एक झाड लावू, पर्यावरणाचे रक्षण करू
पर्यावरण रक्षण आणि संवर्धन याचे महत्व लक्षात घेऊन महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने या वर्षी पालखी सोहळा तसेच रक्षाबंधन, गणेशोत्सव आणि दिवाळी हे सण पर्यावरणपूरक पद्धतीने साजरे करण्याचे आवाहन सर्वांना केले आहे. पर्यावरणपूरक वस्तूंच्या वापराबरोबरच स्वदेशी वस्तूंना देखील प्राधान्य देण्यात यावे अशी अपेक्षा आहे.
संस्थेच्या या उपक्रमाचा प्रारंभ आज (गुरुवार, दि. ९ जुलै २०२६) पालखी सोहळ्याच्या निमित्ताने करण्यात आला. संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांनी झाडाचे किमान एक रोपटे लावावे आणि त्याची निगा राखावी असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे. मएसो बाल शिक्षण मंदिर, भांडारकर रोड या शाळेचे माजी विद्यार्थी आणि मएसोचे मा. अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांच्या हस्ते आज शाळेच्या मैदानावर वृक्षारोपण करण्यात आले.
या वेळी बोलताना ते म्हणाले की आपल्या देशात झाडांची संख्या दरडोई २ ते ३ असण्याची गरज आहे पण प्रत्यक्षात दरडोई जेमतेम एक झाड आहे. महानगरांमध्ये झाडांपेक्षा इमारतींची संख्या कितीतरी जास्त आहे. त्यामुळे केवळ सावली कमी झाली आहे असे नाही तर पर्यावरणाकडे पुरेसे लक्ष न दिल्याने दुसऱ्या बाजूला आपल्या अन्नधान्याचे पोषणमूल्य कमी झाले आहे, त्याचा विपरित परिणाम माणसाच्या आरोग्यावर झाला आहे. त्यामुळे पर्यावरणाच्या रक्षण आणि संवर्धनाच्या दृष्टीने वृक्षारोपणाचा हा उपक्रम अभिनंदनीय आहे. संस्थेचे सर्व माजी विद्यार्थी त्यामध्ये सहभागी होतील अशी अपेक्षा आहे.
याप्रसंगी संस्थेच्या नियामक मंडळाचे मा. सदस्य श्री. विजय भालेराव, शाळेच्या शाला समितीच्या मा. अध्यक्षा सौ. मैत्रेयी देसाई, शाला समितीच्या मा. महामात्रा डॉ.अश्विनी पाटील, संस्थेच्या आजीव सदस्य मंडळाचे मा. सदस्य सौ. प्रणिता जोगळेकर आणि डॉ. अजिंक्य देशपांडे, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सचिन आंबर्डेकर, शाळेच्या मुख्याध्यापिका मोनिका खेडलेकर तसेच शाळेतील शिक्षक, कर्मचारीवर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.
Scroll to Top
Skip to content