१७५ विद्यार्थ्यांचा सहभाग : दृक-श्राव्य माध्यमाचा वापर
पारतंत्र्याच्या काळात स्थापन झालेल्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची उभारणी करताना संस्थेचे संस्थापक आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके, वामन प्रभाकर भावे आणि लक्ष्मण नरहर इंदापूरकर यांनी कोणत्या अडचणींना तोंड दिले, त्यांनी कोणत्या प्रकारे त्याग केला याची माहिती देणारे ‘वज्रमूठ’ हे महानाट्य रविवार, दि. २० नोव्हेंबर २०२२ रोजी संध्याकाळी ५.०० ते ८.०० या वेळामध्ये पुण्यातील स्वारगेट जवळ असलेल्या गणेश कला क्रीडा मंच येथे सादर होणार आहे. १६२ वर्ष पूर्ण करत असताना संस्थेच्या वतीने संस्थापकांना आदरांजली म्हणून या महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. दृक-श्राव्य माध्यमाच्या आधारे सादर करण्यात येणाऱ्या या महानाट्यामध्ये महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या पुण्यामधील शाळा आणि महाविद्यालयामधील विद्यार्थी, शिक्षक, प्रशासकीय कर्मचारी, माजी विद्यार्थी असे १७५ कलाकार भूमिका साकारणार आहेत. ही माहिती महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे मा. अध्यक्ष आर्कि. राजीव सहस्रबुद्धे यांनी आज (बुधवार, दि. १६ नोव्हेबर २०२२) पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाच्या मा. उपाध्यक्षा श्रीमती आनंदीताई पाटील, नियामक मंडळाचे मा. उपाध्यक्ष श्री. बाबासाहेब शिंदे, संस्थेचे साहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे, नियामक मंडळाचे माजी सदस्य व या महानाट्याचे सूत्रधार श्री. भालचंद्र पुरंदरे, साहाय्यक दिग्दर्शक श्री. अभिषेक शाळू उपस्थित होते.
‘वज्रमूठ’ महानाट्याच्या सादरीकरणाच्या वेळी संस्थेच्या माजी विद्यार्थिनी आणि ज्येष्ठ नृत्यांगना श्रीमती मनिषाताई साठे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार असून ‘मएसो’चे मा. अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. पुणे शहरातील मान्यवर या महानाट्याला आवर्जून उपस्थित राहणार आहेत.
महानाट्याच्या कथानकाबद्दल माहिती देताना श्री. भालचंद्र पुरंदरे म्हणाले की, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी हा शिक्षणक्षेत्रातील एक वटवृक्ष आहे. त्याची गोष्ट ‘वज्रमूठ’ या महानाट्यातून सांगण्यात आली आहे. संस्थेचे संस्थापक क्रांतिकारक होते, त्यांच्या पत्नींना देखील अनेक यातना भोगाव्या लागल्या. त्याच या महानाट्याच्या मध्यवर्ती भूमिकेत आहेत, त्याच ही गोष्ट सांगत आहेत. अतिशय पराकोटीच्या विपरित परिस्थितीत असतानादेखील नैराश्य हा शद्ब देखील त्यांच्या शद्बकोशात नव्हता. हा एक फार मोठा संस्कार या महानाट्याच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचणार आहे. ही सर्व चरित्रे समाजासमोर आली पाहिजेत यासाठी अतिशय श्रद्धेने हे महानाट्य साकारत आहोत, आमच्या भावना कलेच्या माध्यमातून व्यक्त करत आहोत. भारुड, कीर्तन, पारंपारिक नृत्य, महिलांचे पारंपारिक खेळ अशा विविध कला प्रकारांचा उपयोग करण्यात आला आहे.
आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके, वामन प्रभाकर भावे आणि लक्ष्मण नरहर इंदापूरकर या तीन समाजधुरिणांनी राष्ट्रीय शिक्षण देण्याच्या उद्देशाने १८६० साली महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. पुण्यातल्या गरीब, होतकरु विद्यार्थ्यांना क्रमिक शिक्षण तसेच शास्त्रीय आणि औद्योगिक शिक्षण देण्याचा उद्देश त्यांच्यासमोर होता. या विषयांची निवड करण्यामागे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाबरोबरच समाजाच्या आणि पर्यायाने देशाच्या विकासाची आणि स्वावलंबनाची दूरदृष्टी होती असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
एतद्देशियांनी सुरु केलेल्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने आपल्या १६२ वर्षांच्या वाटचालीत स्वतःमध्ये कालसुसंगत बदल करत ज्ञानदानाचे आपले पवित्र कार्य अखंडपणे सुरू ठेवले आहे. पुणे हे विद्येचे माहेरघर ही ओळख घडवण्यात संस्थेने महत्त्वाचा वाटा उचलला आहे. महाराष्ट्रातल्या ७ जिल्ह्यांमध्ये असलेल्या संस्थेच्या ७० हून अधिक शाखांच्या माध्यमातून दरवर्षी सुमारे ४० हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आज संस्थेच्या कार्याचा विस्तार पूर्वप्राथमिक शिक्षणापासून संशोधनापर्यंतच्या शिक्षणापर्यंत झाला आहे. त्यामध्ये शालेय शिक्षण, मुलींचे सैनिकी शिक्षण, कला, वाणिज्य, विज्ञान, संगणक, व्यवस्थापन, आयुर्वेद, नर्सिंग, प्रायोगिक कला या विद्याशाखांमधील पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणाचा समावेश आहे.
आत्तापर्यंतच्या वाटचालीत आलेल्या आव्हानांवर मात करत संस्थेचा हा प्रवास असाच पुढे सुरु राहणार आहे.
Scroll to Top
Skip to content