कोरोना साथीमुळे ‌सध्या पुणे शहरामध्ये रक्ताचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण झाला असून रुग्णांबरोबरच त्यांच्या नातेवाईकांना गंभीर समस्येला तोंड द्यावे लागत आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रक्त संकलनाची आवश्यकता आहे. हे लक्षात घेऊन म. ए. सो. गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स आणि म.ए.सो  कला व वाणिज्य रात्र महाविद्यालय यांनी सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून आज (मंगळवार, दि. २० एप्रिल २०२१) संयुक्तपणे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.

सह्याद्री हॉस्पिटल ब्लड बँकेच्या सहकार्याने महाविद्यालयाच्या असेंब्ली हॉलमध्ये घेण्यात आलेल्या या शिबिरात महाविद्यालयातील ३५ विद्यार्थ्यांनी या वेळी रक्तदान केले.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव सहस्रबुद्धे, उपाध्यक्ष सीए अभय क्षीरसागर, नियामक मंडळाचे सदस्य विजय भालेराव, संस्थेच्या आजीव सदस्य मंडळाचे अध्यक्ष डॉ. आनंद लेले, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. गीता आचार्य, महाविद्यालयाचे उपप्राचार्य सीए (डॉ.) सुदाम धोंगटे पाटील, महाविद्यालयाचे उपप्राचार्य व संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे, सहाय्यक सचिव इंजिनिअर सुधीर गाडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

रक्तदाब, मधुमेह असलेल्या आणि कोरोनाचा संसर्ग झालेल्या ५५ पेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींनी रक्तदान करू नये तसेच रक्तदाब व मधुमेह असलेल्या ५५ पेक्षा कमी वयाच्या व्यक्तींनी HBA1C ही चाचणी करून मगच रक्तदान करावे, रक्तदाब व मधुमेह नसलेल्या ५० पेक्षा जास्त वयोगटातील महिलांनीच रक्तदान करावे, कोरोनाचा संसर्ग होऊन गेलेल्या प्लाझ्मा दात्यांनी सध्या रक्तदान करू नये, कोरोनाप्रतिबंधक लस घेतलेल्या व्यक्तींनी एक महिन्यानंतरच रक्तदान करावे असा सल्ला वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ देत आहेत.

सध्याच्या गंभीर परिस्थितीत मोठ्या प्रमाणावर रक्ताची गरज असल्याने रक्तदानासाठीचे सर्व निकष पूर्ण करू शकणाऱ्या जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदानासाठी पुढे येण्याची आवश्यकता असल्याचे स्पष्ट होत आहे. कोरोनाची महामारी सुरू होण्यापूर्वीची परिस्थिती आणि सद्यस्थिती यामध्ये असलेला हा मोठा फरक लक्षात घेण्याची गरज आहे.

छायाचित्रात (डावीकडून) – म. ए. सो. गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्सचे उपप्राचार्य सीए (डॉ.) सुदाम धोंगटे पाटील, महाविद्यालयाचे उपप्राचार्य व संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. गीता आचार्य, मएसोच्या नियामक मंडळाचे उपाध्यक्ष सीए अभय क्षीरसागर, नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव सहस्रबुद्धे, नियामक मंडळाचे सदस्य विजय भालेराव, संस्थेचे सहाय्यक सचिव इंजिनिअर सुधीर गाडे व संस्थेच्या आजीव सदस्य मंडळाचे अध्यक्ष डॉ. आनंद लेले.

 

Scroll to Top
Skip to content