पुणे, दि. २८ : “ आत्मनिर्भर, आत्मविश्वासपूर्ण, देशासमोरच्या सर्व समस्यांवर मात करणारा, विकासशील देशांची भूमिका जागतिक पटलावर मांडणारा, राष्ट्रीय विचारांचा जागर करणारा आणि आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन मांडणारा भारत मार्गच आपल्या देशाला जगातील अग्रगण्य शक्ती बनवेल, गेल्या दहा वर्षात देशात झालेले परिवर्तन विस्मयकारक आहे,” असे प्रतिपादन देशाचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी आज येथे केले. त्यांनी लिहीलेल्या ‘द इंडिया वे’ या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद असलेल्या ‘भारत मार्ग’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. भारतीय जनता पक्षाच्या विदेश विभागाचे प्रभारी विजय चौथाईवाले यांची या वेळी सन्माननीय उपस्थिती होती.
या वेळी व्यासपीठावर महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्कि. राजीव सहस्रबुद्धे आणि भारतीय विचार साधनाचे अध्यक्ष डॉ. गिरीश आफळे उपस्थित होते.
‘द इंडिया वे’ या पुस्तकाचे मराठी भाषांतर सरिता आठवले यांनी केले असून भारतीय विचार साधनाने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी आणि भारतीय विचार साधना यांनी संयुक्तपणे या समारंभाचे आयोजन केले होते.
“परराष्ट्र सचिव असताना देशाची परराष्ट्र नीति सर्वांपर्यंत पोहोचावी असा आपला प्रयत्न होता. परराष्ट्र नीति ही दिल्लीत बसून ठरवता येणार नाही. आपल्या देशातील प्रत्येक राज्यांचे अनुभव वेगवेगळे आहेत, कारण प्रत्येक राज्याची पार्श्वभूमी वेगवेगळी आहे, भौगोलिक परिस्थिती वेगवेगळी आहे. त्यामुळे परराष्ट्र नीति ठरवताना या सर्व राज्यांचा सहभाग असेल तरच संपूर्ण देशाचे सारतत्व त्यात उमटते. परराष्ट्र सेवेतून निवृत्त झाल्यानंतर ‘द इंडिया वे’ हे पुस्तक लिहायला सुरवात केली. कार्यक्रमांमध्ये गेल्यावर विविध विषयांवरील आठ लेखांवर नागरिकांशी स्वतंत्रपणे चर्चा होत असे. त्यांच्याकडून मिळणाऱ्या प्रतिसादांचे सार या लेखनात समाविष्ट केल्याने या पुस्तकाची भाषा सर्वसामान्यांची आहे,” अशी माहिती जयशंकर यांनी या वेळी दिली. इतिहासातून आपण धडा घेतला पाहिजे याचे भान करून देणारा जागतिकीकरणातील त्रुटी व त्यामुळे निर्माण झालेली आव्हाने, दुराग्रहापोटी जगाबरोबर न बदलल्याने होणारे नुकसान, परराष्ट्र नीतितील जनभागीदारी, जागतिक महासत्ता असलेल्या चीनसारख्या शेजारी देशामुळे निर्माण होणारी आव्हाने, जपानशी असलेल्या संबंधांचा उपयोग, प्रशांत महासागरात निर्माण झालेला भारताचा प्रभाव, महाभारतातील कृष्णनीतिच्या माध्यमातून देशात कूटनीतिची संस्कृतीची वाढ अशा विविध विषयांवरील लेख या पुस्तकात आहेत. त्याचा उपापोह जयशंकर यांनी आपल्या भाषणात केला.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी बोलताना म्हणाले की, ‘भारत मार्ग’ या पुस्तकात आपल्या देशाचे परराष्ट्र धोरण सोप्या आणि सुंदर भाषेत मांडत असताना दिलेले वेगवेगळे संदर्भ महत्वाचे आहेत. या लिखाणाचा उद्देश भारताचा विचार, भारताची भूमिका विविध समुहांना स्पष्टपणे कळावा हा आहे. परराष्ट्र धोरणाचा परिणाम आता प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर होतो आहे. त्यामुळे परराष्ट्र धोरणाची माहिती सर्व नागरिकांना होणे आवश्यक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपण आपल्या देशाचा विचार करून तयार केलेले आणि जगातील कोणत्याही शक्तीच्या दबावाला बळी न पडलेले परराष्ट्र धोरण ठरवले.
विजय चौथाईवाले आपल्या भाषणात म्हणाले की, गेल्या आठ वर्षात देशाच्या परराष्ट्र धोरणाचे लोकशाहीकरण झाले आहे हे फार मोठे यश आहे. देशातील सर्वसामान्यांचे एकमत निर्माण होणे हे परराष्ट्र नीतिचे यश आहे. तटस्थ न राहता जागतिक घडमोडींमध्ये आपल्याला भाग घ्यावा लागेल हे लक्षात घेऊन भारताने आपली स्थिती मजबूत केली. युक्रेनमधील युद्धस्थितीतून २० हजार भारतीय विद्यार्थ्यांना सुखरूप परत आणणे त्यामुळेच शक्य झाले. भारताने सर्व बाजूंनी केलेल्या सज्जतेमुळेच भारत मार्ग आकाराला आला आहे आणि परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर हे त्याचे पुरस्कर्ते आहेत.
भारतीय विचार साधनाचे अध्यक्ष डॉ. गिरीश आफळे यांनी समारंभाच्या सुरवातीला उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले आणि भारतीय विचार साधनाच्या वाटचालीचा आढावा घेतला.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्कि. राजीव सहस्रबुद्धे यांनी मान्यवरांचे आभार मानले.
सौ. स्नेहल दामले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.