हरित शाळांची उभारणी, शिक्षकांचे सक्षमीकरण!

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या शाळांमधील शिक्षकांसाठी पूर्णम इकोव्हिजन फाऊंडेशनच्या सहकार्याने ‘हरित शालेय परिसर आणि शाश्वत शाळांसाठी साधनसामुग्रीचे प्रभावी व्यवस्थापन’ या विषयावर एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. पुण्यातील मएसो मुलांचे विद्यालयाच्या गुरुवर्य डॉ. प्र.ल. गावडे सभागृहात शनिवार, दि. ४ जुलै २०२६ रोजी झालेल्या या कार्यशाळेत चार जिल्ह्यातील २८ शाळांमधील १०० शिक्षक सहभागी झाले होते.
या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे सदस्य विजय भालेराव, संस्थेचे सचिव डॉ. अतुल कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन आंबर्डेकर, पूर्णम इकोव्हिजन फाऊंडेशनच्या संचालक सौ. अनुष्का काजबाजे आणि फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश माणेरीकर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छता, व्यवस्थितपणा व शिस्त हे गुण विकसित व्हावेत, त्यांच्यात सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण व्हावी आणि ते भविष्यात सुजाण व जबाबदार नागरिक व्हावेत या हेतूने संस्थेतर्फे दरवर्षी ‘स्वच्छ, सुरक्षित व पर्यावरणपूरक शाळा’ ही स्पर्धा घेण्यात येते. त्यामध्ये स्वच्छता, आरोग्य, सुरक्षितता, सुशोभीकरण, पर्यावरणपूरकतेसाठीचे प्रयत्न या निकषांच्या आधारे प्रत्येक शाळेचे मूल्यमापन करण्यात येते. शाळेतील अग्निशमन यंत्रणा व त्याची सिद्धता, विद्यार्थी वाहतुकीशी संबंधित खबरदारी व उपाययोजना अशा सुरक्षिततातविषयक मुद्यांचा देखील या वेळी विचार केला जातो.
मागील वर्षी शाळांच्या मूल्यमापनासाठी पर्यावरणाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या पूर्ण इकोव्हिजन या संस्थेचे सहकार्य घेण्यात आले. या संस्थेने स्पर्धेची गुणवत्ता वाढविण्यासाठी काही निकष नव्याने सुचवले. त्यामुळे ‘स्वच्छ, सुरक्षित व पर्यावरणपूरक शाळा’ ही स्पर्धा अधिक परिमाणकारक व्हावी या साठी शाळेतील शिक्षकांना प्रशिक्षण देण्याची आवश्यकता लक्षात घेऊन एक दिवसाची ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
या कार्यशाळेत संवादात्मक शिक्षणासोबतच निसर्गावर आधारित उपाययोजना आणि जुन्या किंवा टाकाऊ वस्तूंचा वापर करून उपयुक्त आणि आकर्षक वस्तू तयार करण्याच्या पद्धतींवर आधारित प्रत्यक्ष कृतींचा समावेश होता. कार्यशाळेत झालेल्या मुख्य सत्रांमध्ये डॉ. राजेश माणेरीकर यांनी ‘हरित शाळा लेखापरीक्षण (Green School Audit) : निष्कर्ष व तफावत’ याचे विश्लेषण मांडले. डॉ. मानवी सिंग यांनी ‘पर्यावरण शिक्षणाचा अभ्यासक्रमात समावेश आणि हरित शालेय परिसर विकसित करण्यासाठीच्या विविध कल्पना’ या विषयांचे दोन वेगवेगळ्या सत्रांमध्ये सविस्तर विवेचन केले. सौ. अनुष्का काजबाजे यांनी ‘ओला कचरा, पालापाचोळा आणि सेंद्रिय पदार्थांचे जिवाणूंद्वारे विघटन करून उत्कृष्ट खत तयार करण्याची नैसर्गिक प्रक्रिया व वनस्पतींसाठी उत्तम खत असलेल्या पर्यावरणपूरक आणि रसायनमुक्त सेंद्रिय द्रावणाचा वापर (कंपोस्टिंग व बायो-एन्झाइम्स)’ या विषयी माहिती दिली. कु. रोहिणी एस. यांनी टी-शर्टपासून टोट बॅग तयार करण्याची कृती दाखवली. तर ९० दिवसांच्या शालेय कृती आराखड्याची तयारी करण्याबाबत पूर्णम इकोव्हिजनच्या टीमने मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेचे वैशिष्ट्य म्हणजे कृतीकेंद्री समारोप. केवळ प्रमाणपत्र देण्याच्या पद्धतीऐवजी प्रत्येक सहभागी शाळेने स्वतःचा ९० दिवसांचा शालेय कृती आराखडा तयार केला. या आराखड्यामुळे कार्यशाळेतील शिकवण पुढील तीन महिन्यांत संबंधित शाळेच्या परिसरात प्रत्यक्ष अनुभवास येण्याजोग्या पर्यावरणपूरक उपक्रमांद्वारे त्वरित अनुसरणात येईल. राष्ट्रीय शिक्षण धोरण – २०२० मध्ये अशाच कृती अपेक्षित आहेत. कार्यशाळेत सहभागी झालेल्या शिक्षकांनी या वेळी आपेल मनोगत व्यक्त केले.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यशाळेच्या समारोपाचे सत्र झाले. या प्रसंगी नियामक मंडळाच्या उपाध्यक्ष सौ. आनंदी पाटील, नियामक मंडळाचे सदस्य विजय भालेराव आणि अजय पुरोहित, संस्थेचे सचिव डॉ. अतुल कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन आंबर्डेकर, पूर्णम इकोव्हिजन फाऊंडेशनच्या संचालक सौ. अनुष्का काजबाजे आणि फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश माणेरीकर उपस्थित होते.
मा. बाबासाहेब शिंदे यांनी या वेळी बोलताना, पर्यावरण रक्षणासाठी आणि हवामान बदलाच्या गंभीर परिणामांबद्दल समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल तसेच आपली शाळा ‘पर्यावरणपूरक व शाश्वत शाळा’ करण्याच्या निश्चयाबद्दल शाळा आणि शिक्षकांचे कौतुक केले.
या कार्यशाळेमुळे पर्यावरण शिक्षण प्रभावी करण्यासाठी आणि शालेय परिसरात शाश्वत, पर्यावरणपूरक पद्धतींना प्रोत्साहन देण्यासाठी सहकार्य करणारे एक प्रभावी व्यासपीठ निर्माण झाले.
