सैनिकी शाळेच्या देविका ताडच्या विज्ञान प्रकल्पाची देशातील टॉप ६२ प्रकल्पांत निवड

नवी दिल्ली येथे नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या १२ व्या राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शन आणि प्रकल्प स्पर्धेत (INSPIRE Award MANAK) महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिक शाळेतील इयत्ता दहावी ‘अ’ मधील कॅडेट देविका ताड हिने सादर केलेल्या ‘Smart Automatic Official Seal or Stamp Machine’ या प्रकल्पाची देशातील सर्वोत्तम ६२ प्रकल्पांमध्ये निवड झाली. देशभरातून सहभागी झालेल्या एकूण ७२९ प्रकल्पांमधून देविका हिच्या प्रकल्पाची निवड झाली. दि. १२ ते १४ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत हे राष्ट्रस्तरीय विज्ञान प्रदर्शन संपन्न झाले.
नवी दिल्ली येथील भारत मंडपममध्ये काल (बुधवार, दि. १४ ऑक्टोबर २०२६) आयोजित करण्यात आलेल्या पारितोषिक वितरण समारंभात केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्या हस्ते देविकाचा ‘National INSPIRE Awardee’ म्हणून सन्मान करण्यात आला.
या वेळी केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे सचिव प्रो. उमेश वाघमारे, नॅशनल इनोव्हेशन फाऊंडेशन-इंडिया या संस्थेचे अध्यक्ष प्रो. अनिल सहस्रबुद्धे, सायन्स अँड टेक्नॉलॉजी कपॅसिटी बिल्डिंग डिव्हिजनचे प्रमुख डॉ. उमेश कुमार शर्मा, नॅशनल इनोव्हेशन फाऊंडेशन-इंडियाचे संचालक डॉ. अरविंद रानडे उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना डॉ. जितेंद्र सिंह यांनी, तरुण नवोन्मेषकांनी एखादे यश मिळाल्यानंतर त्यावर समाधान न मानता आपली कौशल्ये विकसित करत राहिले पाहिजे आणि नवीन ज्ञानाशी जुळवून घेण्याचा तसेच आपल्या आवडीच्या क्षेत्रांचा शोध घेण्याचा, विचारपूर्वक निर्णय घेण्याचा आणि प्रयोग व व्यावहारिक अनुभवाच्या माध्यमातून आपल्या कल्पनांमध्ये सातत्याने सुधारणा करत राहण्याचा सल्ला दिला.
या वर्षी देशभरातील विद्यार्थ्यांनी आपल्या नावीन्यपूर्ण वैज्ञानिक संकल्पना आणि संशोधनाधारित प्रकल्प सादर केले. त्यामध्ये देविका हिने सादर केलेल्या ‘स्वयंचलित अधिकृत शिक्का किंवा स्टॅम्प मशीन’ या प्रकल्पाने लक्षवेधी कामगिरी करत टॉप ६२ प्रकल्पांमध्ये स्थान मिळवले.
लहान वयापासून वैज्ञानिक दृष्टिकोन, सर्जनशीलता आणि नवोन्मेष यांना प्रोत्साहन देणे आणि दैनंदिन जीवनातील आव्हानांचे निरीक्षण करून त्यांचे व्यावहारिक उपाय विकसित करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरित करण्याच्या उद्देशाने भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या वतीने इ. ६ वी ते इ. १२ वी मध्ये शिकणाऱ्या देशभरातील विद्यार्थ्यांसाठी २०१७ सालापासून INSPIRE Award MANAK हा उपक्रम राबविण्यात येतो. या उपक्रमांतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या कल्पनांचे मॉडेल्स आणि संकल्पनेच्या पुराव्यासाठीचे प्रोटोटाइप विकसित करण्यासाठी सहाय्य केले जाते. तसेच, कार्यशाळा आणि तज्ज्ञ व अग्रगण्य तांत्रिक संस्थांशी संवाद साधण्याच्या संधींद्वारे त्यांना त्यांच्या प्रकल्पांमध्ये सुधारणा करण्याची संधी मिळते.
अतिशय उत्साहाच्या वातावरणात संपन्न झालेल्या पारितोषिक वितरण समारंभाची ही संक्षिप्त चित्रफित …
