानपणी झालेले संस्कार कायम टिकून राहतात. रामायण आणि महाभारत हे खूप मोठे विषय आहेत, त्यांचा खूप अभ्यास होण्याची आवश्यकता आहे. राम हा सहनशील होता आणि सहनशीलतेचा कडेलोट झाला तेव्हा कृष्ण उभा राहिला. रामायण आणि महाभारत या केवळ कथा नाहीत. त्यातील अनेक मूल्ये जीवनात आचरणात आणण्यासारखी आहेत.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंजि. सुधीर गाडे यांनी केले.