महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सौ. विमलाबाई गरवारे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या नूतनीकरण करण्यात आलेल्या इमारतीचे आज (शुक्रवार, दि. २० ऑगस्ट २०२१) उद्घाटन करण्यात आले. गरवारे हायटेक फिल्म्स लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी व संचालक मा. सी. जे. पाठक यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली आणि गरवारे हायटेक फिल्म्स लिमिटेडच्या मनुष्यबळ आणि प्रशासन विभागाचे अध्यक्ष डॉ. विहार राखुंडे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.

या वेळी व्यासपीठावर संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. यशवंत वाघमारे आणि मा. प्रदीप नाईक, संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट मा. राजीव सहस्रबुद्धे, नियामक मंडळ सदस्य व शाला समितीच्या अध्यक्ष सौ. आनंदी पाटील, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे, सहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. अनिता नाईक हे उपस्थित होते.

शाळेच्या सुमारे ८० वर्ष जुन्या असलेल्या इमारतीचे नूतनीकरण गरवारे चॅरिटेबल ट्रस्टच्या सहयोगाने करण्यात आले आहे. शाळेतील शैक्षणिक व पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत. नैसर्गिक प्रकाशाचा उपयोग करून घेण्याच्या दृष्टीने करण्यात आलेल्या सुधारणांमुळे वीजेच्या खर्चात बचत होणार आहे. मुळातच भव्य आणि प्रशस्त असलेल्या शाळेच्या या इमारतीचे नूतनीकरण केल्यामुळे तेथील हवेशीर, स्वच्छ, सुंदर वातावरणाने शाळेतील विद्यार्थ्यांच्या आनंदात आणि उत्साहात भर पडणार आहे. शासनाने शाळेच्या इमारतीला ‘हेरिटेज वास्तू’चा दर्जा दिला आहे. नूतनीकरण झालेल्या शाळेच्या या इमारतीमुळे पुणे शहराच्या सौंदर्यात आणि वैभवात भर पडली आहे.

या प्रसंगी बोलताना मा. सी. जे. पाठक म्हणाले की, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके, वामन प्रभाकर भावे आणि लक्ष्मण नरहर इंदापूरकर यांनी सर्वांपर्यंत दर्जेदार शिक्षण पोहोचवण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवले होते. संस्था आणि संस्थेच्या शाळांमधील शिक्षक अतिशय कष्टपूर्वक त्याच दिशेने वाटचाल करत आहेत. त्यामुळेच कला, क्रीडा, वैचारिक प्रगल्भता अशा सर्व अंगांनी शाळेतील विद्यार्थ्यांचा विकास झालेला दिसून येतो. त्यामुळेच शाळेला नांवलौकिक मिळाला आहे. शाळेचे अनेक माजी विद्यार्थी देश-विदेशात विविध क्षेत्रात उच्चपदस्थ म्हणून कार्यरत आहेत. कंपनीच्या कामाच्या निमित्ताने प्रवास करताना त्यांची गाठ पडते आणि सहजपणे आपुलकीची भावना निर्माण होते, ते आवर्जून शाळेची चौकशी करतात. अशा या गुणवंत विद्यार्थी घडवणाऱ्या शाळेला आणि संस्थेला कै.आबासाहेब गरवारे आणि कै. विमलाबाई गरवारे यांनी आर्थिक सहकार्य केले होते. आबासाहेब गरवारे यांचे बालपण अतिशय हालाखीच्या परिस्थितीत गेले. त्यांनी सुरवातीला लहान-मोठी कामे केली पण त्यांचे व्हिजन मोठे होते. त्यामुळे तंत्रज्ञान, कच्चामाल आणि पैशाचा अभाव असताना देखील त्यांनी उच्च तंत्रज्ञानावर आधारित उद्योग आपल्या देशात आणि पर्यायाने महाराष्ट्रात आणले. सामान्य माणसांतले असामान्यत्व पुढे आणण्यासाठी त्यांनी विविध संस्थांना मदत केली. त्यांच्या पश्चात त्यांचे चिरंजीव मा. शशिकांत गरवारे हे देखील त्या सर्व संस्थांना मदत करत आहेत. आबासाहेब आणि विमलाबाई गरवारे यांनी घालून दिलेल्या मार्गावर वाटचाल करत गरवारे चॅरिटेबल ट्रस्ट आणि गरवारे परिवार विविध विधायक कामे करत आहे. सौ. विमलाबाई गरवारे प्रशालेच्या नूतनीकरणासाठी आर्थिक सहयोग करण्यात आला असून संस्थेने केलेला शाळेचा कायापालट पाहून त्यांनी संस्थेला धन्यवाद दिले आहेत.

‘मएसो’चे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, शशिकांत गरवारे यांना शाळेबद्दल जी आपुलकी आहे ती, त्यांनी दिलेल्या आर्थिक सहयोगा इतकीच मोलाची आहे. हेरिटेज वास्तूसाठी असलेले सर्व निकष पाळून शाळेच्या इमारतीचे अतिशय सुंदर नूतनीकरण झाले आहे. शाळेबद्दल वाटणाऱ्या कृतज्ञतेतूनच अनेक माजी विद्यार्थी शाळेला विविध प्रकारे सहकार्य करत असतात. त्यातूनच शाळेचे ‘सुबोधवाणी’ हे वेब रेडिओ केंद्र सुरु झाले आहे, शाळेत इलेक्ट्रॉनिक क्लासरुम तयार झाल्या आहेत. शाळेबरोबर असलेली नाळ जीवनात कायम राहाते. शिक्षण हा जीवनाचा पाया आहे, ते आनंददायी व्हावे यासाठी शाळेतील शिक्षकांनी प्रयत्न केले पाहिजेत. समृद्ध भारताच्या निर्मितीसाठी सक्षम नागरिक घडवण्यासाठी शिक्षकांनी अभ्यासक्रम, वर्गातील शिक्षण याच्यापलीकडे जाऊन प्रयत्न करण्याची गरज आहे. आज देशात उद्योजक तयार होण्याची गरज आहे, त्यासाठी रोलमॉडेल म्हणून सर्वांनी आबासाहेब गरवारे यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजे.
कार्यक्रमाच्या सुरवातीला संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष मा. राजीव सहस्रबुद्धे यांनी संस्थेच्या आणि शाळेच्या वाटचालीचा आढावा घेतला आणि शाळेच्या इमारतीच्या नूतनीकरणामागील भूमिका विशद केली.

शाळेतील शिक्षिका सौ. पद्मा पटवर्धन यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर इंजि. सुधीर गाडे यांनी आभार प्रदर्शन केले.

Scroll to Top
Skip to content