आदिवासी बांधवांच्या मनातील संकल्प हाच विकासाचा प्रकल्प – पद्मश्री डॉ. बुधरी ताती

पुणे, दि. २३ : छत्तीसगडमधील बस्तरसारख्या नक्षलग्रस्त भागात आदिवासींच्या विकासासाठी कार्य करणाऱ्या ज्येष्ठ समाजसेविका पद्मश्री डॉ. बुधरी ताती यांचा मएसो रेणुका स्वरुप इन्स्टिट्यूट ऑफ करिअर कोर्सेस आणि मएसो रेणुका स्वरुप प्रशालेच्या वतीने आज (शुक्रवार, दि. २३ ऑक्टोबर २०२६) सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष प्रदीप नाईक यांच्या हस्ते आणि संस्थेच्या नियामक मंडळाच्या उपाध्यक्षा सौ. आनंदी पाटील यांच्या उपस्थितीत हा सत्कार करण्यात आला. या वेळी करिअर इन्स्टिट्यूटच्या समन्वयिका सारिका वाघ आणि रेणुका स्वरुप प्रशालेच्या मुख्याध्यापिका शुभांगी कांबळे व्यासपीठावर उपस्थित होत्या.
बस्तरसारख्या अतिमागास आणि नक्षलवादी कारवायांनी पोळलेल्या आदिवासी भागात अतिशय सामान्य कुटुंबात जन्म झालेल्या बुधरी ताती यांनी नक्षलवाद्यांच्या दहशतीला न जुमानता आपले शिक्षण पूर्ण केले. आपल्या आदिवासी बांधवांच्या विकासासाठी त्या १९८४ सालापासून कार्य करत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन केंद्र सरकारने या वर्षी पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला.

व्यक्तिनिर्माणाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून शिक्षण – स्वावलंबन – समाजसेवा या त्रिसूत्रीच्या आधारे भावजागरणाचे काम केल्याने आदिवासी बांधवांच्या मनात निर्माण झालेला संकल्प हाच आपला प्रकल्प आहे, भौतिक स्वरुपात कोणतीही वास्तू उभी केलेली नाही असे डॉ. बुधरी ताती यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले.
आपला जीवनप्रवास उलगडताना त्यांनी सांगितले की, वयाच्या १५ व्या वर्षी सामाजिक रिती बाजूला सारून घरातून बाहेर पडल्यानंतर अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रम आणि राष्ट्र सेविका समितीच्या माध्यमातून नागपूर येथे तीन महिने प्रशिक्षण घेतले. एक वर्षानंतर त्या आपल्या मूळ भागात परतल्या आणि एक वर्षभर भ्रमंती करत त्यांनी ५५५ गावांमध्ये संपर्क केला. त्यामुळे १२ महिला बुधरी ताती यांच्या कामाशी जोडल्या गेल्या. प्रचंड गरिबी असलेल्या अशिक्षित आदिवासी समाजातील ३०-४० वर्षांच्या सुमारे ५०० महिलांना त्यांनी साक्षर बनवले. शिक्षणाचे नाव काढल्यावर घराचे दार बंद करून घेणाऱ्या समाजबांधवांनी ताती यांच्या शिक्षणाच्या कामात सहभाग घेण्यास सुरवात केली. परिणामी अतिमागास असलेल्या बस्तरमधील अनेक जण आज विशेष पोलीस दलाबरोबरच विविध स्वरुपाच्या नोकऱ्या मिळवून स्थिरावले आहेत.
आरोग्यपूर्ण जीवनशैलीचा अंगीकार, आजारांवर औषधोपचार करून घेणे, व्यसनमुक्ती, कृषीविकास, वनोत्पादनांचा व्यवसाय, पर्यावरणाचे रक्षण आदी विविध पातळ्यांवर छत्तीसगडमधील आदिवासी भागात सुधारणा झाल्याचे डॉ. ताती यांनी विविध उदाहरणे देत स्पष्ट केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सौ. आनंदी पाटील यांनी केलेल्या प्रास्ताविकात, महिला सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी करत असलेल्या कार्याची माहिती दिली.
अध्यक्षीय भाषणात प्रदीप नाईक म्हणाले की, डॉ. बुधरी ताती यांच्या कार्यामुळे आदिवासी बांधवांमध्ये आत्मिक बळ निर्माण झाल्याने देशातील ७-८ राज्यांमधील नक्षलवादी कारवाया संपुष्टात आणण्यात केंद्र सरकारला यश मिळाले. डॉ. ताती यांनी सांगितलेल्या विविध घटना या “युद्धस्य कथा रम्याः” म्हणाव्यात अशा आहेत. त्यातून योग्य तो संदेश घेऊन आपण समाजाच्या विकासासाठी योगदान देऊ शकतो.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वृषाली लेले यांनी केले.
———————————-
फोटोओळी –
