पुणे, दि. १७ : खेळांचे सामने सुरु होण्याची उत्कंठा, क्रीडाज्योतिच्या आगमनाने प्रफुल्लित झालेली मने, वनराजाच्या वेषातील शुभंकराच्या दर्शनाने रोमांचित झालेले खेळाडू आणि तिरंगी फुगे आकाशात सोडून स्पर्धेची घोषणा झाल्यानंतर विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षक-पालकांनी केलेला जल्लोश अशा वातावरणात मएसो क्रीडा करंडक स्पर्धेला आज (शुक्रवार, दि. १७ जानेवारी २०२०) येथे सुरवात झाली. ही स्पर्धा तीन दिवस चालणार असून भांडारकर रस्त्यावरील मएसो बाल शिक्षण मंदिर ही शाळा या स्पर्धेची संयोजक आहे.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या क्रीडावर्धिनीतर्फे मयूर कॉलनीतील मएसो इंग्लिश मिडीयम स्कूलच्या मैदानावर इ. १ ली ते इ. ४ थी तील विद्यार्थ्यांसाठी ही राज्यस्तरिय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली असून स्पर्धेचे हे दहावे वर्ष आहे. अर्जुन पुरस्कार विजेते आणि मुष्टियुद्धाचे आंतरराष्ट्रीय खेळाडू मनोज पिंगळे यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. ‘मएसो’चे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. यशवंत वाघमारे आणि प्रदीप नाईक, संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे, नियामक मंडळाच्या सदस्य व शाला समितीच्या अध्यक्षा आनंदीताई पाटील, नियामक मंडळाचे सदस्य व मएसो क्रीडावर्धिनीचे अध्यक्ष विजय भालेराव, मएसो क्रीडावर्धिनीचे महामात्र सुधीर भोसले, मएसो क्रीडावर्धिनीचे समन्वयक प्रा. शैलेश आपटे, ‘मएसो’चे सचिव डॉ. भरत व्हनकटे, साहाय्यक सचिव सुधीर गाडे  आणि भांडारकर रस्त्यावरील मएसो बाल शिक्षण मंदिर शाळेचे मुख्याध्यापक भाऊ बडधे व पूर्वप्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका रोहिणी फाळके यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

अर्जुन पुरस्कार विजेत्या पहिल्या महिला खेळाडू शकुंतला खटावकर या वेळी आवर्जून उपस्थित होत्या.

या स्पर्धेत लंगडी, गोल खो-खो, डॉजबॉल व सूर्यनमस्कार या सांघिक क्रीडा प्रकारांमध्ये मुले व मुली अशा स्वतंत्र गटात बाद पद्धतीने सामने खेळविण्यात येणार आहेत. तसेच सायंकाळचे सत्र हे विद्युत प्रकाशझोतात घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या अहमदनगर, बारामती, सासवड, शिरवळ, पनवेल, कळंबोली, नवी मुंबईतील बेलापूर, सोलापूर आणि पुणे अशा विविध ठिकाणच्या १३ शाळा तसेच पुण्यातील अन्य शिक्षण संस्थांच्या ७ शाळा अशा एकूण २० शाळांमधील १२०० विद्यार्थी-विद्यार्थिनी या स्पर्धेत सहभागी होत आहेत. सांघिक पारितोषिकांबरोबरच प्रत्येक क्रीडा प्रकारातील तीन उत्कृष्ट खेळाडूंना स्मृतिचिन्ह व प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात येणार आहे.

मुष्टियुद्धाचे आंतरराष्ट्रीय खेळाडू मनोज पिंगळे यांनी, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने सांघिक खेळांबरोबरच ऑलिंपिक स्पर्धेत समावेश असलेल्या वैयक्तिक खेळांच्या प्रशिक्षणाची सोय करावी आणि त्यांच्या स्पर्धांदेखील आयोजित कराव्यात अशी अपेक्षा आपल्या भाषणात व्यक्त केली.

‘मएसो’चे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, “‘मएसो’च्या शतकोत्तर हीरक महोत्सवी वर्षात आयोजित होत असलेल्या या स्पर्धेच्या संयोजनाची संधी माझ्या मएसो बाल शिक्षण मंदिर या शाळेला मिळाली आहे याचा मला आनंद वाटतो. पिंगळे यांनी सुचविल्याप्रमाणे वैयक्तिक क्रीडा प्रकारांचे प्रशिक्षण सुरु करण्याबाबत संस्थेकडून निश्चितपणे विचार केला जाईल.”

विद्यार्थ्यांना लहानपणापासून खेळाची आवड निर्माण व्हावी व आरोग्य चांगले राहावे या उद्देशाने तसेच प्राथमिक शाळांमधील (इ. १ ली ते ४ थी) विद्यार्थ्यांसाठी शासकीय पातळीवर कोणत्याही क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जात नसल्याने ही उणीव भरून काढण्यासाठी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या क्रीडा वर्धिनीतर्फे सन २०११ पासून ‘मएसो क्रीडा करंडक’ स्पर्धा आयोजित करण्यात येतात.

Scroll to Top
Skip to content