पुणे, दि. २७ : महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष आणि अणुशास्त्रज्ञ डॉ. यशवंत रामचंद्र वाघमारे यांचे आज पहाटे ३.०० वाजता निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, जावई, दोन नातवंडे तसेच दोन बंधू आणि एक बहिण असा परिवार आहे.
डॉ. वाघमारे यांना महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली!
डॉ. वाघमारे हे अणुशास्त्रज्ञ होते. त्यांनी नोबेल पारितोषिकप्राप्त शास्त्रज्ञ दिवंगत मारिया जी. मायर यांच्या समवेत असिस्टंट रिसर्च फिजिसिस्ट म्हणून १९६३ ते १९६५ या काळात अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठात काम केले. त्यानंतर आय.आय.टी. कानपूरमध्ये १९६६ ते १९९७ असे प्रदीर्घ काळ त्यांनी अध्यापनाचे कार्य केले. या कार्यकाळात त्यांनी असंख्य विद्यार्थी घडवले.
डॉ. वाघमारे सन २००० पासून महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष होते. मएसो आबासाहेब गरवारे महाविद्यालय, मएसो गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स आणि मएसो इन्स्टिट्यटूट ऑफ मॅनेजमेंट अँड करिअर कोर्सेस यांच्यातर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या माहिती तंत्रज्ञान, विज्ञान आणि व्यवस्थापन विषयक आंतरराष्ट्रीय परिषदांमागे डॉ. वाघमारे यांची प्रेरणा आणि मार्गदर्शन राहिले आहे. या परिषदांसाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील व्याख्यात्यांना निमंत्रित करण्यात त्यांचा सक्रीय सहभाग असे. अगदी अलीकडेच मएसो इन्स्टिट्यटूट ऑफ मॅनेजमेंट अँड करिअर कोर्सेसतर्फे ‘क्वान्टम फिजिक्स’ या विषयीची व्याख्यानमाला त्यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती.
संस्थेच्या विविध सभांमध्ये, कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन ते आपुलकीने मार्गदर्शन करत. संस्थेच्या विविध शाखांमध्ये जाऊन ते विद्यार्थ्यांशी सहजपणे संवाद साधून त्यांना प्रेरणा देत. संस्थेच्या प्रगतीसाठी ते वेळोवेळी उपयुक्त सूचना करत असत. संस्थेचे पदाधिकारी, कर्मचारी यांच्याशी ते मोकळेपणाने संवाद साधत असत.
डॉ. वाघमारे १९६५-६६ मध्ये अमेरिकेतील केंब्रिजमधील मॅसाच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये रिसर्च असोसिएट म्हणून ते कार्यरत होते.
डॉ. वाघमारे यांनी ८० पेक्षा अधिक शोधनिबंध तसेच न्यूक्लिअर फिजिक्स, न्यूक्लिअर सायन्स अँड इंजिनिअरींग, क्वाँटम मेकॅनिक्स, रीलेटिव्हीटी आदी विषयांवर ७ पुस्तकांचे लिखाण केले असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली १३ विद्यार्थ्यांनी पीएच.डी. प्राप्त केली आहे.
डॉ. वाघमारे यांच्या अनेक विद्यार्थ्यांनी जीवनात प्रतिष्ठा प्राप्त केली आहे. त्यामध्ये आय.आय.टी. गांधीनगरचे डायरेक्टर डॉ. रजत मूना, गुगल-पे चे उपाध्यक्ष अमरिष केंघे, भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे माजी सचिव डॉ. आशुतोष शर्मा, ‘मोजो नेटवर्क’चे संस्थापक डॉ. प्रवीण भागवत यांचा त्यामध्ये समावेश आहे.
आय.आय.टी. कानपूरचे माजी डायरेक्टर डॉ. संजय धांडे यांचा डॉ. वाघमारे यांच्याशी दीर्घकाळ संबंध होता. आयआयटी कानपूरमधील विद्यार्थी आणि नंतरच्या काळात सहकारी म्हणून डॉ. वाघमारे यांच्या स्मृतींना त्यांनी उजाळा दिला.
डॉ. वाघमारे विद्यार्थ्यांमध्ये अतिशय लोकप्रिय होते. एम.एस्सी. आणि पीएच.डी. प्रमाणेच ‘जेईई’च्या अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले. उत्तम शिक्षक म्हणून ख्यातनाम असलेले प्रो. हरिश्चंद्र वर्मा हे त्यांचेच विद्यार्थी. आय.आय.टी. कानपूरमध्ये प्रा. रमेश सिंगरू आणि प्रा. गिरीजेश मेहता हे डॉ. वाघमारे यांचे अतिशय निकटचे साहाय्यक सहकारी होते.
डॉ. वाघमारे सगळ्यांबरोबर मिळूनमिसळून रहात आणि अनेकांना वेळोवेळी मदत करत. आपल्या घरी आलेल्या व्यक्तींचे ते अतिशय आपुलकीने आणि आनंदाने आदरातिथ्य करत असत. आपल्या सहकाऱ्यांशी त्यांचे वर्तन मित्रत्वाचे असायचे. विशेष म्हणजे डॉ. वाघमारे क्रिकेट अतिशय उत्तम खेळायचे. आय.आय.टी. कानपूरमध्ये शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात होणाऱ्या सामन्यांमध्ये ते आवर्जून खेळत असत. निवृत्तीनंतर पुण्यात स्थायिक झाल्यानंतर देखील डॉ. वाघमारे यांच्याशी विद्यार्थी आणि सहकारी प्राध्यापकांचा ऋणानुबंध कायम होता. पुण्यात स्थायिक झालेल्या अनेक सहकाऱ्यांशी त्यांचे कौटुंबिक जिव्हाळ्याचे घनिष्ठ संबंध होते, अशी आठवण डॉ. संजय धांडे यांनी सांगितली.
आय. आय. टी. कानपूरमध्ये डॉ. वाघमारे यांनी फिजिक्स विभागाचे प्रमुख, विद्यार्थी कल्याण व विकास विभागाचे अधिष्ठाता आणि अनेकदा कार्यवाहक डायरेक्टर म्हणून त्यांनी काम पाहिले.
देश-विदेशातील अनेक विद्यापीठे आणि उच्च शिक्षण संस्थांमध्ये ते मानद व्याख्याते म्हणून जात असत.
डॉ. वाघमारे यांनी इंडियन असोसिएशन ऑफ फिजिक्स टिचर्सचे अध्यक्ष आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनच्या विश्वस्त मंडळाचे सदस्य, मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष म्हणूनही काम बघितले.
पुण्यातील ‘आयुका’ आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या फिजिक्स विभागाशी ते निगडित होते.