‘उच्चशिक्षणातील गुणवंतांचे ज्ञानप्रकियेतील योगदान आवश्यक’

ज्ञानाची निर्मिती, त्याची जपणूक, हस्तांतर आणि संपत्तीची निर्मिती ही उच्च शिक्षणाची मूलभूत उद्दिष्टे आहेत. उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात गुणवत्ता प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांनी या ज्ञानप्रकियेत योगदान देणे आवश्यक आहे. त्याचबरोबर समाजातील जीवनमूल्ये देखील महत्वाची ठरतात, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रभारी प्र-कुलगुरू मा. डॉ. संजीव सोनावणे यांनी आज (सोमवार, दि. २० मार्च २०२३) येथे केले. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीला समृद्ध शैक्षणिक परंपरा आहे. संस्थेने भविष्यात विद्यापीठ स्थापन केले तर ही संस्था शिक्षणाला वेगळ्या उंचीवर घेऊन जाईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या विविध महाविद्यालयांतील पदवी व पदव्युत्तर परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा आणि पीएच.डी. व एम.फिल. प्राप्त केलेल्या गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांच्या गौरव समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सोनावणे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष मा. प्रदीप नाईक होते.

संस्थेच्या नियामक मंडळाचे मा. अध्यक्ष आर्कि. राजीव सहस्रबुद्धे, उपाध्यक्ष श्रीमती आनंदीताई पाटील आणि श्री. बाबासाहेब शिंदे, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे व साहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

मएसो आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते ७० गुणवंतांचा गौरव करण्यात आला.

डॉ. सोनावणे पुढे म्हणाले की, “जास्तीत जास्त शिक्षण घेणे आणि पदवी प्राप्त करणे ही व्यक्तिमत्व विकासाची साधने आहेत. उच्च शिक्षणातून ज्ञाननिर्मिती होणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे ज्ञानाची निर्मिती होत नसलेल्या शिक्षण संस्थांना उच्च शिक्षण संस्था म्हणायचे का? असा विचार करावा लागतो. ज्ञान जपून ठेवण्याची, त्याची साठवणूक करण्याची साधने काळाप्रमाणे ठरतात. प्राचीन काळी मौखिक स्वरुपात ज्ञान साठवले जात होते, नंतरच्या काळात ते मुद्रित स्वरुपात साठवले जाऊ लागले. तंत्र बदलत गेली परंतू ज्ञानाची साठवणूक होत राहिली आणि ते पुढील पिढीला उपलब्ध होत राहिले. शिकवण्याची प्रक्रिया देखील तितकीच महत्वाची आहे. सध्याच्या काळात अनेक साधने आणि माध्यमे उपलब्ध आहेत, त्यामुळे महाविद्यालयातील वर्ग हाच फक्त शिकण्याचे केंद्र राहिलेला नाही. विविध माध्यमातून मिळालेल्या या ज्ञानातून संपत्तीची निर्मिती झाली पाहिजे. आपण समाजाचे  देणे लागतो, त्यामुळे उच्च शिक्षणात गुणवत्ता प्राप्त केलेल्या आपल्या विद्यार्थ्यांनी या प्रक्रियेत नेमके कोणते योगदान दिले हे उच्च शिक्षण संस्थांनी जाणून घेतले पाहिजे. ज्ञान मिळवणे जितके महत्वाचे आहे तितकेच आपले वर्तनदेखील महत्वाचे असते, आपली जीवनमूल्ये काय आहेत यावर आपले वर्तन अवलंबून असते. त्याकडे देखील सजगपणे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.”

संस्थेचे उपाध्यक्ष मा. प्रदीप नाईक आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी, शिक्षकांनी जे कष्ट घेतले, ते सार्थकी लागल्याने आजचा हा क्षण अनुभवाला येत आहे. राष्ट्रीय स्तरावर आणि सामाजिक क्षेत्रात सर्वत्र महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या विद्यार्थ्यांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. आजचे गुणवंत हेच संस्थेच्या भविष्यातील विद्यापीठाचे आधार ठरणार आहेत. आपला देश प्रगती करतो आहे, आत्मनिर्भरतेकडे देशाची वाटचाल सुरू आहे. त्यात संस्थेच्या गुणवंत विद्यार्थी आणि शिक्षकांचे योगदान अपेक्षित आहे.

डॉ. सुनीता भागवत यांनी गुणवंतांचा परिचय करून दिला.

गौरवप्राप्त गुणवंतांच्या वतीने डॉ. अजिंक्य देशपांडे, मनिषा तगारे आणि डॉ. शुभंकर पाल यांनी मनोगत व्यक्त केले.

संस्थेच्या नियामक मंडळाचे मा. अध्यक्ष आर्कि. राजीव सहस्रबुद्धे यांनी कार्यक्रमाच्या प्रारंभी केलेल्या प्रस्ताविकात संस्थेच्या १६२ वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेतला. तसेच संस्थेचे विद्यापीठ स्थापन करण्याची कल्पना व्यक्त केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ. वर्षा तोडमल यांनी केले.

डॉ. भरत व्हनकटे यांनी आभारप्रदर्शन केले.