“कौशल्य आणि मूल्यशिक्षणाची आज देशात गरज” – एअर मार्शल भूषण गोखले

“महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी यापुढे व्यावसायिक अभ्यासक्रमांवर भर देणार असून कौशल्यशिक्षण आणि मूल्यशिक्षण ही आज देशाची गरज आहे. संस्था नव्या इमारतीत वाणिज्य आणि व्यवस्थापन विषयक अभ्यासक्रम सुरु करणार असून या इमारतीला कै. सौ. प्रभा वसंत ठकार यांचे नांव देण्यात येईल. ही नवी इमारत पर्यावरणपूरक तर असेलच पण त्यामध्ये दिव्यांगांसाठी आवश्यक सुविधादेखील असतील. देशात लोकसंख्येच्या सुमारे २ टक्के व्यक्ती दिव्यांग आहेत. त्यांची काळजी घेणे ही सामुहिक जबाबदारी आहे. त्यामुळे संस्था ‘सावली’या संस्थेशी कायम नातं राखेल,” असे प्रतिपादन महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांनी आज येथे केले.

१९ नोव्हेंबर हा संस्थेचा वर्धापनदिन असून शतकोत्तर हीरक महोत्सवी वर्षाला (१६०) आजपासून सुरवात झाली. त्याचे औचित्य साधून संस्थेच्या मयूर कॉलनीतील आवारात बांधण्यात येणाऱ्या नव्या इमारतीच्या भूमीपूजन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. या इमारतीसाठी संस्थेचे माजी विद्यार्थी आणि ‘सावली’ या बहुविकलांग व गतिमंद मुलांसाठी कार्य करणाऱ्या संस्थेचे संस्थापक वसंत ठकार यांनी त्यांची पत्नी कै. सौ. प्रभा वसंत ठकार यांच्या स्मृतिप्रित्यर्थ त्यांच्या मुली सौ. वैशाली कानडे व बहुविकलांग असलेली वैदेही ठकार हीच्या हस्ते यावेळी संस्थेकडे निधी सुपूर्द केला.

या प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. यशवंत वाघमारे आणि प्रदीप नाईक, संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे, नियामक मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. माधव भट आणि अभय क्षीरसागर, वसंत ठकार आणि त्यांच्या मामी सुलभा खोले, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे, साहाय्यक सचिव सुधीर गाडे व्यासपीठावर उपस्थित होते.

वसंत ठकार यांनी आपल्या भाषणात, समावेशी शिक्षणाची आवश्यकता असल्याचे सांगितले. आपण वन्यजीवांच्या हक्कांबाबतदेखील जागरुक आहोत पण बहुविकलांग आणि मतिमंद व्यक्तींविषयी समाजात जागरुकता नाही. दिव्यांगांच्या बाबतीत कायदा आहे पण तो परिपूर्ण नाही आणि त्याची चांगल्या पद्धतीने अमलबजावणीदेखील होत नाही. कोणतीही शासकीय मदत मिळत नसताना ‘सावली’च्या माध्यमातून आम्ही काम सुरू ठेवले आहे. ‘मएसो’सारख्या शैक्षणिक संस्थांनी ‘सावली’ला दत्तक घेतले तर सर्वसमावेशी शिक्षणाचा एक आदर्श निर्माण होईल, असे ते म्हणाले.

स्वतःची संस्था असताना दुसऱ्या संस्थेला मदत करणाऱ्या व्यक्ती देवदुर्लभ असतात. श्री. ठकार यांनी ‘मएसो’वर दाखविलेला विश्वास सार्थ ठरवू. नवी इमारत एक वर्षाच्या कालावधीत बांधून पूर्ण केली जाईल असे संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले.

डॉ. मानसी भाटे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर डॉ. भाग्यश्री कश्यप यांनी ठकार कुटुंबियांचा परिचय करुन दिला.
डॉ. भरत व्हनकटे यांनी आभार प्रदर्शन केले.

Scroll to Top
Skip to content