देशाचे मा. पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांनी आज (रविवार, दि. ६ मार्च २०२२) पुण्यातील पहिल्या मेट्रो रेल्वे मार्गिकेचे उद्घाटन केले. गरवारे कॉलेज ते आनंदनगर या स्थानकांदरम्यान स्वतः मा. पंतप्रधानांनी मेट्रो रेल्वेतून प्रवास केला.

या वेळी त्यांच्यासमवेत प्रवास करण्याची संधी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सौ. विमलाबाई गरवारे प्रशालेतील विद्यार्थ्यांना मिळाली. अंजली हळदे, सायली देवरूखकर, रसिका शिखरे, रिद्धी शेलोत, सिद्धी वाणेकर, आदित्य काळे, अनिकेत भट्टाचार्य, ओंकार अलिसे, सनी आरोळे, प्रवीण जलदे या विद्यार्थ्यांना हे सुवर्ण क्षण अनुभवता आले.

https://www.youtube.com/watch?v=OdQyHMUOi1U

प्रवासादरम्यान या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मा. पंतप्रधानांनी विद्यार्थ्याचे नाव, शाळा, संस्था याबाबत माहिती विचारली. मराठी भाषा आपल्याला खूप आवडते असे सांगितले. घरून शाळेत कसे येता? आता मेट्रो रेल्वेचा उपयोग करणार का? अशी विचारपूस केली. त्यावर विद्यार्थिनींनी मेट्रो रेल्वेमुळे सुरक्षितपणे प्रवास करता येईल आणि शहर देखील प्रदुषणमुक्त होईल असे उत्तर दिले. मेट्रो रेल्वेचा आग्रहपूर्वक उपयोग करा असे मा. पंतप्रधानांनी त्यांना सांगितले. तसेच भविष्यात कोण व्हायचे आहे? असा प्रश्न विचारला. त्यावर रसिका शिखरे या विद्यार्थिनीने पोलीस होणार असल्याचे सांगितल्यावर मा. पंतप्रधानांनी रसिकाचे कौतुक केले.

मा. पंतप्रधानांची झालेली भेट आणि त्यांच्या समवेत मेट्रो रेल्वेने पहिला प्रवास करण्याची मिळेलेली संधी यामुळे झालेला आनंद शब्दात व्यक्त करता येणार नाही असे या विद्यार्थ्यांनी सांगितले.

 

Scroll to Top
Skip to content