मराठी भाषा गौरव दिन विविध कार्यक्रमांनी साजरा

ज्ञानपीठ पुरस्कार विजेते महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी, नाटककार, कथाकार, कांदबरीकार आणि समिक्षक विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिन २७ फेब्रुवारी हा दिवस दरवर्षी मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रात कुसुमाग्रज यांनी मोलाचं योगदान दिलं आहे. मराठी भाषेला ज्ञानभाषा म्हणून ओळख निर्माण करून देण्यासाठी त्यांनी अथक मेहनत घेतली. त्यामुळे मातृभाषेचा गौरव करण्यासाठी व कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिनवादन करण्यासाठी ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा करण्यात येतो.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या विविध शाखांमध्ये या निमित्ताने कार्यक्रम आयोजित करण्यात आले.

म. ए. सो. पूर्व प्राथमिक शाळेत मराठी भाषा गौरव दिनाचे महत्व विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना समजावून  सांगण्यात आले. विद्यार्थ्यांनी संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, स्त्री साक्षरतेचे महत्व पटवून देणारे सावित्रीबाई फुले आणि म. ज्योतिबा फुले, ताराबाई मोडक तसेच मराठी भाषेतील ज्येष्ठ साहित्यिक वि. वा.शिरवाडकर तथा कवि कुसुमाग्रज, पु. ल. देशपांडे, कवयित्री शांता शेळके  यांच्या व्यक्तीरेखा विद्यार्थ्यांनी या प्रसंगी सादर केल्या. या कार्यक्रमाला म.ए. सो. भावे प्राथमिक शाळेच्या उपमुख्याध्यापिका मा. सौ. वृषाली ठकार आणि आदर्श शिक्षिका मा. सौ. दीपाली कुलकर्णी यांना निमंत्रित करण्यात आले होते. सौ. दीपाली कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना खूप छान गोष्ट सांगितली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी दोन नृत्यगीते सादर केली. पसायदानाने या कार्यक्रमाची सांगता झाली.

कळंबोली येथील एम. ई. एस. पब्लिक स्कूलमध्ये ‘मराठी भाषा गौरव दिना’चा कार्यक्रम मोठ्या उत्साहात झाला.   महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांना मराठी भाषा दिवसाचे महत्त्व सांगितले. ह्या दिवसाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी समुहगीते सादर केली. तसेच विद्यार्थ्यांनी भाषणाद्वारे मराठी दिवसाचे महत्त्व सांगितले. अशाप्रकारे मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

मएसो आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या मराठी विभागातर्फे मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ज्येष्ठ अनुवादिका श्रीमती उमा कुलकर्णी यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. ‘माझा प्रवास’ (भाषांतर ते अनुवाद) हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता.