पद्मभूषण डॉ. भालचंद्र दिगंबर उर्फ आबासाहेब गरवारे यांना १२० व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीतर्फे आज (गुरुवार, दि. २१ डिसेंबर २०२३) आदरांजली अर्पण करण्यात आली. मएसो आबासाहेब गरवारे महाविद्यालयातील त्यांच्या अर्धाकृती पुतळ्याला संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष मा. श्री. बाबासाहेब शिंदे व गरवारे ट्रस्टचे प्रतिनिधी मा. रामदास भगत यांनी पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले. तसेच महाविद्यालयाच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्यास देखील पुष्पहार अर्पण करून मान्यवरांनी त्यांना अभिवादन केले.
या प्रसंगी मएसोच्या आजीव सदस्य मंडळाचे अध्यक्ष डॉ. आनंद लेले, संस्थेचे सचिव डॉ. अतुल कुलकर्णी, सहाय्यक सचिव श्री. सुधीर भोसले, मएसो आबासाहेब गरवारे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विलास उगले, मएसो गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्सचे प्राचार्य डॉ. किशोर देसर्डा, उपप्राचार्य डॉ. विनायक पवार, प्राध्यापक सी. ए. डॉ. सुदाम घोंगटेपाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
यानिमित्ताने मएसो गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्समधील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात झालेल्या कार्यक्रमात मएसो आबासाहेब गरवारे कला व विज्ञान महाविद्यालय आणि मएसो गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्समधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. रामदास भगत उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. श्री. बाबासाहेब शिंदे यांनी भुषविले.
कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ गीताने झाली. त्यानंतर पद्मभूषण डॉ. आबासाहेब गरवारे यांच्या जीवनावर आधारित चित्रफीत दाखवण्यात आली. प्राचार्य डॉ. किशोर देसर्डा यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यानंतर महाविद्यालयाच्या वतीने प्रमुख पाहुण्यांचा व उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
बारावी कला, वाणिज्य व विज्ञान शाखेमधून प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना गरवारे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने रुपये दहा हजारांचे रोख पारितोषिक देण्यात आले. तसेच तृतीय वर्ष कला, वाणिज्य व विज्ञान शाखेमधून प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना मएसो च्या वतीने रुपये दहा हजारांचे रोख पारितोषिक देण्यात आले.
प्रमुख पाहुणे मा. श्री. रामदास भगत यांनी आपल्या भाषणात पद्मभूषण डॉ. आबासाहेब गरवारे यांच्या व्यावसायिक व सामाजिक यशोगाथेबद्दल उपस्थितांना माहिती दिली. श्री. आबासाहेब गरवारे यांनी कोणतीही पार्श्वभूमी नसताना आणि कोणतीही साधने हाती नसताना स्वतःच्या सामर्थ्यावर मोठे उद्योगविश्व उभे केले, हिमतीने व्यवसाय करण्याची जिद्द दाखवली व ती तडीस नेली, विद्यार्थ्यांनी देखील असाच आदर्श ठेवावा असे ते म्हणाले.
मा. श्री. बाबासाहेब शिंदे आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देताना म्हणाले, “सध्या विद्यार्थ्यांकडे वेगवेगळी साधने, मार्गदर्शन करणारे शिक्षक उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेऊन शिक्षणानंतर उद्योजकतेकडे वळण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा. या देशाला नोकरी मागणाऱ्यांची नाही, तर नोकरी देणाऱ्या तरुणांची गरज आहे, हे लक्षात ठेवून त्यांनी आपले ध्येय गाठायला हवे”.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक सी. ए. डॉ. सुदाम घोंगटेपाटील यांनी तर सूत्रसंचालन डॉ. जयश्री पवार यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय श्री. प्रतिक कांचन यांनी व आभार प्रदर्शन श्रीमती स्नेहल चौकटे यांनी केले.
या कार्यक्रमापूर्वी मएसो सौ. विमलाबाई गरवारे प्रशालेतील सौ. विमलाबाई गरवारे यांच्या अर्धाकृती पुतळ्याला गरवारे ट्रस्टचे प्रतिनिधी मा. रामदास भगत, मएसोच्या नियामक मंडळाचे सदस्य मा. अजय पुरोहित यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. प्रशालेचे मुख्याध्यापक आर.डी. भारमळ, उपमुख्याध्यापक श्री. संजय जाधव उपस्थित होते.