महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी महाविद्यालयीन वसतिगृह संचलित विलगीकरण केंद्र
जगावर ओढवलेल्या कोरोना या आपत्तीमध्ये मदत करण्यासाठी सामाजिक बांधिलकी जपणारी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी हिरिरीने पुढे आली आहे. संस्थेकडून विविध पद्धतीने मदत कार्य सुरू आहे. त्यापैकी संस्थेच्या महाविद्यालयीन विद्यार्थी वसतिगृहामध्ये सुरू असलेल्या विलगीकरण केंद्राची ही माहिती…
मार्च महिन्यामध्ये मा. जिल्हाधिकारी, पुणे यांनी आदेश दिल्यानुसार सरकारच्या वतीने विलगीकरण केंद्रासाठी वसतिगृह अधिगृहित करण्यात आले. सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी आपापल्या गावी गेलेले असल्याने कमीतकमी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये वसतिगृहातील आवश्यक त्या व्यवस्था सुरू होत्या.
ज्या वस्त्यांमध्ये कोरोना विषाणूचा तीव्र संसर्ग आहे अशा वस्त्यांमध्ये डॉक्टरांच्या टीमने जाऊन घरोघरी वैद्यकीय सर्वेक्षण करण्याची योजना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती आणि पुणे महानगरपालिका यांच्यावतीने करण्यात आली. सर्वेक्षणासाठी जाणारे डॉक्टर आणि त्यांचे मदतनीस स्वयंसेवक यांच्या निवास आणि भोजनाची व्यवस्था महाविद्यालयीन विद्यार्थी वसतिगृहात दि. २७ एप्रिल २०२० पासून करण्याचे ठरले. याबाबत जनकल्याण समितीच्या कार्यकर्त्यांशी प्राथमिक चर्चा झाल्यानंतर प्रत्यक्ष पाहणी करून व्यवस्था कशा करायच्या याचे नियोजन केले गेले. यामध्ये छोट्या-मोठ्या अडचणी आल्या.
सर्वात पहिली अडचण होती ती म्हणजे विद्यार्थी तातडीने आपापल्या गावी गेल्याने त्यांनी खोल्यांना कुलुपे लावली होती व वसतिगृहाकडे या कुलपांच्या चाव्या नव्हत्या. ज्या खोल्या विलगीकरणासाठी वापरण्यात येण्याचे नियोजन करण्यात आले त्या सर्व खोल्यांमधील विद्यार्थ्यांशी फोनद्वारे संपर्क करून त्यांना कल्पना देण्यात आली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून विद्यार्थ्यांनी त्यांच्या खोल्यांचे कुलूप तोडण्यास संमती दिली. वसतिगृह सेवकांनी कुलुपे तोडून व्यवस्था करण्यास सुरुवात केली. मर्यादित सेवकांच्या आधारावर हे काम शक्य तितक्या लवकर पूर्ण करण्यात आले. तसेच राहणाऱ्या व्यक्तींसाठी आवश्यक अशा गोष्टींची जुळवाजुळव करण्यात आली.
निवासाची व्यवस्था मार्गी लागल्यानंतर दुसरी आवश्यकता होती ती भोजन व्यवस्थेची. वसतिगृहाचे भोजन कंत्राटदार व त्यांचे सर्व कर्मचारी पुण्याबाहेर गेल्याने मनुष्यबळ उपलब्ध नव्हते. वसतिगृह कंत्राटदाराच्या संमतीने भोजनालयातील आवश्यक तो किराणामाल घेण्यात आला. महाविद्यालयाच्या कॅन्टीनमध्ये कर्मचारी उपलब्ध आहेत हे लक्षात आल्यावर कॅन्टीनच्या कंत्राटदाराशी चहा, नाश्ता, जेवण इत्यादी करून देण्याबाबत बोलणे करण्यात आले. कॅन्टीन कंत्राटदाराने दोन मे पर्यंत भोजन व्यवस्था केली. त्यानंतर जनकल्याण समिती आणि रा.स्व. संघाच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून व्यवस्था करण्यात येत आहे. आताची गरज ओळखून भोजन व्यवस्था संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे.
वसतिगृहाच्या कर्मचाऱ्यांच्या जोडीने संघाची यंत्रणा कार्यरत झाल्याने छोट्या छोट्या गोष्टींमध्ये समन्वय ठेवून आवश्यक त्या व्यवस्था पूर्ण करण्यात आल्या. चार व्यक्तींपासून सुरुवात करून आता या विलगीकरण केंद्रात जवळपास ५० व्यक्तींची सोय करण्यात आली आहे. साधारण १० मे पर्यंत हे केंद्र चालेल असा अंदाज आहे.
महाविद्यालय आणि वसतिगृहाच्या परिसरात वर्षभर हजारो विद्यार्थ्यांचा वावर असतो. पण टाळेबंदी जाहीर झाल्यानंतर आवारात राहणारे एकमेव कुटुंब आमचे म्हणजे वसतिगृह प्रमुखांचे. सुरक्षा रक्षक, स्वच्छता कर्मचारी, सेवक ही मंडळी येऊन-जाऊन करणारी. जणू काही बेटावर राहिल्यासारखेच. यापूर्वी कधीही न अनुभवायला आलेला शुकशुकाट आवारात होता. विलगीकरण केंद्र सुरू होणार याचा आनंद झाला. कारण आता परत माणसांची गजबज सुरू होणार. काळजी तर घेतलीच पाहिजे पण, चिंता मात्र करायची नाही हा विचार करून सर्व गोष्टी मार्गी लावल्या. विविध माध्यमातून माहिती झालेल्या गोष्टींनुसार आवश्यक ती खबरदारी घेऊन सर्व गोष्टी मार्गी लावल्या. वस्त्यात जाऊन प्रत्यक्ष सर्वेक्षण करणे जमले नाही पण सर्वेक्षण करणार्याग लोकांची, स्वयंसेवकांची सोय करण्याची संधी मिळाली याचा आनंद झाला.
कोरोना वॉरियर्स आप लढो
हम आप का भोजन और निवास संभालेंगे…
– सुधीर गाडे, साहाय्यक सचिव, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी