शिक्षक आणि विद्यार्थ्यांना मिळणार तज्ञांचे मार्गदर्शन

मएसो शिक्षण प्रबोधिनी व मएसो व्यक्तिमत्व विकास केंद्र यांच्यावतीने शिक्षक आणि विद्यार्थ्यांना तज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यासाठी पौड रस्त्यावरील सरस्वती भवन येथे तयार करण्यात आलेल्या ‘व्हर्च्युअल क्लासरूम’चे उद्घाटन महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष डॉ. यशवंत वाघमारे आणि संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव सहस्रबुद्धे यांच्या हस्ते आज (बुधवार, दि. ५ जानेवारी २०२२) करण्यात आले. या व्हर्चुअल क्लासरूमच्या माध्यमातून संस्थेच्या पुण्यातील व पुण्याबाहेरील शाखांमधील शिक्षक आणि विद्यार्थ्यांना एकाचवेळी तज्ञांचे मार्गदर्शन मिळणार आहे. पुणे महानगर पालिकेच्या शाळांमधील शिक्षकांना देखील या व्हर्चुअल क्लासरूमचा लाभ मिळणार आहे. या प्रसंगी संस्थेचे माजी सचिव प्रा. वि.ना. शुक्ल यांचे उद्धाटनपर सत्र आयोजित करण्यात आले होते.

संस्थेच्या आजीव सदस्य मंडळाचे सदस्य डॉ. अतुल कुलकर्णी, गोविंद कुलकर्णी, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

प्रा. शुक्ल यांनी आपल्या मार्गदर्शनपर सत्रात बोलताना म्हणाले की, ‘व्हर्च्युअल क्लासरूम’च्या माध्यमातून शिकवणे हा शिक्षकांसाठी अतिशय आनंददायी अनुभव ठरेल. ‘व्हर्च्युअल क्लासरूम’ ही विचार मंथनाचे व्यासपीठ व्हावे त्यातून, विद्यार्थ्यांबरोबरच समाजाला देखील फायदा होईल. शिक्षणाच्या क्षेत्रात आजपर्यंत प्रश्न वेगळे होते. परंतू कोरोनाच्या साथीमुळे विद्यार्थी-पालक-शिक्षक यांची प्रत्यक्ष भेट होत नसल्याने निर्माण झालेला संवादाचा अभाव हा एक वेगळाच प्रश्न उभा राहीला.

काळाबरोबर समस्यादेखील बदलल्या, पण त्या सोडविणारे आपणच आहोत. मागील दोन-अडीच वर्षात ऑनलाईन माध्यमातून शिक्षण सुरू आहे. मात्र, त्यातून विद्यार्थ्यांच्या मनातील शंका समजत नाहीत, प्रत्यक्ष वर्ग भरत नसल्याने शिकवण्यात जिवंतपणा वाटत नाही, शंकानिरसन करण्याची संधी मिळत नाही, ऑनलाईन शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या साधनांचा विद्यार्थ्यांकडे अभाव आहे, त्यामुळे शिक्षणाची प्रक्रिया अपूर्ण राहिली आहे. केवळ परीक्षेत मिळवलेल्या गुणांच्या आधारे विद्यार्थ्याचे मूल्यमापन होऊ शकत नाही. या सर्व समस्यांवर विचारमंथन झाले आहे का? या सर्व समस्यांवर उपाय शोधण्याचे काम आपल्यालाच करायचे आहे.

क्रमिक शिक्षणाच्या पलीकडे विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, सामाजिक भान, नीतिमूल्य रुजवणे ही शिक्षणाची उपांगे आहेत, त्यातूनच व्यक्ती आणि समाज घडतो. भाषा विषयातून विद्यार्थ्यांचा भावात्मक विकास होतो व त्यांचे मूल्यवर्धन होते. इतिहासाच्या शिक्षणातून आपला वारसा, जगातील अन्य देशांपेक्षा आपले वेगळेपण याची जाणीव होते, त्यातूनच त्याची जडणघडण आणि सांस्कृतिक विकास होतो. त्यामुळे आपण शिकवत असलेल्या विषयातून आपण कोणती मूल्ये रूजवू शकतो याचा विचार प्रत्येक शिक्षकाने केला पाहिजे, त्यावर चर्चा झाली पाहिजे. शिक्षक हा चिंतनशील, व्यासंगी आणि जाणीवा जागृत असणारा असला पाहिजे. शिक्षकाने संवेदनशीलपणे स्वतःमधील उणीवा दूर केल्या तर तो विद्यार्थ्यांना शिक्षणाचा आनंद देऊ शकतो. देशासमोरच्या समस्या सोडविण्याची पूर्वतयारी शिक्षकाने करून घेतली पाहिजे. देशाच्या उज्ज्वल भविष्याचा पाया रचणारे आपण आहोत, आपली ही जबाबदारी शिक्षकांनी झटकू नये. आपली भूमिका न सोडता विद्यार्थ्यांसाठी पथदर्शक ठरूया!

प्रा. शुक्ल यांनी यावेळी विद्यार्थ्यांसाठी कोणते उपक्रम घेता येतील?, पालकांनी विद्यार्थ्यांना सांगायचे उपक्रम कोणते, शिक्षकांनी स्वतःसाठी कोणते उपक्रम करावेत? याबाबात सविस्तर मार्गदर्शन केले. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने सुरू केलेला हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद असून ही सुविधा संस्थेच्या शाखांमधील विद्यार्थी आणि शिक्षकांपुरती मर्यादित न राहता त्याद्वारे मएसो शिक्षण प्रबोधिनी आणि मएसो व्यक्तिमत्व विकास केंद्राचा विस्तार व्हावा आणि शिक्षण संस्कृतीत त्यांचे स्थान निर्माण व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव सहस्रबुद्धे यांनी पुणे महानगर पालिकेच्या शाळांमधील चाळीस शिक्षकांना पहिल्या टप्प्यात मएसो शिक्षण प्रबोधिनीतर्फे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे यावेळी बोलताना सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मएसो शिक्षण प्रबोधिनीचे सहाय्यक संचालक केदार तापीकर यांनी तर सूत्रसंचालन वर्षा न्यायाधीश यांनी केले.

 

 

 

 

 

 

Scroll to Top
Skip to content