Month: April 2018

राज्याचे शिक्षण आयुक्त म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल मा. विशाल सोलंकी यांचे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष मा. राजीवजी सहस्रबुद्धे यांनी आज मा. सोलंकी यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. मा. सोलंकी हे भारतीय प्रशासकीय सेवेतील आसाम केडरचे अधिकारी असून गेली १४ वर्षे ते आसाममध्ये कार्यरत होते. आसाममधील दोन जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिल्यानंतर आसाम सरकारच्या अर्थखात्यात आणि त्यानंतर आसामच्या मुख्य सचिवांच्या कार्यालयात ते कार्यरत होते. आसामच्या मुख्यमंत्र्यांचे सचिव म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. 

सोलंकी यांची नुकतीच महाराष्ट्राचे शिक्षण आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली असून शिक्षण विभागातील ८ संचलनालयांमध्ये समन्वय साधण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी त्यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. 

मा. विशाल सोलंकी हे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सासवड येथील वाघीरे विद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. त्यामुळे संस्थेतर्फे त्यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी संस्थेचे सचिव डॉ. संतोष देशपांडे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सचिन आंबर्डेकर, प्रबंधक श्री. नीलकंठ मांडके, शैक्षणिक विकास अधिकारी श्री. अजित बागाईतकर उपस्थित होते.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या बाल शिक्षण मंदिर, डेक्कन जिमखाना या मराठी माध्यमाच्या शाळेत शाळेचा शेवटचा दिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. आज दै. महाराष्ट्र टाईम्सच्या पुणे प्लस पुरवणीत पान क्र. २ वर या कार्यक्रमाची बातमी छापून आली आहे.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची ‘क्रीडावर्धिनी’ विद्यार्थ्यांची खेळाची आवड वृद्धिंगत व्हावी, त्यांच्यामध्ये क्रीडा संस्कृती रुजावी, खिलाडूवृत्ती निर्माण व्हावी या हेतूने संस्थेच्या सर्व शाखांमध्ये एप्रिल महिन्यात क्रीडा शिबीराचे आयोजन करते. त्यानुसार म.ए.सो.च्या बाल शिक्षण मंदिर, डेक्कन जिमखाना, पुणे ०४ या मराठी माध्यम शाळेतही क्रीडा शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

शाळेचे महामात्र मा. डॉ. अंकूर पटवर्धन यांच्या हस्ते शुक्रवार, दि. १३/०४/२०१८ या दिवशी शाळेच्या क्रीडा शिबीराचे उद्घाटन करण्यात आले. त्यांनी विद्यार्थ्यांना उत्तम खेळासाठी शुभेच्छा दिल्या. या क्रीडा शिबीरातूनच भावी खेळाडून घडण्यास मदत होईल अशी आशा शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. प्रतिभा गायकवाड यांनी व्यक्त केली. त्याचप्रमाणे शिशु शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. रोहिणी फाळके यांनी या प्रसंगी विद्यार्थ्यांना खेळाबरोबरच योग्य आहार कसा असावा याचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आयोजन श्री. दत्तात्रय लखे यांनी केले तर सौ. प्रमिला कांबळे यांनी आभार मानले.

विशेष म्हणजे खो-खो या खेळात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आनंदाने सहभागी झाले होते. त्यांच्या या खेळाद्वारेच क्रीडा शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमाची सांगता झाली.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या बाल शिक्षण मंदिर डेक्कन जिमखाना या मराठी माध्यमाच्या शाळेत शाळेचा शेवटचा दिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. शाळेत वर्षभर जास्तीत जास्त उपस्थिती असणाऱ्या विद्यार्थ्यांचे भेटवस्तू देऊन कौतुक करण्यात आले. इ. ४ थी च्या विद्यार्थ्यांनी स्लॅम बुकमध्ये आपल्या मित्रमैत्रिणींबद्दलचे मत नोंदवले. काही विद्यार्थ्यांनी शाला मातेस पत्र लिहून शाळेबद्दलच्या भावना व्यक्त केल्या. विद्यार्थ्यांनी हस्तव्यवसायाच्या वर्गात शिकवण्यात आलेल्या वस्तू तयार करून आपली आठवण म्हणून एकमेकांना दिल्या. काही विद्यार्थ्यांनी आभूषणांच्या प्रतिकावर शाळेविषयी कृतज्ञता व्यक्त करणारे संदेश लिहून ती परिधान केली होती. त्याचबरोबर भेळ पार्टीचा आस्वाद घेत शाळेच्या शेवटच्या दिवसाची मजा विद्यार्थ्यांनी लूटली. या कार्यक्रमास शाळेच्या शाला समिती अध्यक्ष मा. आनंदी पाटील, महामात्र मा. डॉ. अंकूर पटवर्धन, शाळेच्या मुख्याध्यापिका मा. प्रतिभा गायकवाड, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या मुलांचे विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयातील (पेरुगेट भावेस्कूल) नूतनीकृत संगणक प्रयोगशाळेचे ‘कै. प्रभाकर चानसरकर संगणक प्रयोगशाळा’ असे नामकरण आणि उद्धाटन सोमवार, दि. ९ एप्रिल २०१८ रोजी श्रीमती शिल्पा प्रभाकर चानसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाची बुधवार, दि. ११ एप्रिल २०१८ रोजी महाराष्ट्र टाईम्सच्या पुणे प्लस पुरवणीत पान क्र. २ वर प्रसिद्ध झालेली बातमी

पुणे, दि. ९ – महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या मुलांचे विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयातील (पेरुगेट भावेस्कूल) नूतनीकृत संगणक प्रयोगशाळेचे ‘कै. प्रभाकर चानसरकर संगणक प्रयोगशाळा’ असे नामकरण आणि उद्घाटन सोमवार, दि. ९ एप्रिल २०१८ रोजी श्रीमती शिल्पा प्रभाकर चानसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. 

संस्थेच्या माहिती तंत्रज्ञान व तंत्रशिक्षण समितीच्या अध्यक्ष आणि संस्थेच्या नियामक मंडळाच्या सदस्य सौ. आनंदी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि उद्योजक श्री. संग्राम खामकर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. संस्थेचे सचिव डॉ. संतोष देशपांडे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सचिन आंबर्डेकर, शाळेचे महामात्र व संस्थेच्या आजीव सदस्य मंडळाचे सदस्य प्रा. सुधीर गाडे, शाळेचे मुख्याध्यापक श्री. रोहिदास भारमळ, तसेच खामकर कुटुंबिय आणि आप्तेष्ट यावेळी उपस्थित होते. 

श्रीमती शिल्पा चानसरकर यांच्या वतीने त्यांच्या भगिनी सौ. अपर्णा विनायक आंबेडकर यांनी मनोगत व्यक्त केले. त्या म्हणाल्या की, “कै. प्रभाकर चानसरकर यांचे व्यक्तिमत्व अतिशय चैतन्यमयी आणि प्रेरणादायी होते. त्यांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक प्रगतीचा आलेख कायमच चढता होता. ते सर्वांना कायमच गरजेप्रमाणे मदत करत असत आणि चांगल्या गोष्टींना प्रोत्साहन देत. जगाच्या पाठीवर कुठेही उपचार होणार नाहीत असा डोळ्यांचा विकार झाल्यावरदेखील ते खचले नाहीत, त्यांनी अतिशय खंबीरपणे आपल्या शारिरीक व्याधींना तोंड दिले. कै. प्रभाकर चानसरकर यांचे संगणक या विषयात प्रावीण्य होते. म्हणूनच त्यांच्या स्मरणार्थ शाळेतील संगणक प्रयोगशाळेसाठी देणगी दिली आहे.”

उद्योजक श्री. संग्राम खामकर हे देखील शाळेचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांनी आपल्या भाषणात शाळेतील आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, “१९८६ साली शाळेतील विद्यार्थ्यांना संगणक दाखवण्यासाठी शैक्षणिक सहल आयोजित करण्यात आली होती. त्यामुळे आपल्याला आयुष्यात पहिल्यांदा संगणक बघण्याची संधी मिळाली आणि आज शाळेतील संगणक प्रयोगशाळेच्या उद्धाटनाला उपस्थित राहण्याची संधी मिळाली, याचा मोठा आनंद होतो आहे. श्रीमती शिल्पा चानसरकर यांनी अतिशय योग्य ठिकाणी देणगी दिली आहे. विद्यार्थ्यांना शालेय जीवनात संगणक शिकायला मिळाल्यामुळे पुढील जीवनात त्यांना त्याचा खूप उपयोग होईल.” 

संस्थेच्या माहिती तंत्रज्ञान व तंत्रशिक्षण समितीच्या अध्यक्ष आणि संस्थेच्या नियामक मंडळाच्या सदस्य सौ. आनंदी पाटील यांनी आपल्या भाषणात महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या कार्याचा परिचय करून दिला. त्या म्हणाल्या, “संस्थेने काळाची पावले ओळखून आधुनिकता आणि तंत्रज्ञानाचा स्वीकार केल्यामुळे आजच्या तीव्र स्पर्धेच्या युगात आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या आव्हानात भावे स्कूलसारखी शाळा टिकून आहे. अनेक दिग्गज, नामवंत या शाळेचे माजी विद्यार्थी आहेत. शाळेबद्दल वाटणाऱ्या आत्मीयतेतूनच माजी विद्यार्थी शाळेला वेळोवेळी पाठबळ देत असतात. कै. प्रभाकर चानसरकर यांच्या स्मरणार्थ मिळालेली देणगी हे त्याचेच उदाहरण आहे.” 

कार्यक्रमाच्या सुरवातीला आपल्या प्रास्ताविकात श्री. गाडे यांनी, शाळेच्या माजी विद्यार्थ्यांकडून मिळत असलेल्या देणग्यांचा आढावा घेत त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. समाजातील दानशूर व्यक्तींच्या पाठबळामुळेच आजच्या आव्हानात्मक परिस्थितीत संस्था मराठी माध्यमाच्या शाळा चालवू शकत असल्याचे सांगितले. 

संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सचिन आंबर्डेकर यांनी कै. प्रभाकर चानसरकर यांच्या कार्याची ओळख करून दिली तसेच प्रमुख पाहुणे व उपस्थित मान्यवरांचा परिचय करून दिला. 

श्री. गाडे यांच्या हस्ते श्रीमती शिल्पा चानसरकर, श्री. खामकर आणि सौ. आनंदी पाटील यांचा सत्कार करण्यात आला. शाळेतील पर्यावेक्षिका सौ. भारती तांबे यांच्या हस्ते चानसरकर कुटुंबियांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या शेवटी शाळेचे मुख्याध्यापक श्री. रोहिदास भारमळ यांनी आभार प्रदर्शन केले.