पुणे, दि. ११ : “आजची युवा पिढी ही अधिक उर्जावान आणि बुद्धिमान आहे. त्यांच्यातल्या उर्जेला रचनात्मक दिशा देण्याची गरज असून त्यांच्या चांगल्या प्रयत्नांना प्रोत्साहन देण्याची जबाबदारी पालकांची आहे. युवा पिढीत दिसणारी नकारात्मकता दूर करण्याचे काम खेळांच्या माध्यमातूनच होईल. खेळामुळे मिळणारा आत्मविश्वास आणि एकाग्रता यांचा फायदा शिक्षणातील यशासाठीही कारणीभूत ठरतो. जीवनात ध्येय निश्चित करून ते गाठण्यासाठी अथक परिश्रम केले तर यश निश्चितच मिळते. त्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गुणांचे संस्कार खेळांद्वारे होतात. त्यामुळे खेळ हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग असला पाहिजे,” असे आग्रही प्रतिपादन आंतरराष्ट्रीय नेमबाज अंजली भागवत यांनी आज येथे केले.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीतर्फे दरवर्षी स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त ‘युवा चेतना दिन’ साजरा करण्यात येतो. त्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या.
मएसो गरवारे महाविद्यालयाच्या मैदानावर आज (शनिवार, दि. ११ जानेवारी २०१९ रोजी) आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) होते. निरामय सोल्युशन्सचे संचालक प्रशांत डोंगरे यावेळी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.
याप्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे उपाध्यक्ष प्रदीप नाईक, संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे, उपाध्यक्ष अभय क्षीरसागर, संस्थेच्या नियामक मंडळाचे सदस्य व मएसो क्रीडा वर्धिनीचे अध्यक्ष विजय भालेराव, मएसो क्रीडा वर्धिनीचे महामात्र सुधीर भोसले, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे, सहाय्यक सचिव सुधीर गाडे उपस्थित होते.
प्रमुख वक्ते प्रशांत डोंगरे यांनी स्वामी विवेकानंदांच्या जीवनातील विविध घटनांचा आढावा घेत त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आणि कार्याचा परिचय उपस्थितांना करून दिला. नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे यांनी आपल्या प्रास्ताविकात ‘मएसो’च्या क्रीडा विषयक विविध उपक्रमांची माहिती आणि त्यामागील भूमिका विशद केली.
देशभरातील विविध क्रीडा स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या संस्थेच्या विद्यार्थ्यांचा सत्कार यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमात संस्थेच्या महाराष्ट्रातील विविध शाखांमधील विद्यार्थ्यांनी लेझिम, सर्वांगसुंदर व्यायाम, अरोबिक्स, एक हजार विद्यार्थ्यांचे सांघिक गीत गायन, महाराष्ट्रातील विविध सणांच्या संकल्पनेवर आधारित विविध रचना, मर्दानी खेळ अशा विविध क्रीडा प्रकारांची प्रात्यक्षिके सादर केली. उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्यांच्या या क्रीडा कौशल्यांचे कौतुक केले.
दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या ‘सावली’ या संस्थेतील विद्यार्थी आणि त्यांचे शिक्षक यावेळी उपस्थित होते.
सहाय्यक शिक्षिका कल्याणी जोशी यांनी कार्यक्रमाचे तर प्रा. शैलेश आपटे यांनी प्रात्यक्षिकांचे सूत्रसंचालन केले.