महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे माजी विद्यार्थी आणि आय.आय.टी., कानपूरमध्ये केमिकल इंजिनिअरींग विभागात प्रोफेसर म्हणून कार्यरत असलेले शास्त्रज्ञ डॉ. योगेश जोशी यांना विज्ञान क्षेत्रात अतिशय मानाची समजली जाणारी जे. सी. बोस राष्ट्रीय पाठ्यवृत्ती मिळाली आहे. केमिकल इंजिनिअरींगच्या क्षेत्रात प्रा. योगेश जोशी यांनी दिलेल्या योगदानाचा गौरव या पाठ्यवृत्तीमुळे झाला आहे.

भारत सरकारच्या काऊन्सिल ऑफ सायंटिफीक अँड इंडस्ट्रीयल रिसर्च (सीएसआयआर) या संस्थेतर्फे देण्यात येणाऱ्या शांती स्वरुप भटनागर पारितोषिकाने सन्मानित असलेल्या, वैज्ञानिक शिक्षण संस्थेच्या सभासद असलेल्या आणि विज्ञान क्षेत्रात असामान्य कर्तृत्व सिद्ध केलेल्या कार्यरत शास्त्रज्ञाला भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या अंतर्गत असलेल्या सायन्स अँड इंजिनिअरींग रिसर्च बोर्ड या संस्थेतर्फे ही पाठ्यवृत्ती दिली जाते.

व्यक्तिगत पाठ्यवृत्ती म्हणून प्रति महिना २५ हजार रुपये, संशोधन अनुदान म्हणून पाच वर्षांपर्यंत प्रतिवर्ष १५ लाख रुपये पाठ्यवृत्तीधारकाला तसेच अतिरिक्त खर्चासाठी यजमान संस्थेला एक लाख रूपये देण्यात येतात. पाठ्यवृत्ती काळातील संशोधन कार्याचे कठोर मूल्यमापन करून पाठ्यवृत्तीचा कालावधी दर पाच वर्षांसाठी वाढविण्यात येऊ शकतो. तसेच पाठ्यवृत्तीधारकाच्या ६८ व्या वर्षापर्यंत यजमान संस्था त्याला पाठ्यवृत्ती देऊ शकते.

डॉ. योगेश जोशी अनेक पुरस्कारांचे मानकरी असून २०१५ मध्ये त्यांना ‘सीएसआयआर’तर्फे शांती स्वरुप भटनागर पारितोषिकाने गौरविण्यात आले आहे. २०१८ साली त्यांना आय.आय. टी., कानपूरतर्फे डिस्टिन्क्विश टिचर्स अॅवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

शांती स्वरुप भटनागर पारितोषिक मिळाल्याबद्दल महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या वतीने दि. २२ मार्च २०१६ रोजी ‘मएसो’चे माजी विद्यार्थी आणि ज्येष्ठ उद्योगपती पद्मश्री डॉ. अरुण फिरोदिया यांच्या हस्ते प्रा. योगेश जोशी यांच्या सत्कार करण्यात आला होता.

डॉ. योगेश जोशी हे मएसो बाल शिक्षण मंदिर, भांडारकर रस्ता आणि मएसो सौ. विमलाबाई गरवारे प्रशाला या शाखांचे माजी विद्यार्थी आहेत. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या वतीने डॉ. योगेश जोशी यांचे हार्दिक अभिनंदन!

 

 

Scroll to Top
Skip to content