महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या मुख्य कार्यालयातील प्रशासकीय अधिकारी जगदीश राजाराम मालखरे यांचे आज संध्याकाळी कोरोना विषाणूच्या संसर्गाने निधन झाले. ते ५६ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी व एक मुलगा असा परिवार आहे.
१९९५ पासून त्यांनी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या कार्यालयात विविध पदांवर काम केले.
मूळचे सोलापूरचे असलेले मालखरे १९८४ साली अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या संपर्कात आले. त्यानंतर १९८७ ते १९९२ पर्यंत त्यांनी परिषदेचे पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून काम केले. या काळात नाशिक शहर, नाशिक विभाग आणि मध्य मुंबईचे संघटन मंत्री म्हणून काम केल्यानंतर त्यांच्याकडे परिषदेचे प्रदेश कार्यालय मंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली. अभिनव आणि धाडसी कार्यक्रमांची आखणी करून ते यशस्वीपणे पार पाडणे हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य होते. ते उत्तम गीत गायक होते. शांत स्वभावाच्या मालखरे यांचे अनेकांशी कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध होते.
संस्थेतर्फे त्यांना भावपूर्ण आदरांजली!