“महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने २०२३ सालापर्यंत क्लस्टर युनिव्हर्सिटी स्थापन करण्याचे ध्येय निश्चित केले होते, आपल्या व्हिजन डॉक्युमेंटमध्ये या संकल्पाचा उल्लेखदेखील करण्यात आला होते. मात्र, संस्था २०२४ मध्येच क्लस्टर युनिव्हर्सिटी स्थापन करण्यास सिद्ध झाली आहे. त्यामुळे संस्थेने आता अधिक मोठे ध्येय बाळगले पाहिजे,” अशी अपेक्षा संस्थेचे मा. अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांनी आज (मंगळवार, दि. १९ नोव्हेंबर २०२४) व्यक्त केली. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या १६४ व्या वर्धापनदिनी संस्थेच्या मुख्य कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या छोटेखानी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
या वेळी संस्थेचे मा. उपाध्यक्ष श्री. प्रदीप नाईक, संस्थेच्या नियामक मंडळाचे मा. अध्यक्ष श्री. बाबासाहेब शिंदे, मा. उपाध्यक्षा सौ. आनंदीताई पाटील, संस्थेच्या नियामक मंडळाचे आणि आजीव सदस्य मंडळाचे मा. सदस्य, संस्थेचे मा. सचिव डॉ. अतुल कुलकर्णी, मा. सहाय्यक सचिव श्री. सुधीर भोसले, संस्थेचे माजी सचिव श्री. आर. व्ही. कुलकर्णी, संस्थेच्या मुख्य कार्यालयातील कर्मचारी या वेळी उपस्थित होते.
एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) पुढे म्हणाले की, कार्याच्या विस्तारासाठी आंतरराष्ट्रीय शैक्षणिक संस्थांशी करार करणे, संस्थेच्या सर्व महाविद्यालयांनी ‘नॅक सर्टिफिकेशन’ मिळवणे, शाखांच्या विकासासाठी प्रत्यक्ष कृती करणे, कौशल्य आणि नवसर्जनाला प्रोत्साहन देणे या दिशेने वाटचाल करण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने आपल्या १६४ वर्षांच्या वाटचालीत शिक्षण आणि संस्कार यांच्या माध्यमातून सक्षम पिढ्या घडविल्या आहेत. सध्याची सामाजिक परिस्थिती लक्षात घेता सुसंस्कृत समाज निर्माण करण्यासाठी अधिक प्रयत्न करण्याची गरज आहे.
संस्थेच्या नियामक मंडळाचे मा. अध्यक्ष श्री. बाबासाहेब शिंदे संस्थेच्या कार्याची दिशा स्पष्ट करताना म्हणाले की, राष्ट्रीय शिक्षण देण्याच्या उद्देशाने संस्थापकांनी संस्थेची स्थापना केली, तो वारसा आपण पुढे नेत आहोत ही आनंद आणि अभिमानाची बाब आहे. १६४ वर्षांच्या वाटचालीत संस्थेने नेहमीच कालानुरूप बदल केले आहेत. संस्थेच्या नवीन नियामक मंडळाने वर्षाच्या सुरवातीलाच एक चिंतन बैठक घेऊन त्यामध्ये काही संकल्प केले, ते पूर्ण करण्यासाठी निश्चित योजना, उपक्रम आखण्यात आली आणि त्यादृष्टीने आज आपण समाधानकारक प्रगती केली आहे. आगामी वर्षात आपल्या संस्थेचे लॉ कॉलेज आणि इंजिनिअरिंग कॉलेज सुरू होईल. संस्थेने क्लस्टर युनिव्हर्सिटीसाठी प्रस्ताव दाखल केला आहे. समाजातील सर्व घटकांना आणि परवडणारे शिक्षण उपलब्ध करून देताना निधीची मोठ्या प्रमाणावर गरज असते. त्यादृष्टीने प्रयत्नांचा एक भाग म्हणून दरवर्षी कृतज्ञता निधी संकलित करण्याचा संकल्प करण्यात आला होता. त्याला देखील सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. राज्याच्या सहा जिल्ह्यांमध्ये कार्यरत असलेल्या आपल्या संस्थेचे कार्य आता जम्मू आणि काश्मीरमध्ये देखील सुरू झाले आहे. संस्थेच्या कार्याचा विस्तार करत असताना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. निश्चित ध्येय डोळ्यासमोर ठेवून केलेल्या कामामुळे समाधान देखील मिळते. समाजावर शिक्षणाचा परिणाम झाली की समाजाचा शिक्षणावर परिणाम झाला याचे भान बाळगले पाहिजे आणि सभ्य, सुसंस्कृत समाज घडविण्यासाठी अधिक कृतिशील होण्याची गरज आहे. देशाच्या राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला मूलभूत अधिकार दिले आहेत, त्याचप्रमाणे मूलभूत कर्तव्ये देखील सांगितली आहेत. सभ्य आणि सुसंस्कृत विद्यार्थी म्हणजेच पर्यायाने समाज घडविण्यासाठी आपण प्रत्येकाने नागरी शिष्टाचार, पर्यावरणाचे संरक्षण, कुटुंबाचे प्रबोधन, कोणाच्या मनात न्यूनगंड, वेगळेपणाची भावना निर्माण होणार नाही याची खबरदारी घेणे आणि समाजातील सर्वांना सामावून घेणे ही पंचसूत्री व्यक्तिगत आणि सामाजिक स्तरावर आचरणात आणण्याची आवश्यकता आहे. संस्थेच्या विविध शाखांमधून शिकणाऱ्या चाळीस हजार विद्यार्थ्यांच्या माध्यमातून हे विचार समाजातील सर्व घटकांपर्यंत आपण पोहोचविले पाहिजेत.
संस्थेचे मा. उपाध्यक्ष श्री. प्रदीप नाईक आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, संस्थेचा १६४ वा वर्धापनदिन साजरा करताना आनंद वाटतो आहे. संस्थेचे वय वाढणे म्हणजे अनुभवाचे संचित जमा होणे. संस्थेच्या कार्याचा विस्तार होत असताना सकस, बुद्धिमान नेतृत्व निर्माण होणे आवश्यक असते, त्याकडे लक्ष द्यावे लागेल. विज्ञान आणि तंत्रज्ञानाची प्रगती होत असली तरी आपल्या समाजाची स्थिती ठीक नाही. ही परिस्थिती सुधारण्यासाठी मानवी मनाचे परिवर्तन आवश्यक आहे, त्यासाठी अध्यात्म आणि संतांची शिकवण आपल्याला सहाय्यभूत ठरते. सुसंस्कृत समाज घडविण्यासाठी आपण याचा विचार केला पाहिजे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे मा. सचिव डॉ. अतुल कुलकर्णी यांनी तर आभार प्रदर्शन संस्थेचे मा. सहाय्यक सचिव श्री. सुधीर भोसले यांनी केले.
संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सचिन आंबर्डेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.