पुणे, दि. १७ : “ शिक्षण संस्थांनी क्रमिक शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना भारतीय जीवनमूल्ये शिकवण्याची आवश्यकता आहे, भारत म्हणजे काय? हे विद्यार्थ्यांना शिकवण्याची गरज आहे. भारताकडून जगाला अपेक्षा असताना जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये भारतीयतेबाबत विचार केला जात नाही ही परिस्थिती चिंताजनक आहे,” असे प्रतिपादन चेन्नईस्थित ज्येष्ठ विचारवंत, अर्थतज्ञ व सीए एस. गुरूमूर्ती यांनी आज येथे केले.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीतर्फे आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या १४२ व्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून ‘आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके स्मृती व्याख्यान’ या उपक्रमाचा शुभारंभ एस. गुरूमूर्ती यांच्या व्याख्यानाने आज (शुक्रवार, दि. १७ फेब्रुवारी २०२३) झाला. ‘भारत विश्वगुरू होण्यासाठी शैक्षणिक संस्थांची भूमिका’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता.
कोथरूडमधील मयूर कॉलनीतील मएसो ऑडिटोरीयम झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) होते तर संस्थेचे उपाध्यक्ष प्रदीप नाईक यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती. संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्कि. राजीव सहस्रबुद्धे, नियामक मंडळाच्या उपाध्यक्ष सौ. आनंदी पाटील आणि बाबासाहेब शिंदे, संस्थेचे साहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
“आज जगाने भारतावर प्रभाव टाकावा की, भारताने जगावर जगावर प्रभाव टाकावा हा चर्चेचा मुद्दा राहिला नसून भारताने भारताच्या पद्धतीने जगाला प्रभावित केले पाहिजे. ‘वसुधैव कुटुंबकम’ ही संकल्पना केवळ जगातील अन्य देश, तेथील समाज या पुरती मर्यादित नाही तर पृथ्वीवरील सर्व प्राणीमात्रांचा विचार त्यामध्ये आहे. पर्यावरणीय दृष्टीकोनातून ही संकल्पना अतिशय महत्वाची आहे. ती जगावर थोपवण्यासाठीची व्यवस्था नाही तर जगाने समजून घेऊन स्वीकारण्यासारखी जीवन पद्धती आहे. आपल्या देशातील सांस्कृतिक विविधता ही जगाला स्तिमीत करून टाकणारी आहे. संपूर्ण जगभरात जेवढी सांस्कृतिक विविधता आहे तेवढी सांस्कृतिक विविधता आपल्या एकाच देशात आहे. या विविधतेत परस्परांबद्दल असलेला आदरभाव समजून घ्यायला हवा, हेच आपल्या देशाचे सामाजिक भांडवल आहे. राष्ट्र निर्माण होतात आणि लयाला जातात. पण भारताचा पाया हा राजकीय, आर्थिक, सामरिक नसून सांस्कृतिक आहे, त्यामुळेच आपला देश चीरकाल टिकून आहे. देशाची ही संस्कृती आपल्या शिक्षण संस्थांमधून शिकवली जाण्याची गरज आहे. देशातील समाजाच्या मनात आज अनुभवास येणारा आत्मविश्वास हे केवळ सरकारचे कर्तृत्व नाही तर समाजाच्या मनातील राष्ट्रप्रेमाचा तो अविष्कार आहे. रामजन्मभूमीच्या सांस्कृतिक आंदोलनामुळे आपल्या समाजात आत्मभान निर्माण झाले, त्यातून हा आत्मविश्वास उदयाला आला. त्याचा प्रत्यय आज सर्वत्र येतो आहे. बँकिंग व्यवस्थेतील सुधारणा, ३७० कलम रद्द करणे, राष्ट्रविरोधी शक्तींच्या विरोधातील कारवाई अशा निर्णयांना समाजाचा मिळालेला पाठिंबा हे बदललेल्या जनमानसाचे प्रतिबिंब आहे. सीमेवर सातत्याने कागाळ्या करणाऱ्या चीनला त्याच्याच भाषेत उत्तर दिल्यानंतर संघर्षाची भूमिका सोडून चीनने केलेल्या चर्चेच्या विनंतीमुळे भारताबद्दल जगभरात एक सशक्त संदेश गेला. आपल्या देशाच्या हितासाठी आवश्यक असलेले सर्व निर्णय भारत घेत आहे. जगातील प्रत्येक प्रभावी देशाशी आपले मजबूत संबंध निर्माण झाले आहेत, हे चित्र दहा वर्षांपूर्वी नव्हते. आज जग भारताकडे मोठ्या अपेक्षेने बघत असताना अमेरिका, रशिया यासारख्या बलाढ्य देशांना पर्याय असलेला भारत आपल्याला घडवायचा नसून जगाने अनुकरण करावे असा संपूर्ण सृष्टीचा विचार करणारा आदर्श भारत निर्माण करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे,” असे गुरुमूर्ती या वेळी म्हणाले.
एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात पाश्चिमात्य देशांकडून हेतूपूर्वक पसरवल्या जाणाऱ्या मतप्रवाहाकडे लक्ष वेधले. माध्यमांमधून नकारात्मकता मांडली जात असताना विद्यार्थ्यांसमोर सकारात्मक गोष्टी आणण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या सुरवातील आर्कि. राजीव सहस्रबुद्धे यांनी प्रास्ताविक केले.
इंजि. सुधीर गाडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.