म. ए. सो. आबासाहेब गरवारे महाविद्यालयाला मिळाली स्वायत्तता
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी आणि समाज यांच्यातील ऋणानुबंध अधिक बळकट करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन, जागतिक आव्हान ठरलेल्या कोरोना महामारीच्या परिस्थितीत केलेली सेवाभावी उपक्रमांचे आयोजन, संस्थेची १६० वर्षांची दैदिप्यमान वाटचाल मांडणाऱ्या ‘ध्यास पंथे चालता…’ या इतिहास ग्रंथाचे मा. उपराष्ट्रपतींच्या हस्ते झालेले प्रकाशन आणि या ग्रंथाची पहिली प्रत मा. राष्ट्रपतींना सादर करण्याचा अभिमानास्पद क्षण अशा विविध आनंददायी आणि प्रेरणादायी प्रसंगांनी संस्थेचे शतकोत्तर हीरक महोत्सवी वर्ष साजरे झाले. इतिहास ग्रंथाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमाने संस्थेच्या शतकोत्तर हीरक महोत्सवी वर्षाची सांगता करण्यात आली, अशी माहिती महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे यांनी आज (सोमवार, दि. १४ फेब्रुवारी २०२२) पत्रकार परिषदेत दिली. म. ए. सो. आबासाहेब गरवारे महाविद्यालयाला नुकतीच मिळालेली स्वायत्तता हा संस्थेच्या शैक्षणिक वाटचालीतील एक मैलाचा दगड आहे, असेही ते या वेळी म्हणाले.
संस्थेच्या शतकोत्तर हीरक महोत्सवी वर्षांची सांगता आणि म.ए.सो. आबासाहेब गरवारे महाविद्यालयाला मिळालेली स्वायत्तता या निमित्ताने ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या वेळी संस्थेच्या नियामक मंडळाचे सदस्य विजय भालेराव, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.बी.बुचडे, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे, संस्थेचे सहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे व्यासपीठावर उपस्थित होते.
म.ए.सो. आबासाहेब गरवारे महाविद्यालयाचे सर्व उपप्राचार्य, पदाधिकारी आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.
दि. १९ नोव्हेंबर २०१९ ते १९ नोव्हेंबर २०२० हे संस्थेचे शतकोत्तर हीरक महोत्सवी वर्ष होते. देशाचे मा. पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी, महाराष्ट्राचे मा. राज्यपाल श्री. भगतसिंह कोश्यारी, मा. मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या १६० व्या वर्षातील पदार्पणानिमित्त शुभेच्छा संदेश पाठवला होता.
संस्थेच्या शतकोत्तर हीरक महोत्सवी (१६० व्या) वर्षातील पदार्पणाचे औचित्य साधून संस्थापकांच्या मूळ छायाचित्रांवरून काढलेली तैलचित्रे तयार करून घेण्यात आली आणि संस्थेच्या प्रधान कार्यालयाच्या प्रवेशद्वारापाशी चित्रशिल्प बसविण्यात आले. संस्थेच्या लोगोमध्ये आवश्यक सुधारणा करण्यात आल्या. संस्थेच्या कार्याची माहिती सर्वदूर पोहोचावी यासाठी मराठी आणि इंग्रजी भाषेतील माहितीपट आणि माहिती पुस्तिका तयार करण्यात आली, अशी माहिती मा. राजीवजी सहस्रबुद्धे यांनी यावेळी दिली.
१६० व्या वर्षाचा प्रारंभ अभिवादन यात्रेने करण्यात आला. संस्थेच्या पुण्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांमधील विद्यार्थी, शिक्षक, प्रशासकीय कर्मचारी असे सुमारे २५०० जण त्यात सहभागी झाले होते. गरवारे महाविद्यालयाच्या मैदानावर संस्थेच्या माजी विद्यार्थी, शिक्षक, प्रशासकीय कर्मचारी आणि हितचिंतकांच्या स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता.
गरवारे महाविद्यालयाच्या आवारातील वर्तुळाकार इमारतीचे वाढीव बांधकाम पूर्ण करण्यात आले. मएसो आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या अमृत महोत्सवी इमारतीचे भूमीपूजन करून तिचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. संस्थेच्या मयूर कॉलनीतील आवारात म.ए.सो. आय.एम.सी.सी. या शाखेच्या इमारतीच्या चौथ्या मजल्याचे बांधकाम करण्यात आले. तसेच याच आवारात बांधण्यात येणाऱ्या एम.बी.ए. अभ्यासक्रमासाठीच्या नव्या इमारतीचे भूमीपूजन करण्यात आले. या इमारतीचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. डेक्कन जिमखाना येथील म.ए.सो. सौ. विमलाबाई गरवारे प्रशालेच्या इमारतीचे नूतनीकरण करण्यात आले असून ही ऐतिहासिक वास्तू आता अधिक दिमाखदार दिसत आहे.
संस्थेच्या शतकोत्तर हीरक महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने ‘व्यक्तिमत्व आणि करियर यातून देशसेवा’ या विषयावर माजी सनदी अधिकारी श्री. अविनाश धर्माधिकारी यांचे, ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि त्यापुढील आव्हाने’ या विषयावर प्रा. अनिरुद्ध देशपांडे यांचे तर ‘माझे ईशान्य भारतातील अनुभव आणि राष्ट्रीय एकात्मता’ या विषयावर भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सचिव श्री. सुनील देवधर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
इ. १० वी आणि इ. १२ वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या संधी या विषयावर ‘वेबिनार सिरीज’ची सुरवात करण्यात आली.
कोविड महामारीच्या काळात सामाजिक बांधिलकीच्या भूमिकेतून संस्थेने निधी संकलन, रक्तदान शिबिरे, गरजू व्यक्तींना धान्य वाटप, रुग्णांच्या विलगीकरणासाठी स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने उभारण्यात आलेले महाराष्ट्रातील पहिले विलगीकरण केंद्र, लसीकरणासाठी जागा उपलब्ध करून देणे, रुग्णालयात विशेष कोविड कक्षाची उभारणी, प्रबोधनपर ध्वनिचित्रफितीची निर्मिती इत्यादी अनेक उपक्रम राबविण्यात आले. सर्वसामान्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे या हेतूने महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी आणि दीनानाथ मंगेशकर रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘विनिंग स्ट्रॅटेजिज इन कोविड वॉर’ या विषयावर डॉ. धनंजय केळकर यांचे ऑनलाईन व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग आणि सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योग मंत्री मा. श्री. नितीन जी गडकरी यांचे व्याख्यान मंगळवार, दि. १७ नोव्हेंबर २०२० रोजी आणि केंद्रीय शिक्षण मंत्री मा. श्री. रमेश जी पोखरियाल ‘निशंक’ यांचे व्याख्यान बुधवार, दि. १८ नोव्हेंबर २०२० रोजी आयोजित करण्यात आले होते. कोविड-१९ मुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेऊन ही दोन्ही व्याख्याने ऑनलाईन माध्यमाद्वारे आयोजित करण्यात आली होती.
“भविष्यातील आपला देश घडवण्यासाठी आवश्यक असलेली दिशा आपल्या देशाला द्यायची आहे, तेच काम महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी करत आहे,” अशा शद्बात मा. नितीनजी गडकरी यांनी संस्थेच्या कार्याचा गौरव केला. डॉ. रमेशजी पोखरियाल ‘निशंक’ आपल्या व्याख्यानात म्हणाले की, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीसारख्या बहुमुखी आणि बहुआयामी संस्था राष्ट्रीय शिक्षण धोरणाचे आधारस्तंभ ठरतील.
‘ध्यास पंथे चालता…’ या इतिहास ग्रंथाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमाने संस्थेच्या शतकोत्तर हीरक महोत्सवी वर्षाची सांगता करण्यात आली, अशी माहिती मा. राजीवजी सहस्रबुद्धे यांनी या वेळी दिली.
म.ए.सो.च्या आबासाहेब गरवारे महाविद्यालयाला विद्यापीठ अनुदान आयोगाकडून दहा वर्षांसाठी स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा मिळाला आहे. म.ए.सो. अंतर्गत स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा मिळालेले हे दुसरे महाविद्यालय आहे, अशी माहिती देखील त्यांनी दिली.
प्राचार्य डॉ. पी. बी. बुचडे यावेळी बोलताना म्हणाले की, १९४५ साली स्थापन झालेल्या मएसो आबासाहेब गरवारे महाविद्यालयामध्ये आता २५ पदवीधर शिक्षण विभाग आहेत ज्यामध्ये १८ पदव्युत्तर आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मान्यताप्राप्त विज्ञान आणि कला विद्याशाखेतील ०७ संशोधन केंद्रे आहेत. महाविद्यालयात ५० पेक्षा जास्त अभ्यासक्रम शिकवले जातात. महाविद्यालयाला तीन वेळा NAAC द्वारे प्रमाणित करण्यात आले आहे. चालू वर्षात वरिष्ठ महाविद्यालयातील सुमारे पाच हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. महाविद्यालयात अद्ययावत वर्ग आणि प्रयोगशाळा आहेत. महाविद्यालयात ग्रंथालय आणि क्रीडाविषयक पायाभूत सुविधाही उपलब्ध आहेत. महाविद्यालयात अनेक विद्यार्थीकेंद्रित उपक्रमही राबवले जातात.
ऑगस्ट २०२० मध्ये महाविद्यालयाने स्वायत्त दर्जा मिळवण्याचा प्रस्ताव विद्यापीठ अनुदान आयोगाकडे सादर केला होता. कोविडच्या परिस्थितीमुळे सप्टेंबर २०२१ मध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाच्या तज्ज्ञ समितीने महाविद्यालयाला भेट दिली. प्रत्यक्ष पाहणीनंतर, विद्यापीठ अनुदान आयोगाच्या तज्ज्ञ समितीने महाविद्यालयाला स्वायत्त दर्जा देण्याची शिफारस केली.
नवीन शैक्षणिक धोरणाची वैशिष्ट्ये लक्षात घेऊन स्वायत्ततेत कौशल्य आधारित शिक्षणावर भर देणारे अभ्यासक्रम सुरू करण्याची महाविद्यालयाची इच्छा आहे. यामुळे विद्यार्थ्यांना पारंपारिक अभ्यासक्रमांद्वारे ज्ञान मिळू शकेल तसेच त्यांची रोजगारक्षमताही वाढेल. स्वायत्ततेअंतर्गत, भविष्यात व्यापक संधी असणारे अभ्यासक्रम सुरू करण्याचा महाविद्यालयाचा प्रस्ताव आहे. डेटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स तसेच नॅनोसायन्सेस आणि नॅनोटेक्नॉलॉजी यासारख्या विषयांमध्ये नवीन पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्याचा मानस आहे. नवीन स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीज आणि सेंटर फॉर गुड गव्हर्नन्स सुरू करण्याचीही महाविद्यालयाची इच्छा आहे. चांगले नेते आणि प्रशासक विकसित करण्यासाठी आणि जागतिक समस्यांबद्दल विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टीकोनातून हे अभ्यासक्रम विकसित करण्याची योजना आहे.
या वेळी मान्यवरांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली.
संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे यांनी प्रारंभी उपस्थितांचे स्वागत केले आणि मान्यवरांचा परिचय करून दिला.
संस्थेचे सहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे यांनी आभार प्रदर्शन केले.