“जीवनात यशस्वी होण्यासाठी अहंकार दूर ठेवा”
पुणे, दि. २१ : महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या विविध महाविद्यालयातील पदवी व पदव्युत्तर परीक्षेत शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये विविध विषयात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या १६ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव टाटा कॅपिटल लिमिटेडचे सी.एस.आर. आणि सस्टेनिबिलिटी विषयक सल्लागार श्रीधर सारथी यांच्या हस्ते आज (बुधवार, दि. २१ ऑक्टोबर २०२४) करण्यात आला. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली आणि संस्थेचे उपाध्यक्ष मा. श्री. प्रदीप नाईक यांच्या विशेष उपस्थितीत हा समारंभ पार पडला. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे आणि संस्थेचे सचिव डॉ. अतुल कुलकर्णी या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते. कोथरूडमधील मयूर कॉलनीत असलेल्या म.ए.सो. ऑडिटोरियममध्ये हा समारंभ आयोजित करण्यात आला होते.

या प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना श्रीधर सारथी म्हणाले, “आपली अंगभूत गुणवैशिष्ट्ये जपत सकारात्मक दृष्टिकोनातून जीवनाकडे बघा. नवनवीन गोष्टी जाणून घेण्याची उत्सुकता कायम ठेवत सातत्याने शिकत राहिले व त्यासाठी आवश्यक असलेला शिस्त राखली आणि अहंकारापासून स्वतःला दूर ठेवले तर जीवनात यशस्वी होता येते. स्वतःच्या ज्ञानाचा अहंकार होऊ न देता, अहंकार म्हणजे काय याचे ज्ञान होणे महत्वाचे आहे. परीक्षेमध्ये मिळालेल्या यशाबद्दल झालेला गौरव हा केवळ एक पुरस्कार नाही तर भविष्यात काय करायचे आहे याचा विचार करायला लावणारा समारंभ आहे. जीवनात पुढे जात असताना सातत्याने स्वतःचे मूल्यमापन करून स्वतःमध्ये सुधारणा करणे आवश्यक असते. यशाची मोजदाद करण्याचे विविध मार्ग आहेत, यश म्हणजे केवळ आर्थिक प्रगती नाही. आपल्याकडील ज्ञानाच्या आणि कौशल्याच्या आधारे समाजासाठी, देशासाठी आपण काय करतो यावर यश ठरते. जीवनात नवीन मार्ग अनुसरायचा प्रयत्न करा आणि त्यावर आपला ठसा उमटवा. सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या पुढे राहण्याची गरज आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता प्रश्नाचे उत्तर देऊ शकते पण योग्य प्रश्न केवळ मानवी मेंदूच विचारू शकतो. त्यामुळे समाजाच्या हितासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करा.”
या वेळी गौरवप्राप्त विद्यार्थ्यांच्या वतीने चार विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. महाविद्यालयातील प्राध्यापकांनी केलेले मार्गदर्शन आणि वेळोवेळी दिलेला पाठिंबा यामुळे परीक्षेत यश मिळाल्याचे सांगत त्यांनी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
समारंभाचे प्रस्ताविक करताना बाबासाहेब शिंदे यांनी विद्यार्थ्यांचे ज्ञान, परिश्रम, जिद्द आणि गुणांचा गौरव करण्यासाठी आणि पुढील पिढीतील विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी या हेतूने संस्थेतर्फे दरवर्षी विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात येत असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, शिक्षण क्षेत्रात मोठे बदल होत असताना कालानुरून शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या आपल्या परंपरेनुसार संस्थेने सुरू केलेल्या अभियांत्रिकी आणि कायदा महाविद्यालयांनी यशस्वी कामगिरी केली आहे. विकसनशील भारताची वाटचाल विकसित भारताच्या दिशेने होत असताना यापुढील काळात कौशल्यविकासाला प्राधान्य देण्यात येणार असून उद्योगजगताच्या गरजा पूर्ण करणारे शिक्षण देण्यात येणार आहे, त्यामुळे रोजगार देखील मिळू शकेल. विद्यार्थ्यांच्या यशात त्यांच्या पालकांचे आणि शिक्षकांचे देखील योगदान आहे. आपले संस्कार आणि मूल्य न विसरता आपल्या देशाच्या प्रगतीसाठी आपण काय करू शकतो याचा विचार विद्यार्थ्यांनी करावा. आपल्या ज्ञान-कौशल्याच्या आधारे मोठे व्हा आणि देशाचे नाव उज्ज्वल करा.
आपल्या अध्यक्षीय भाषणात एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) म्हणाले की, यश मिळवण्यासाठी संवादकौशल्य, नेतृत्वगुण, संघभावना आणि वेळेचे व्यवस्थापन यासारखी सॉफ्टस्कील्स आवश्यक असतात. त्याचबरोबर मूल्यव्यवस्था देखील महत्वाची असते. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या स्थापनेपासूनच शिक्षण आणि संस्काराची मूल्य संस्थेच्या सर्व शाळा-महाविद्यालयांमध्ये रुजलेली आहे. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात त्याचे विशेष महत्व आहे कारण तंत्रज्ञानाचा उपयोग कसा करायचा याचा निर्णय मानवी मेंदूच घेतो. सोशल मिडियाने आजचे जीवन व्यापले आहे. सेल्फी घेत असताना स्वतःचे स्थान निर्माण करायला मात्र विसरू नका.
संस्थेचे सचिव डॉ. अतुल कुलकर्णी यांची आभार प्रदर्शन तर प्रा. डॉ. तनुजा देवी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
