म.ए.सो.बालशिक्षण मंदिर इंग्लिश मिडीयम स्कूलने “वैज्ञानिकांशी गप्पागोष्टी” हा उपक्रम आयोजित केला असून देशातील ज्येष्ठ वैज्ञानिक विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. आपले अनुभव सांगतानाच ते विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देणार आहेत. या उपक्रमातील तिसरे व्याख्यान पदमविभूषण डॉ. जयंत नारळीकर यांचे झाले.

यावेळी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष डॉ. यशवंत वाघमारे आवर्जून उपस्थित होते. तसेच मोहन मोने व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. गीतांजली बोधनकर हे देखील उपस्थित होते.

डॉ. जयंत नारळीकर आणि डॉ. मंगला नारळीकर यांच्यासारख्या दिग्गज वैज्ञानिकांना भेटण्याची संधी मिळणार असल्यामुळे विद्यार्थ्यांनी पूर्वतयारी करून आपले प्रश्न तयार ठेवले होते. गुरुत्वाकर्षण लहरींचे उपयोजन होऊ शकते का? असल्यास कशाप्रकारे असू शकते? यांसारखे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांनी विचारले. नारळीकर सरांनी खेळीमेळीच्या वातावरणात विद्यार्थ्यांना विज्ञानाच्या जगात नेले. मुलांना आव्हानात्मक प्रश्न विचारलेले आवडतात हे नेमके हेरून नारळीकर सरांनी विद्यार्थ्यांना विचार करायला भाग पाडणारे प्रश्न विचारले. त्यामुळे विज्ञानविषयक गप्पा चांगल्याच रंगल्या.

डॉ. मंगला नारळीकर मॅडमना देखील गणितातील अनेक प्रश्नांची उकल विचारली. मोठी माणसे कोणतीही चांगली गोष्ट राखून ठेवत नाहीत याची प्रचितीच जणू या कार्यक्रमात आली. गणितातील विविध अडचणींवर मात करण्यासाठी वेगवेगळे मार्ग आपणच शोधायचे असतात त्यातूनच सर्जनशीलता वाढेल हे त्यांनी यावेळी नमूद केले.

“जय जवान, जय किसान आणि आता जय विज्ञान” या उक्तीप्रमाणे काळाची गरज लक्षात घेऊन मुख्याध्यापिका सौ.गीतांजली बोधनकर यांच्या कल्पनेतून हा उपक्रम आयोजित करण्यात येत आहे.

Scroll to Top
Skip to content