पुणे, दि. १२ : “आपल्या देशाचा बाह्य जगाशी जेव्हा संबंध तुटला तेव्हा आपल्या देशाची अधोगती सुरू झाली. आपल्या व्यवस्थेत विद्यार्थ्यांच्या प्रज्ञेला वाव नाही, असा बंदिस्त समाज प्रगती कशी करू शकेल? आपल्याला जेव्हा प्रश्न पडतात, तेव्हाच बदलांना सुरवात होते. म्हणूनच आपल्या देशातील महान व्यक्तींनी व्यवस्था बदलण्यास सुरवात केली. त्यामागे देशातील माणूस जपण्याचा विचार होता. तंत्रज्ञानाने माणसांमधील विषमता दूर होते, त्यामुळे पाश्चिमात्य देशांमधील तंत्रज्ञान आपल्या देशात यावे आणि आपल्या देशातील तत्वज्ञान पाश्चात्यांना समजावे, त्यातून संपूर्ण जग एक होईल असा विचार स्वामी विवेकानंद यांनी मांडला,” असे प्रतिपादन एच. व्ही. देसाई महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ. गणेश राऊत यांनी आज येथे केले. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या ‘युवा चेतना दिन’ कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.
या वेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), संस्थेच्या नियामक मंडळाचे मा. अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव सहस्रबुद्धे, नियामक मंडळाचे सदस्य व मएसो क्रीडावर्धिनीचे अध्यक्ष मा. विजय भालेराव, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे उपस्थित होते.
मएसो क्रीडावर्धिनीच्या माध्यमातून स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन ‘युवा चेतना दिन’ म्हणून दरवर्षी साजरा करण्यात येतो. त्यानिमित्त संस्थेच्या विविध शाखांमधील विद्यार्थी खेळ व शारिरीक प्रात्यक्षिके सादर करतात. मात्र, कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर प्रात्यक्षिकांशिवाय हा कार्यक्रम मर्यादित निमंत्रतांच्या उपस्थितीत ऑनलाईन पद्धतीने मएसो गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्समधील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात आयोजित करण्यात आला होता. संस्थेच्या फेसबुक आणि युट्यूब चॅनलद्वारे त्याचे थेट प्रक्षेपण करण्यात आले.
डॉ. गणेश राऊत या वेळी बोलताना पुढे म्हणाले की, “ स्वामी विवेकानंद देशविदेशात भ्रमण करत असताना ऐतिहासिक वास्तू आवर्जून बघत असत. आपली संस्कृती परकीयांना समजावी यासाठी आपल्या देशाचा इतिहास आपणच लिहिला पाहिजे हा विचार त्यांनी मांडला. संन्यासी लोकांनी समाजासमोरचे प्रश्न सोडवायचे असतात हे स्वामी विवेकानंदांनीच पहिल्यांदा दाखवून दिले, त्यासाठी त्यांनी ‘शिवभावे जीवसेवा’ या धारणेतून रामकृष्ण मिशनची स्थापना केली. एकाच जन्मात एखादी व्यक्ती किती प्रकारची आयुष्ये जगू शकते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे स्वामी विवेकानंद होते. स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ या दोघांनीही ‘तूच तुझा प्रकाश हो’ हा संदेश दिला. भविष्यातील उज्ज्वल यशाची पायाभरणी लहान वयातच होत असते, म्हणूनच राजमाता जिजाऊंनी बालपणी शिवरायांच्या मनात विजयानगरचे साम्राज्य कशामुळे लयाला गेले? त्याची पुनर्स्थापना करता येईल का? असे प्रश्न निर्माण केले. त्यामुळेच शिवरायांच्या मनात आपल्या राष्ट्राचा उद्धार करण्याचा विचार रूजला.”
संस्थेचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, स्वामी विवेकानंद हे देशाचे सांस्कृतिक राजदूत होते. आपल्या देशाची संस्कृती जगाला समजावून सांगण्यासाठी त्यांनी देशविदेशात प्रवास केला. भारताला एकसंध करण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. आपल्या देशाचा आत्मा एकच आहे याचा अनुभव आपणदेखील देशभर प्रवास करताना घेतो. स्वामी विवेकानंदांनी शरीराबरोबर बुद्धी आणि मन सक्षम करण्याची शिकवण दिली. युवा पिढी घडवण्याची जबाबदारी आपल्यावर असल्याने आपण त्यांच्या विचारांचे अनुसरण केले पाहिजे. आपला इतिहास आपणच लिहीला पाहिजे हा स्वामी विवेकानंदांचा विचार अतिशय महत्वाचा आहे, कारण जेताच इतिहास लिहीत असतो. सध्याच्या काळात शस्त्रास्त्रांपेक्षा मानसिक युद्धाबाबत आपण सतर्क राहिले पाहिजे.
कार्यक्रमाच्या सुरवातीला मएसो क्रीडावर्धिनीचे अध्यक्ष मा. विजय भालेराव यांनी आपल्या प्रास्ताविकात युवा चेतना दिन साजरा करण्यामागील भूमिका विषद केली. आपल्या देशातील विविध क्रीडाप्रकार विद्यार्थ्यांना माहित व्हावेत यासाठी खेळ आणि शारिरीक प्रात्यक्षिके दरवर्षी सादर केली जातात. मात्र कोरोनाच्या संसर्गामुळे गेल्या वर्षीपासून मैदानावरील प्रात्यक्षिके न होता सभागृहात हा कार्यक्रम घेण्यात येत आहे. त्यात मांडल्या जाणाऱ्या विचारांमुळे विद्यार्थ्यांमधील चेतना जागृत ठेवण्याचे काम होत आहे. स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ या दोघांची जयंती एकाच दिवशी आहे ही विशेष बाब आहे. या दोघांनीही ‘आधी केले आणि मग सांगितले’ हे तत्व कायम पाळले. ‘क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे’ हे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे ब्रीदवाक्य त्यालाच अनुसरून आहे. यावर्षी संस्थेच्या शाखांमधील सर्व घटकांनी मिळून एक कोटी सूर्यनमस्कार घालण्याचा संकल्प केला आहे. सर्वजण १ जानेवारीपासून रोज नियमितपणे १२ सूर्यनमस्कार घालत असल्याने हा संकल्प निश्चितच पूर्ण होईल, असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोनाली महाजन यांनी केले.
संस्थेच्या आजीव सदस्य मंडळाचे सदस्य व मएसो क्रीडावर्धिनीचे महामात्र सुधीर भोसले यांनी आभार प्रदर्शन केले.
राधिका गंधे यांनी सरस्वती वंदना आणि वंदेमातरम् सादर केले.