पालक आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी सध्याच्या काळात खूप कष्ट घेतात, ते बघून शिक्षण क्षेत्रासाठी काही करावे अशी कल्पना मनात आली. त्यासंबंधात विचार करत असताना सामाजिक भान जपणाऱ्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे नाव समोर आले आणि शैक्षणिक कार्यासाठी याच संस्थेला देणगी देण्याचे निश्चित केले. मी दिलेल्या देणगीतून संस्थेने अतिशय उत्तम इमारत बांधून पूर्ण केली याचा मला आनंद वाटतो. सामाजिक जबाबदारी म्हणून चांगली संस्था निवडून अनेकदा आर्थिक मदत केली. आजपर्यंत मतिमंद, वृद्ध व्यक्तिंसाठी चांगली संस्था निवडून कार्य केले. शिक्षणामुळे समाजात प्रबोधन होईल आणि समाजातील गरजू व्यक्तींचे जीवन अधिक सुसह्य होईल तसेच पत्नीची आठवण कायम राहिल अशी इच्छा मनात होती, ती आता पूर्ण झाली आहे अशा शद्बात संस्थेचे हितचिंतक व देणगीदार मा. वसंत ठकार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

मएसो बाल शिक्षण मंदिर इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये बांधण्यात येणाऱ्या नवीन तीन वर्गखोल्यांचे भूमिपूजन आणि मएसो इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड करिअर कोर्सेस या शाखेच्या नवीन इमारतीतील प्रवेशानिमित्त गणेशपूजन असा कार्यक्रम अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर आज (मंगळवार, दि. ३ मे २०२२) आयोजित करण्यात आला होता. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांच्या हस्ते हे दोन्ही कार्यक्रम झाले. या वेळी मएसो इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड करिअर कोर्सेसच्या नवीन इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या प्रेक्षागृहात झालेल्या औपचारिक कार्यक्रमात मा. वसंत ठकार बोलत होते.

यावेळी संस्थेचे मा. उपाध्यक्ष डॉ. यशवंत वाघमारे आणि श्री. प्रदीप नाईक, संस्थेच्या नियामक मंडळाचे मा. अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव सहस्रबुद्धे, मा. उपाध्यक्ष सीए अभय क्षीरसागर, मएसो बाल शिक्षण मंदिर इंग्लिश मिडियम स्कूलच्या शाला समितीचे अध्यक्ष आ.वा. कुलकर्णी, मएसो आयएमसीसीचे संचालक डॉ. संतोष देशपांडे, संस्थेचे सहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे व्यासपीठावर उपस्थित होते. तसेच संस्थेच्या नियामक मंडळाचे व आजीव सदस्य मंडळाचे सदस्य, ठकार कुटुंबिय, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेच्या नियामक मंडळाचे मा. उपाध्यक्ष सीए अभय क्षीरसागर यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात त्यांनी मएसो आयएमसीसीच्या स्थापनेपासूनच्या वाटचालीचा आढावा घेतला. १९८३ साली २० ते ३० विद्यार्थी संख्येने सुरू झालेल्या आयएमसीसीत आज १३०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. नव्या इमारतीमुळे व्यवस्थापनाचे शिक्षण देणाऱ्या महाविद्यालयासाठी आवश्यक असलेल्या सर्व गरजा पूर्ण झाल्या असून असून येत्या २-३ वर्षात आयएमसीसीतील विद्यार्थ्यांची संख्या २००० पर्यंत पोहोचेल, अशी माहिती दिली. या वाढीत सर्वांचेच मोठे योगदान असून ही अक्षय्य ऊर्जा अशीच टिकून राहो अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या माजी विद्यार्थ्यी संघाच्या https://maa.mespune.in या संकेतस्थळावर विनाशुल्क अधिकृत सदस्यत्वासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधेचे https://maa.mespune.in/https-forms-gle-fovurzd5vhgf1ai98 उद्घाटन एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांच्या हस्ते या वेळी करण्यात आले. त्यांनी स्वतः या लिंकवरील  https://forms.gle/FovuRZD5VhGf1Ai98 गुगल फॉर्म भरून आपली सदस्यत्व नोंदणी केली.

नव्या इमारतीच्या उभारणीत योगदान देणाऱ्या सर्वांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

आपल्या भाषणात एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) म्हणाले की, शिक्षण संस्था जितके काम करतील, तितके ते कमीच असते. ‘मएसो’ संस्थापकांचे उद्दीष्ट शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांना संस्कार देणे हे देखील होते. अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करण्याची प्रथा आहे, आम्ही मात्र सोन्यासारखी माणसे जोडतो. मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षण घेऊन या संस्थेतून बाहेर पडतील. श्री. वसंत ठकार यांना त्यांच्या सामाजिक कार्यासाठी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी योग्य वाटली.  मएसो बाल शिक्षण मंदिर इंग्लिश मिडियम स्कूलमधील वातावरण कायमच आनंदी असते. अशा वातावरणात शिकलेले विद्यार्थी नावलौकीक मिळवतील. नवी पिढी सक्षम झाली तरच देश सक्षम होईल आणि देशाचा विकास होईल, त्यात जुन्या पिढीचे हितदेखील आहे.

मएसो आयएमसीसीचे संचालक डॉ. संतोष देशपांडे यांनी आभार प्रदर्शन केले. बांधकाम क्षेत्रातील तज्ञांच्या योगदानाने नवी वास्तू उभी राहिली आहे, या वास्तुमध्ये सक्षम विद्यार्थी घडतील याची खात्री आहे असे ते या वेळी म्हणाले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मएसो आयएमसीसीतील सहाय्यक प्राध्यापक डॉ. अश्विनी पाटील यांनी केले.

मएसो बाल शिक्षण मंदिर इंग्लिश मिडियम स्कूलमधील भूमिपूजनानिमित्त करण्यात आलेली पूजा शाळेच्या उच्च माध्यमिक विभागातील शिक्षिका सौ. कांचन मापारी व त्यांचे यजमान श्री. श्रीकांत मापारी यांच्या हस्ते करण्यात आली. तसेच मएसो इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड करिअर कोर्सेस या शाखेच्या नवीन इमारतीतील प्रवेशानिमित्त मएसो आयएमसीसीमधील सहयोगी प्राध्यापक आणि ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या प्रमुख डॉ. मानसी भाटे व त्यांचे यजमान श्री. समीर भाटे यांनी गणेशपूजन  केले.

 

Scroll to Top
Skip to content