“भारतापासून वेगळे झाल्यानंतर पाकिस्तानने बांगला देशात केवळ लूटमार, अत्याचार आणि नरसंहार केला. बांगला संस्कृती आणि भाषा यावर अतिक्रमण केले. बलुचिस्तानातदेखील पाकिस्तानने असाच नरसंहार केला आहे. पाकिस्तानच्या या कारवाया बघून जॉर्डनच्या राजाने आपल्या सैन्याला प्रशिक्षण देण्यासाठी पाकिस्तानी सैन्याला निमंत्रण दिले आणि त्या देशातील पॅलेस्टिनी नागरिकांचा संहार केला. क्रूरपणा हा पाकिस्तानचा स्थायीभावच आहे. दुसरीकडे बांगला देशाच्या स्वातंत्र्यासाठी मुक्ती वाहिनीला मदत करण्यासाठी तब्बल तीन लाख भारतीय सैनिक बांगला देशात उतरले होते. मात्र सहा महिन्याच्या काळात भारतीय सैनिकांनी तिथल्या नागरिकांवर कोणतेही अत्याचार केले नाहीत. त्यामुळे भारतीय सैनिकांचे हे संस्कार आणि संस्कृतीला माझा सलाम आहे,” असे बांगला देश मुक्ती संग्रामात भाग घेतेलेले बांगला देशच्या लष्करातील निवृत्त अधिकारी लेफ्टनंट कर्नल काझी सज्जाद अली झहीर आज (बुधवार, दि. २४ मार्च २०२१) येथे म्हणाले.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी आणि सेंटर फॉर अॅडव्हान्स स्ट्रॅटेजिक स्टडीज (कॅस) यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या ‘द हिस्ट्री अनफोल्डिंग’ या विषयावरील ऑनलाईन व्याख्यानात ते बोलत होते. बांगला देशचे मुंबईतील उप-उच्चायुक्त मा. मोहम्मद लुत्फोर रहमान तसेच महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आणि सेंटर फॉर अॅडव्हान्स स्ट्रॅटेजिक स्टडीज (कॅस) चे संचालक एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव सहस्रबुद्धे या वेळी उपस्थित होते.
१९७१ साली झालेल्या बांगलादेश मुक्ती संग्रामात भारतीय सैन्याने केलेल्या अतुलनीय पराक्रमाची आठवण कायम ठेवण्यासाठी १६ डिसेंबर हा दिवस दरवर्षी ‘विजय दिवस’ म्हणून साजरा केला जातो. त्याला ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात येत असलेल्या व्याख्यानमालेतील हे व्याख्यान होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लेफ्टनंट जनरल एस.एस. मेहता (निवृत्त) होते. बांगला देशातील ‘बीर उत्तम’ हा नागरी सन्मान मिळालेले मा. शहाबुद्दीन अहमद आणि लेफ्टनंट कर्नल काझी सज्जाद अली झहीर हे ढाका येथून कार्यक्रमात सहभागी झाले होते.
लेफ्टनंट कर्नल काझी सज्जाद अली झहीर यांचा भारत सरकारने या वर्षी ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन गौरव केला आहे. त्यांना बांगला देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार मानले जाणारे ‘स्वाधीनता पदक’ आणि ‘बीर प्रोतिक’ या पुरस्कारांनी या पूर्वीच गौरविण्यात आले आहे.
आपल्या भाषणात ते पुढे म्हणाले की, “तेराशे किलोमीटर अंतर आणि सांस्कृतिक दुरावा असलेले दोन प्रदेश मिळून एक देश कसा काय निर्माण होऊ शकतो? हा प्रश्नच होता. पाकिस्तानातील सार्वत्रिक निवडणुकीत शेख मुजीब-उर-रहमान यांच्या नेतृत्वाखालील अवामी लीगने प्रचंड विजय मिळवल्यानंतर पाकिस्तानी संसदेचे अधिवेशन ढाका येथे घेण्याची त्यांची मागणीदेखील जनरल याह्याखान यांनी फेटाळून लावली होती. बांगला देशच्या मुक्तीसाठी लढताना भारतीय सैन्यातील १७-१८ वर्ष वयाचे सैनिक धारातीर्थी पडले. त्यांचे हे हौतात्म्य विसरता येणार नाही. भारत आणि बांगला देशातील संबंध रक्त आणि परिश्रमाने जोडलेले आहेत. नवीन पिढीला त्याची माहिती करून देण्याची गरज आहे. १९७१ च्या मुक्ती संग्रामाचे ऋण हे पैशाने फेडता येण्यासारखे नाहीत, दोन्ही देशांमधील संबंध, संपर्क, संवाद आणि समन्वय वाढवून त्यातून उतराई होता येईल.”
शहाबुद्दीन अहमद म्हणाले की, “आत्मसन्मान राखण्यासाठी आणि लोकशाही पद्धतीने जीवन जगण्यासाठी बांगला देशची निर्मिती झाली आहे. भारतातून वेगळे झाल्यापासूनच पश्चिम पाकिस्तानातील सत्ताधाऱ्यांनी पूर्व पाकिस्तानातील बंगाली जनतेवर अन्याय आणि अत्याचार सुरू केले होते. पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्समध्ये मी वैमानिक म्हणून कार्यरत होतो. त्यावेळी एकूण ३०० वैमानिक होते, त्यापैकी केवळ ३० वैमानिक पूर्व पाकिस्तानातील होते. लष्कर आणि नोकरशाहीत देखील असाच दुजाभाव केला जात होता. वंगबंधू शेख मुजीब-उर-रहमान यांच्या प्रेरणेने मी पूर्व पाकिस्तानात परतलो. मी नागरी सेवेतील वैमानिक होतो परंतू बांगला देश मुक्ती संग्रामाच्या वेळी मी लढाऊ वैमानिक झालो. तेव्हा बांगला देशाकडे केवळ चार विमाने होती आणि त्यातील एक विमान जोधपूरच्या महाराजांनी दिले होते. चार विमाने आणि नऊ वैमानिकांच्या बळावर २८ सप्टेंबर १९७१ रोजी बांगला देशच्या हवाई दलाची स्थापना झाली. भारतीय हवाई दलातील ग्रुप कॅप्टन चंदनसिंग यांनी आम्हाला १५ दिवस प्रशिक्षण दिले आणि १४ रॉकेट घेऊन आम्ही हेलिकॉप्टरने ढाका आणि चितगांव येथील पाकिस्तानी फौजांवर हवाई हल्ला केला. त्यानंतर भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी युद्धाची अधिकृत घोषणा केली आणि भारतीय हवाई दल या युद्धात उतरले. भारताने केलेली मदत आम्ही कधीच विसरू शकणार नाही.”
मोहम्मद लुत्फोर रहमान आपल्या भाषणात म्हणाले की, “वंगबंधू शेख मुजीब-उर-रहमान यांच्या जन्मशताद्बी वर्षातच भारताने त्यांना ‘गांधी शांती पुरस्कार’ जाहीर केला आहे, त्याबद्दल मी भारत सरकारचे आभार मानतो. शेख मुजीब-उर-रहमान यांचे नाव कधीही विसरता येणार नाही कारण त्यांनी बांगला देश जगाच्या नकाशावर आणला. बांगला देशाच्या स्वातंत्र्य युद्धाला जगाच्या इतिहासात महत्वाचे स्थान आहे. बंगाली जनतेच्या अस्मितेची जाणीव त्यांना लहानपणापासूनच होती. महाविद्यालयीन जीवनापासून त्यांनी चळवळींमध्ये कधीच तडजोड केली नाही. बंगाली लोकांच्या हक्काचा, त्यांचे भविष्य घडविणारा देश मिळवण्यासाठी त्यांनी संघर्ष केला. बांगला देशाच्या स्वातंत्र्य युद्धामुळे भारत आणि बांगला देश यांच्यात निर्माण झालेले भावबंध कधीही न संपणारे आहेत, त्यातूनच दोन्ही देशांमधील सहकार्य दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातूनच दोन्ही देशांमधील सीमा प्रश्नावर तोडगा निघू शकला. आता दोन्ही देश उत्तम पद्धतीने शेजारधर्म पाळत आहेत. भारताकडून मिळणाऱ्या आर्थिक मदतीबरोबरच होणारा पायभूत सुविधांचा विकास, दोन्ही देशातील बंदरे-जलमार्ग-रस्ते यांची जोडणी, उर्जा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात काम करणाऱ्या भारतीय कंपन्यांमुळे रास्त दरात उपलब्ध होणारी वीज अशी अनेक उदाहरणे आहेत. पंतप्रधान शेख हसीना यांनी दहशतवादाच्या विरोधात कंबर कसल्यामुळे मूलतत्ववादी आणि दहशतवादी कारवाया संपुष्टात आल्या आहेत. परस्परांच्या हितासाठी दोन्ही देश एकत्रितपणे काम करून विकास साधत आहेत.”
लेफ्टनंट जनरल एस.एस. मेहता (निवृत्त) आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, “बांगला देशचे स्वातंत्र्य युद्ध म्हणजे लोकशाहीने लष्करशाहीवर, मानवतेने क्रौर्यावर आणि जुलुमशाहीवर मुक्ततेने मिळवलेला विजय आहे. बांगला देशातील भारतीय सैन्याच्या संस्कारी वर्तनातून दिलेला मानवतेचा संदेश, मुक्तीवाहिनीने युद्धभूमीवर दिलेला प्रामाणिकपणाचा परिचय, १३ दिवसात पूर्व पाकिस्तानातील जनतेला मिळालेली मुक्ती, ३ हजारांच्या भारतीय फौजेसमोर शरण आलेले ३० हजार पाकिस्तानी सैनिक म्हणजे बांगला देशचे स्वातंत्र्य युद्ध आहे. बांगला देशी जनतेच्या वेदना आणि व्यथा समजून घेण्यास जगात कोणालाच वेळ नव्हता. जेव्हा दोन लोकशाही देश एकत्र येतात तेव्हा त्यांना कोणीच रोखू शकत नाही.”
एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
सौ. लीना चांदोरकर यांनी सूत्रसंचालन केले.