“नाटकाच्या माध्यमातून विविध विषय, प्रश्न हाताळले जात असतात, त्यातून त्या विषयाचे विविध पैलू समोर येतात आणि विचारांना चालना मिळते. नाट्यमहोत्सवात सादर होणाऱ्या विविध नाटकांमुळे विचारांच्या आदान-प्रदानाची संधी मिळते. ‘मएसो’चा हा नाट्यमहोत्सव महाविद्यालयांमधील सर्वच घटकांसाठी उपयुक्त ठरेल. नाटकाचा संबंध व्यक्तिमत्वाच्या विकासाशी आहे. रंगभूमीवर केलेल्या कामामुळेच आज मला या कार्यक्रमात प्रमुख पाहुणा म्हणून व्यासपीठावर दिग्गज व्यक्तींच्या शेजारी बसण्याची संधी मिळाली,” अशा शद्बात ‘मएसो’चे माजी विद्यार्थी आणि चित्रपटसृष्टीतील आघाडीचे लेखक -दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी नाट्यकलेचे महत्व अधोरेखित केले. ‘मएसो नाट्यमहोत्सवा’च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक उमेश कुलकर्णी हे देखील या प्रसंगी उपस्थित होते.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या १६३ व्या वर्धापनदिनानिमित्त संस्थेच्या वतीने प्रथमच ‘मएसो नाट्यमहोत्सव’ आयोजित करण्यात आला होता. त्याचे उद्घाटन लांजेकर यांच्या हस्ते नाट्यप्रयोगाची घंटा वाजवून करण्यात आले. संस्थेच्या पाच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध नाट्य स्पर्धांमध्ये सादर केलेल्या पाच एकांकिका या महोत्सवात सादर करण्यात आल्या.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), उपाध्यक्ष प्रदीप नाईक, संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे, उपाध्यक्षा सौ. आनंदी पाटील, संस्थेचे सचिव डॉ. अतुल कुलकर्णी या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते. संस्थेच्या नियामक मंडळ व आजीव सदस्य मंडळाचे सदस्य या महोत्सवाला आवर्जून उपस्थित होते.
ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक व मएसो भावे प्राथमिक शाळेचे माजी विद्यार्थी उमेश कुलकर्णी यांनी शाळेतच नाटकाची प्रेरणा मिळाल्याचे सांगितले. “शाळेतील भावे बाई दरवर्षी नाटक बसवण्यासाठी प्रेरित करायच्या. दरवेळेला नव्याने काहीतरी शिकायला मिळायचे, तो प्रवास अजूनही सुरू आहे. कला ही चांगलं जगायला शिकवते. नाटकातून स्वतःचा आणि जगाचा शोध घेण्याची वृत्ती तयार होते, त्याचबरोबर पडणारे प्रश्न आणि येणाऱ्या अडचणींना सामोरे जाण्याचे बळ मिळते. सध्याचा काळ हा असंख्य घडामोडींचा काळ आहे. इतिहास, वर्तमान आणि भविष्याची सरमिसळ केली जात आहे. ते समजून घेण्यासाठी नाटक हे सर्वात साधे व सोपे माध्यम आहे. कला ही माणसाला मुक्तपणे व्यक्त व्हायला शिकवते, नाटकाच्या माध्यमातून आपण आपले मत अधिक ठोसपणे मांडू या आणि सगळ्यांना तसे करण्यास शिकवू या,” असे ते यावेळी म्हणाले.
एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, जीवनात प्रत्येकालाच अभिनय करावा लागतो. सैन्यदलातील अधिकारी म्हणून आम्हाला देखील अभिनय करावा लागतो. आनंद किंवा दुःख व्यक्त करता येत नाही, भावनांना बांध घालावा लागतो. मनावर संयम ठेवून नाटक बघणे हा देखील तसाच प्रकार आहे.
मएसो ऑडिटोरियममध्ये दि. २४ व २५ नोव्हेंबर असे दोन दिवस हा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. त्याच्या उद्घाटनप्रसंगी सर्व एकांकिकांचे लेखक व दिग्दर्शक तसेच ‘मएसो’चे माजी विद्यार्थी असलेले ख्यातनाम सिनेमॅटोग्राफर मिलिंद जोग यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. नचिकेत पूर्णपात्रे व स्मिता शेवाळे या कलावंतानी महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी उपस्थित राहून नवोदित कलाकारांचा उत्साह वाढविला.
या नाट्य महोत्सवात मएसो कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्टस् ने योगेश सोमण लिखित व रश्मी देव दिग्दर्शित ‘कॅन्टीन’ ही एकांकिका, मएसो गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्सने सुधा देशपांडे व समृद्धी कुलकर्णी लिखित व दिग्दर्शित ‘रेडिओ’, मएसो सिनियर कॉलेजने समृद्धी पाटणकर लिखित व ओम चव्हाण दिग्दर्शित ‘थोडं तुझं थोडं माझं’, ‘उदगार, पुणे’ व मएसोच्या माजी विद्यार्थ्यांनी प्रवीण विठ्ठल तरडे लिखित व अनिरुद्ध अनिल दिंडोरकर दिग्दर्शित ‘वंशावळ’ तर एमईएस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड करियर कोर्सेसने अथर्व आनंद जोशी व ओम नितीन चव्हाण लिखित व दिग्दर्शित ‘जीना इसिका नाम है!’ या एकांकिका सादर केल्या.
नाट्य रसिकांनी विद्यार्थ्यांच्या या कलाकृतींना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.