पुणे, दि. १९ : कोरोना साथीमुळे सध्या पुणे शहरामध्ये रक्ताचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण झाला असून रुग्णांबरोबरच त्यांच्या नातेवाईकांना गंभीर समस्येला तोंड द्यावे लागत आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रक्त संकलनाची आवश्यकता आहे. हे लक्षात घेऊन म.ए.सो. आबासाहेब गरवारे महाविद्यालयाने सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून सह्याद्री हॉस्पिटल ब्लड बँकेच्या सहकार्याने आज (सोमवार, दि. १९ एप्रिल २०२१) महाविद्यालयाच्या असेंब्ली हॉलमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव सहस्रबुद्धे, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे, सहाय्यक सचिव इंजिनिअर सुधीर गाडे, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. (डॉ.) पी.बी. बुचडे, डेक्कन जिमखाना पोलीस ठाण्याचे सहाय्यक उपनिरीक्षक वाणी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
महाविद्यालयाचे विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. नितीन आडे, युथ रेडक्रॉसचे प्रा. प्रवीण दुसाने, राष्ट्रीय छात्रसेनेच्या भूदल विभाग प्रमुख प्रा. प्रवीण दुसाने, राष्ट्रीय छात्र सेनेच्या नौदल विभागाचे प्रमुख प्रा. ज्ञानेश्वर कांबळे, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. अविनाश शेलार, महाविद्यालयाचे प्रबंधक किसन साबळे यांचा शिबिराच्या आयोजनात विशेष सहभाग होता.
महाविद्यालयातील ४० विद्यार्थ्यांनी या वेळी रक्तदान केले.
रक्तदाब, मधुमेह असलेल्या आणि कोरोनाचा संसर्ग झालेल्या ५५ पेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींनी रक्तदान करू नये तसेच रक्तदाब व मधुमेह असलेल्या ५५ पेक्षा कमी वयाच्या व्यक्तींनी HBA1C ही चाचणी करून मगच रक्तदान करावे, रक्तदाब व मधुमेह नसलेल्या ५० पेक्षा जास्त वयोगटातील महिलांनीच रक्तदान करावे, कोरोनाचा संसर्ग होऊन गेलेल्या प्लाझ्मा दात्यांनी सध्या रक्तदान करू नये, कोरोनाप्रतिबंधक लस घेतलेल्या व्यक्तींनी एक महिन्यानंतरच रक्तदान करावे अशी माहिती डेक्कन जिमखाना येथील सह्याद्री हॉस्पिटलच्या डॉ. शैलजा पारगांवकर यांनी या वेळी दिली.
सध्याच्या गंभीर परिस्थितीत मोठ्या प्रमाणावर रक्ताची गरज असल्याने वरील सर्व सूचनांचे पालन करून जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदानासाठी पुढे येण्याची आवश्यकता असल्याचे स्पष्ट होते. कोरोनाची महामारी सुरू होण्यापूर्वीची परिस्थिती आणि सद्यस्थिती यामध्ये असलेला हा मोठा फरक लक्षात घेण्याची गरज आहे.
म. ए. सो. गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स आणि म.ए.सो कला व वाणिज्य रात्र महाविद्यालय यांनी संयुक्तपणे उद्या (मंगळवार, दि. २० एप्रिल २०२१) सह्याद्री हॉस्पिटल ब्लड बँकेच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. म. ए. सो. गरवारे कॉलेज असेंब्ली हॉलमध्ये सकाळी ९.०० ते दुपारी १.०० या वेळेत हे शिबिर होणार आहे.
कोथरूडमधील मयूर कॉलनीतील म.ए.सो. इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड करीअर कोर्सेसमध्ये देखील उद्या (मंगळवार, दि. २० एप्रिल २०२१) दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या सहकार्याने सकाळी १०.०० ते दुपारी १.०० या वेळेत रक्तदान शिबिर आयोजित केले आहे.