डॉ. श्यामा घोणसे

१९ नोव्हेंबर २०२० ला ‘महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी’ शतकोत्तर हीरक महोत्सव वर्षपूर्ती साजरी करत आहे. साध्या सोप्या भाषेत बोलायचे तर महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे ने महाराष्ट्राच्या शिक्षणक्षेत्राला अखंडपणे १६० वर्षे आपले अमूल्य योगदान दिलेले आहे. संस्था म्हणून विचार करता हा कालखंड तेजस्वी हिऱ्याला बावन्नकशी सोन्याचे कोंदण लाभावे असा लखलखित, देदीप्यमान असला तरी, कसल्याही सत्ता-संपत्ती-धनदांडगेपणा यांचा वरदहस्त नसल्यामुळे, कसोटी पाहणारा होता.

वामन प्रभाकर भावे, लक्ष्‍मण नरहर इंदापूरकर यांच्यासारखे शिक्षणातून राष्ट्रीय वृत्तीचा जागर करणारे शिक्षक आणि क्रांतिकारक विचारसरणीचे आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्यासारखे क्रांतीला शिक्षणाची जोड देणारे द्रष्टे सचिव, खजिनदार आणि वैयक्तिक विकासाच्या ध्यासाला समाजहिताची, राष्ट्रीय अस्मितेची जोड देणारा सुजाण पालकवर्ग या त्रिसूत्रीतून महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची गंगोत्री उगम पावली. त्यामुळेच परकीय सत्तेच्या रोषाचा, लाभालाभाचा विचार न करता ‘मएसो’च्या या ज्ञानगंगोत्रीने आज “केजी टू पीजी” आणि सेवाभावी वैद्यकीय शिक्षणाबरोबरच पत्रकारिता, व्यवसायाभिमुख कौशल्ये विकसित करीत नवीन पिढीला आत्मनिर्भर बनविणारे विविध  अभ्यासक्रम शिकविणाऱ्या ७७ शाखांइतका पल्ला गाठलेला आहे. केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही आपली नाममुद्रा उमटविणाऱ्या विविध क्षेत्रातील हजारो विद्यार्थ्यांच्या रूपाने योगदान देत   विशाल रूप धारण केले.                                            .

विविध शाखा विस्तारलेल्या ‘मएसो’चे “क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे” हे बोधवाक्य!

‘मएसो’चा इतिहास खूप मोठा आहे. या प्रवासात चढ-उतार, वाटा, वळणे खूप आहेत. प्राध्यापक म्हणून, आजीव सदस्य, नियामक मंडळ सदस्य आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या १६० वर्षांच्या इतिहासातील आजीव सदस्य मंडळाची पहिली महिला अध्यक्ष म्हणून माझ्या संस्थेबद्दल भरभरून बोलण्यासारखेही खूप आहे. माझा आणि संस्थेचा ऋणानुबंध जवळपास तीन तपांहून अधिक आहे.

शिक्षणाचे होणारे बाजारीकरण, या क्षेत्रात होणारे काही स्तुत्य तर काही काळजीमग्न करणारे बदल, ज्ञानाची विस्तारलेली क्षेत्रे आणि विद्यार्थी-शिक्षकांचे तुटत चाललेले नाते, पालकांचा अनाठाई हस्तक्षेप, बदलती शैक्षणिक धोरणे या सगळ्यांची गेली किमान चाळीस वर्षे मी साक्षी आहे, त्याची घटक आहे. या पार्श्वभूमीवर गेली १६० वर्षे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी अक्षुण्ण प्रवास करु शकली; त्याची कारणमीमांसा करीत असताना काही गोष्टी नमूद करायलाच हव्यात. आपापल्या क्षेत्रात नामांकित असूनही संस्थेसाठी सेवाभावी वृत्तीने, निरलसपणे योगदान देणारे संचालक मंडळ, प्रयोगशील शिक्षक आणि या प्रयोगातही त्यांचे विद्यार्थ्यांशी असणारे आत्मीय नाते, समर्पण वृत्तीचे शिक्षकेतर बंधू-भगिनी आणि स्वागतशील, सहकार्य करणारे पालक यांची प्रदीर्घ परंपरा महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीला लाभलेली आहे. “शिक्षण विशिष्ट वर्गाची मक्तेदारी नाही”, सामाजिक समरसतेचा प्रयोग करीत असताना शिक्षण हे प्रभावी साधन आहे याचे भान आणि जाण असलेले द्रष्टे क्रियावंत मएसोला आरंभापासूनच लाभले. त्यामुळेच त्यावेळची सासवड, बारामतीसारखी छोटी गावे असतील,वैद्यकीय शिक्षणाच्यादृष्ट्या, वैद्यकीय सुविधेच्यादृष्ट्या दुर्लक्षित असलेल्या लोटे घाणेखुंटसारख्या दुर्लक्षित भागात, महानगरातल्या माथाडी कामगारबहुल आव्हानात्मक उपनगरात, ‘मएसो’ पोहोचली. स्त्री शिक्षण हा आरंभापासूनच ‘मएसो’च्या ध्येयधोरणातील भाग असल्यामुळे इथे मुलींची संख्याही अधिक आहे. शिक्षणाला आत्मसामर्थ्य-संपन्नतेची जोड देणारी महाराष्ट्रातील मुलींची पहिली सैनिकी शाळा काढण्याचा प्रयोगही इथेच रुजला, बहरला आहे.

हे सारे, यासारखे सारे जे आहे ते, नोंद घेण्यासारखे आहेच. पण यापेक्षाही अधिक महत्त्वाचे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने अनेक पिढ्यांशी नाते जोडलेले आहे. म्हणूनच, आजोबा-आजी ते नातवंडे ‘मएसो’चेच विद्यार्थी असल्याचे पिढीजात चित्र दिसते. आपापल्या क्षेत्रात कर्तृत्वसंपन्न, मुद्रांकित असणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबरच आपले दररोजचे साधे परंतु सदाचारसंपन्न जीवन जगणारे, प्रतिकूलतेतही आपल्या घासातला घास समाजासाठी  देणारे, चारित्र्यसंपन्न  विद्यार्थी/नागरिक घडविण्याचे कार्यही ‘मएसो’ने केलेले आहे. त्यामुळेच एअरपोर्टवर भेटणारा एखादा रुबाबदार अधिकारी मी ‘मएसो’चा आहे, हे ज्या आत्मीयतेने सांगतो; त्याच आत्मीयतेने,अभिमानाने सांगणारे रिक्षावाले काका सहजपणे भेटतात. कडक सॅल्यूट ठोकत मी ‘मएसो’ची आहे सांगणारी महिला अधिकारी असेल किंवा एखाद्या प्रदर्शनात जिच्या कलाकुसरीचे कौतुक करावे ती व्यावसायिक भगिनी ‘मएसो’ची असते आणि भाजीचा हिशेब चोखपणे देणारी,आत्मियतेने भाजीची पिशवी गाडीत ठेवणारी मैत्रिणी “मी ‘मएसो’ची” असे सांगते तेव्हा कळते मित्रमैत्रीणींनो की, माझी मएसो कशी, कुठे-कुठे, किती प्रभावीपणे रूजली आहे. जेव्हा ‘मएसो’च्या एखाद्या शाखेचे म्हणजे शाळेचे किंवा काॕलेजचे नाव घेतले जाते, तेव्हा मूळ प्रवाह किंवा प्रभाव महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचाच असतो.

…तर मग आपण आज एकमेकांना शुभेच्छा देऊयात…

आपण एकशे साठ वर्षांचे झालो…१६१ व्या वर्षात प्रवेश केला आहे…

मनःपूर्वक शुभेच्छा आणि

“हो ‘मएसो’… तू आमच्या श्वासात, ध्यासात आणि स्वप्नातही आहेस…

तुझ्यामुळेच आम्ही आहोत, तुझ्यामुळेच आम्ही आहोत, सदैव तुझ्याबरोबरच राहण्याचा आशीर्वाद तू आम्हांला दे!”

  • डॉ. श्यामा घोणसे
Scroll to Top
Skip to content