Month: May 2018

टाटा कॅपिटल लिमिटेडच्या कॉर्पोरेट सस्टॅनिबिलीटी विभागाच्या प्रमुख श्रीमती राधा सुळे आणि टाटा उद्योग समूहातील माजी उच्चाधिकारी श्री. मनोहर परळकर यांनी शुक्रवार, दि. २५ मे २०१८ रोजी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या मुख्य कार्यालयास सदिच्छा भेट दिली. या वेळी म.ए.सो.च्या नियामक मंडळाचे अध्यक्ष मा. राजीव सहस्रबुद्धे, नियामक मंडळाच्या सदस्य डॉ. माधवी मेहेंदळे, संस्थेचे सहाय्यक सचिव डॉ. भरत व्हनकटे, नियामक मंडळाच्या सदस्य डॉ. केतकी मोडक आणि संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सचिन आंबर्डेकर उपस्थित होते. 

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी मूलभूत शिक्षणाबरोबरच आरोग्य विज्ञान, जैवविविधता, महिला सक्षमीकरण या आणि अशा विविध क्षेत्रात कार्यरत आहे. टाटा उद्योग समूह सामाजिक जबाबदारीच्या भूमिकेतून अशा उपक्रमांना कायमच पाठबळ देत आला आहे. दोन्ही संस्थांनी स्वातंत्रपूर्व काळापासून जपलेली सामाजिक बांधिलकी लक्षात घेता समान दृष्टीकोन आणि समान ध्येय डोळ्यासमोर ठेऊन भविष्यकाळात एकत्रितपणे शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात भरीव योगदान देण्याविषयी यावेळी उभय संस्थांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये प्राथमिक चर्चा झाली.

‘आय.एम.सी.सी.’ मध्ये मिळाली करिअरला दिशा

करिअर म्हणजे केवळ आर्टस्‌, कॉमर्स किंवा बी.ई, एम.बी.बी.एस. नव्हे तर व्यक्तिच्या जीवनात प्रगतीच्या संधी मिळवून देणारा व्यवसाय असतो. यशस्वी करिअर घडवण्यासाठी अनेक घटक महत्वाचे असतात. यात शिक्षण, आपला दृष्टीकोन, आपली अंगभूत कौशल्ये, सवयी, क्षमता हे सारे घटक महत्वाचे असतात. केवळ दहावी, बारावीच्या मार्कवर करिअरची दिशा न ठरवता आणि कोणत्या क्षेत्रात किंवा विषयात जास्त संधी आहेत याचा विचार न करता, आपली आवड व क्षमता यानुसार करिअर निवडले तर त्यात यशस्वी होता येते. हाच विचार घेऊन महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट आणि करिअर कोर्सेस म्हणजेच ‘आय.एम.सी.सी.’ या संस्थेने बुधवार, दिनांक २३ मे २०१८ रोजी मोफत ‘करिअर गाईडन्स सेमिनार’चे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला विद्यार्थी आणि पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 

कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. रवींद्र वैद्य यांनी संस्थेच्या वतीने उपस्थित विद्यार्थी आणि पालकांचे स्वागत केले. त्यानंतर ‘आय.एम.सी.सी.’ चे संचालक डॉ. संतोष देशपांडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

प्राध्यापिका सौ. जयश्री पाटील यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातर्फे (वाय. सी. एम. ओ. यू.) तसेच ‘आय.एम.सी.सी.’तर्फे चालविण्यात येणाऱ्या ‘डिजिटल मार्केटिंग’ सारख्या विविध स्वायत्त कोर्सेसची माहिती दिली. 

देशपी फाऊंडेशनचे वेदार्थ देशपांडे यांनी ‘डिजिटल मार्केटिंग : काळाची गरज’ या विषयी आणि सन्मित शहा यांनी ‘प्रॅक्टिकल बी. कॉम.’ या कोर्सबाबत माहिती दिली. 

या मार्गदर्शनानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या मनातील अनेक प्रश्नांविषयी तज्ञांकडून सविस्तर माहिती जाणून घेतली. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मीनाक्षी मोरे यांनी केले.

 

शैक्षणिक सहकार्य आणि विद्यार्थी/शिक्षक आदान-प्रदान कार्यक्रमाअंतर्गत महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या विविध शाखांमध्ये काम करणाऱ्या सात शिक्षिका आणि समुपदेशक मंगळवार, दि. १५ मे २०१८ रोजी जम्मू-काश्मीरला जात आहेत. संस्थेच्या मुख्य कार्यालयात आज झालेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. या वेळी संस्थेचे चिटणीस डॉ. संतोष देशपांडे, या उपक्रमाचे संयोजक व संस्थेच्या आजीव सदस्य मंडळाचे सदस्य विनय चाटी, या उपक्रमाचे अन्य एक संयोजक डॉ. रवींद्र वैद्य, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन आंबर्डेकर आणि विवेक व्यासपीठचे कार्यवाह महेश पोहनेरकर आदी मान्यवर उपस्थित होते. 

जम्मू-काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यातील ददवारा तालुक्यात पिंतर या गावी बाल गोविंद स्कूल आहे. सध्या या शाळेत ६५० विद्यार्थी शिक्षण घेतात. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी आणि बाल गोविंद स्कूल यांच्यादरम्यान विद्याभारतीच्या माध्यमातून सन २०१३-१४ पासून शैक्षणिक सहकार्य आणि विद्यार्थी/शिक्षक आदान-प्रदान कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या वर्षी ‘मएसो’च्या श्रीमती रेवा देशपांडे, श्रीमती ममता येरनूले, श्रीमती सुलभा घैसास, डॉ. गिरीजा लिखिते, श्रीमती मनिषा दोशी, श्रीमती वर्षा न्यायाधीश आणि श्रीमती वैशाली कामत अशा सात शिक्षिका व समुपदेशक या शाळेत जात आहेत. तेथील विद्यार्थ्यांना त्या इंग्रजी, विज्ञान, गणित या विषयांचे नावीन्यपूर्ण पद्धतीने आणि कार्यानुभवावर आधारित शिक्षण देणार आहेत. त्यासाठी या शिक्षकांनी बाल गोविंद स्कूलमधील अभ्यासक्रमाचा अभ्यास केला असून सोप्या पद्धतीने कसे शिकविता येईल? याचा विचार केला आहे. अभ्यासक्रमाशी निगडित कार्यानुभवांबरोबरच (Activity) विविध नावीन्यपूर्ण कार्यानुभव तयार केले आहेत. त्यामध्ये विज्ञान आणि गणित विषयांप्रमाणेच पाठ्यक्रम निरिक्षणाच्या आधारे काही कार्यानुभव तयार केले आहेत. त्यामध्ये वक्तृत्व, एखाद्या विषयावर मुद्देसूद चर्चा कशी करावी आदी कौशल्ये शिकवण्यात येणार आहेत. त्याशिवाय विद्यार्थी-पालक-शिक्षक यांना समुपदेशन करण्यात येणार आहे. या शाळेत ‘व्हर्चूअल क्लासरूम’ तयार करण्याचा प्रयत्न देखील करण्यात येणार आहे. 

विद्यार्थी/शिक्षक आदान-प्रदान कार्यक्रमाअंतर्गत येत्या जून महिन्यात बाल गोविंद स्कूलमधील दहा विद्यार्थिनी ‘मएसो’च्या राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेत येणार आहेत.

पुणे – ‘शौर्य’ शिबिरामुळे आत्मविश्वास वाढला आणि साहसी वृत्तीला प्रोत्साहन मिळाल्याचे मनोगत ‘शौर्य’ शिबिराच्या समारोपप्रसंगी शिबिरात सहभागी झालेली मुले-मुली व त्यांच्या पालकांनी व्यक्त केले. 

म.ए.सो.राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेत शनिवार, दि. ५ मे २०१८ ते शनिवार, दि.१२ मे २०१८ या कालावधीत ‘शौर्य’ साहसी क्रीडा प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचा समारोप शनिवार, दि.१२ मे २०१८ रोजी उत्साहात पार पडला. मएसो गरवारे वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आनंद लेले या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. शाला समितीच्या अध्यक्षा डॉ. माधवी मेहेंदळे, मएसो क्रीडावर्धिनीचे समन्वयक शैलेश आपटे, शाळेच्या माजी विद्यार्थिनी मेजर अर्चिस सबनीस व स्क्वॉड्रन लीडर वैष्णवी टोकेकर यावेळी उपस्थित होते. 

‘शौर्य’ शिबिरातून फक्त साहसी वृत्ती वाढीस न लागता संस्काराची जोपासना केली जाते असे प्रमुख पाहुणे डॉ. आनंद लेले यांनी आपल्या भाषणात सांगितले. तर या शिबिरातून विविध प्रकारच्या साहसाबरोबर कलांची तोंडओळख करून दिली, असे डॉ.माधवी मेहेंदळे यांनी सांगितले. 

शिबिरप्रमुख प्रशांत जोशी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. शाळेचे कमांडंट कर्नल सारंग काशीकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. शाळेच्या मुख्याध्यापिका पूजा जोग यांनी आभार मानले. उपमुख्याध्यापक अनंत कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

आपल्या संंस्थेचे मा.अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांची विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. येत्या सप्टेंबर महिन्यात अबूधाबी येथे होणाऱ्या या संमेलनाचे हे आठवे वर्ष आहे.

जिद्द आणि उच्च ध्येय हाच यशाचा मार्ग – मेजर जनरल शिशिर महाजन (निवृत्त)

पुणे, दि. ५ – “जीवनात यशस्वी होण्यासाठी लहानपणापासूनच परिश्रम, जिद्द, चिकाटी, स्वावलंबन या गुणांचा अबलंब करून उच्च ध्येय ठेवावे” असा सल्ला मेजर जनरल शिशिर महाजन (निवृत्त) यांनी आज येथे दिला. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेत आयोजित करण्यात आलेल्या ‘शौर्य’ या साहसी क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन मेजर जनरल महाजन (निवृत्त) यांच्या हस्ते झाले, त्यावेळी महाजन बोलत होते. 

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे, संस्थेचे सचिव डॉ. संतोष देशपांडे, संस्थेच्या आजीव सदस्य मंडळाचे सदस्य प्रा. सुधीर भोसले, डॉ. अतुल कुलकर्णी, शाळेच्या महामात्रा डॉ. मानसी भाटे, शाळेच्या प्राचार्या सौ. पूजा जोग, कमांडट कर्नल सारंग काशीकर (निवृत्त) या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते. 

आपल्या अध्यक्षीय भाषणात राजीव सहस्रबुद्धे यांनी, शिबिरार्थींनी या शिबिरातून उत्तम संस्कार, उत्तम सैनिकी गुण प्राप्त करावेत आणि शारीरिक तसेच मानसिक क्षमता विकसित करावी असे सांगितले.

म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेने सुट्टीच्या या काळात मुलांना केवळ गुंतवून न ठेवता त्यांच्या विकासासाठी खऱ्या अर्थाने उपयोगी ठरेल असे क्रीडा प्रशिक्षण शिबिर आयोजित केले आहे. त्यामध्ये राज्यभरातून प्रशिक्षणार्थी सहभागी झाले आहेत. मानसिक पातळीवर सकारात्मक परिणाम घडवणाऱ्या योग, सूर्यनमस्कार, रोप मल्लखांब यासारख्या क्रीडाप्रकारांबरोबरच अश्वारोहण, रिव्हर क्रॉसिंग यासारख्या साहसी प्रकारांचीही योजना या शिबिरात करण्यात आली आहे. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशांत जोशी यांनी केले. कर्नल सारंग काशीकर (निवृत्त) यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. शाळेच्या प्राचार्या सौ. पूजा जोग यांनी आभार मानले. 

शाळेचे उपमुख्याध्यापक अनंत कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.