“व्यंगचित्रामध्ये कमीतकमी रेषांचा वापर करून विविध भावभावना व्यक्त करता येतात, निरिक्षणातून व्यंगचित्रातील विविध व्यक्तिमत्व साकारता येतात. त्यासाठी एकाग्रता आवश्यक असते. ‘रंगवेध’ या चित्रकला प्रदर्शनातील चित्रे बघत असताना लहान वयातील विद्यार्थ्यांची एकाग्रता लक्षात येत होती, आपल्या आवडत्या विषयात एकाग्रता साधणे सहज होते, म्हणूनच आपली आवड कोणती याचा शोध घेत राहिले पाहिजे आणि त्याची प्रेरणा या चित्रकला प्रदर्शनातून मिळत आहे. प्रत्येक व्यक्तीची सौंदर्यदृष्टी विकसित होत जाईल तसे आपला देशातील वातावरण सुधारत जाईल, त्यामुळे पालकांनी विद्यार्थ्यांची कलेची आवड जोपासावी,” अशा शद्बात ख्यातनाम व्यंगचित्रकार चारुहास पंडित यांनी जीवनातील कलेचे महत्व अधोरेखित केले.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने ‘म.ए.सो. कलावर्धिनी’च्या माध्यमातून आयोजित केलेल्या ‘रंगवेध’ या चित्रकला प्रदर्शन आणि स्पर्धेच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष प्रदीप नाईक या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
या प्रसंगी म.ए.सो. कलावर्धिनीचे अध्यक्ष डॉ. दिलीप शेठ, म.ए.सो. कलावर्धिनीचे महामात्र डॉ. गोविंद कुलकर्णी, शाळेच्या महामात्र सौ. प्रणिता जोगळेकर, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. स्वाती जोशी व्यासपीठावर उपस्थित होते. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे सदस्य राहुल मिरासदार आणि अजय पुरोहित या वेळी आवर्जून उपस्थित होते.
या प्रसंगी आपले विचार मांडताना प्रदीप नाईक म्हणाले की, चित्रांमधून विद्यार्थ्यांचे विचार व्यक्त होतात, विद्यार्थ्यांनी चित्रांच्या माध्यमातून सामाजिक समस्यांबद्दल संदेश दिला आहे. त्यामुळे प्रदर्शनातील चित्रे बघून देशाच्या भावी पिढीबद्दल आशा वाढीला लागली आहे. संस्थेच्या विविध शाखांमध्ये उत्तम चित्रकार आहेत हे दिसून आले आहे. चित्रकलेने मानवी जीवन व्यापले आहे. खाद्यपदार्थ तयार करणे, कपडे शिवणे, घराचे बांधकाम अशा सर्वच बाबतीत चित्रकला अनुभवायला मिळते. प्रमाणबद्धता, लयबद्धता, रंग हेच तर मानवी जीवन आहे. विद्यार्थ्यांनी चित्रकलेची साधना वाढवून जीवनात आनंद मिळवावा आणि एक चांगला माणूस म्हणून स्वतःला घडवावे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना डॉ. दिलीप शेठ म्हणाले की, कलेची मांडणी करणे हा एक संस्कार आहे. प्रदर्शनातील चित्रांमधून म.ए.सो. चा संस्कार दिसून येत आहे, एकाही विद्यार्थ्याचे चित्र विचित्र नाही. मात्र, चित्रांच्या विषयामध्ये विविधता आहे. त्यातून शाळेतील कलाशिक्षकांची प्रेरणा आणि त्यांनी घेतलेले परिश्रम दिसून येत आहे. कला ही बहुआयामी असते, प्रत्येक चित्र हे प्रेरणादायी असते, ती प्रेरणा या प्रदर्शनामुळे जनमानसात पोहोचेल.
या वेळी मान्यवरांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. इ. १ ली ते ४ थी च्या गटात म.ए.सो. ज्ञानमंदिर, कळंबोली या शाळेतील इ. ३ री मधील विद्यार्थिनी माही आबासाहेब लवटे हिने काढलेल्या चित्राला प्रथम क्रमांक मिळाला. इ. ५ वी ते ७ वी गटात म. ए. सो. इंग्लिश मिडीयम स्कूल, शिरवळ या शाळेतील इ. ७ वी तील विद्यार्थिनी आर्या अमोल नवले हिने तर इ. ८ वी ते १० वी च्या गटात म.ए.सो. वाघीरे विद्यालय, सासवड या शाळेतील इ. ९ वी तील विद्यार्थी श्रवण मोहन अकार्शे याने प्रथम क्रमांक मिळविला. इ. ११ वी ते १२ वी या गटात म.ए.सो. आबासाहेब गरवारे ज्युनिअर कॉलेजमधील इ. ११ वी चा विद्यार्थी अभिनव संभाजी लांडे याच्या चित्राल प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले.
प्रदर्शनात सादर करण्यात आलेल्या चित्रांचे परीक्षण विश्वास निकम आणि संदेश पवार या कला शिक्षकांनी केले.
कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन सौ. स्वाती जोशी यांनी तर सूत्रसंचालन कलाशिक्षक गोपाळ खंडाळे यांनी केले.
या प्रदर्शनात महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सहा जिल्ह्यातील शाळांमधील इ. १ ते १२ तील विद्यार्थ्यांनी चितारलेली निवडक तीनशे चित्रे प्रदर्शित करण्यात आली आहेत. त्यामध्ये मुक्त चित्र, निसर्ग चित्र, मधुबनी, गोंद, राजपूत अशा विविध शैलीतील चित्रांचा समावेश आहे.
शिरवळ ग्रामस्थ, पालक व कला रसिकांसाठी हे प्रदर्शन शुक्रवार, दि. २९ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.०० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत खुले राहणार आहे.