‘ज्ञान हेच सर्वात श्रेष्ठ धन’

“व्यक्तीकडे ज्ञान असेल तर भौतिक सुखे सहज उपलब्ध होऊ शकतात पण ज्ञानाशिवाय जीवनात यश मिळू शकत नाही. व्यक्तीकडे असलेले ज्ञान कोणीही चोरू शकत नाही, त्यामुळे ज्ञान हेच सर्वात श्रेष्ठ धन आहे. गुणवंत विद्यार्थ्यांनी त्यांना मिळालेल्या यशाबाबत समाधानी न राहता अधिकाधिक ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यांच्या ज्ञानाचा समाजाला उपयोग व्हावा यासाठी त्यांचे शोधनिबंध पुस्तक रुपाने प्रकाशित झाले पाहिजेत,” असे प्रतिपादन पुणे विभागाचे धर्मादाय सह-आय़ुक्त दिलीप देशमुख यांनी आज येथे केले. 

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या राज्यभरातील विविध शाळा-महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच गुणवंत शिक्षक आणि प्राध्यापक यांचा गौरव समारंभ आज अतिशय उत्साहाच्या वातावरणात पार पडला. यावेळी देशमुख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ‘मएसो’चे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. 

मयूर कॉलनीतील म.ए.सो. सभागृहात झालेल्या या समारंभापूर्वी ‘मएसो’ बाल शिक्षण मंदिर इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये सुमारे २० लाख रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या सौरऊर्जेवर आधारित ५० किलोवॅट क्षमतेच्या वीज प्रकल्पाचे उद्घाटन देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. 

राज्यातील विविध विद्यापीठांनी घेतलेल्या परिक्षांमध्ये ‘मएसो’च्या शाळा-महाविद्यालयातून विविध विषयांमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेले ४० आणि पीएच. डी. प्राप्त केलेले १८ विद्यार्थी-विद्यार्थिनी, एम.फील्. पूर्ण केलेले २ सहाय्यक शिक्षक तसेच पीएच. डी. प्राप्त केलेले ९ प्राध्यापक अशा ६९ गुणवंतांचा गौरव या समारंभात करण्यात आला. 

यावेळी व्यासपीठावर संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन आंबर्डेकर, नियामक मंडळाचे उपाध्यक्ष विवेक शिंदे, ‘मएसो’चे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), पुणे विभागाचे धर्मादाय सह-आय़ुक्त दिलीप देशमुख, संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे, आणि सहाय्यक सचिव डॉ. भरत व्हनकटे उपस्थित होते.

गुणगौरव समारंभाचे प्रास्ताविक संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे यांनी केले. 

मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तिपत्र, पुस्तक आणि स्मृतिचिन्ह भेट देऊन गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच गुणवंत शिक्षक आणि प्राध्यापक यांचा गौरव करण्यात आला. गुणवंतांच्या वतीने प्रातिनिधिक स्वरुपात साची ओसवाल या विद्यार्थिनीने इंग्रजी कवितेतून आपल्या भावना व्यक्त केल्या तर पदवी शिक्षणानंतर २३ वर्षांच्या खंडानंतर PGDBM हा पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या प्रज्ञा भागवत यांनी कुटुंबाबरोबरच महाविद्यालयाकडून मिळालेल्या पाठिंब्याबाबत ऋतज्ञता व्यक्त केली. 

एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले, “यश मिळणे हा जीवनाच्या प्रवासातील एक टप्पा आहे ते ध्येय नाही हे सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या शाळा-महाविद्यालयात दर्जेदार शिक्षण आणि संस्कार केले जातात, संस्कृती जपली जाते, शिक्षणाकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून बघितले जात नाही. त्यामुळेच आकाशाला गवसणी कशी घालावी हे मएसोच्या विद्यार्थ्यांना शिकवले जाते. कॅमेरातून आपली छबी टिपण्यापेक्षा आपली प्रतिमा निर्माण करा, त्यामुळे ‘मएसो’ने तुम्हाला काय दिले आहे हे जगाला कळेल. सामाजिक जाणीवेतूनच संस्थेने सौर उर्जेवर आधारित वीज प्रकल्प उभारला आहे, त्याचे आज उद्धाटन झाले आणि असे आणखी चार प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. जागतिक तापमान वाढीसारख्या जागतिक समस्यांवर संस्थेने केलेला हा एक छोटासा पण महत्वपूर्ण उपाय आहे.”

संस्थेचे सहाय्यक सचिव डॉ. भरत व्हनकटे यांनी आभार प्रदर्शन केले. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मएसो आबासाहेब गरवारे महाविद्यालयातील प्रा. रसिका रहाळकर यांनी केले.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *