“मूल्य जपत आजच्या काळातील नवीन प्रश्न सोडविणे म्हणजे यश”
“यश म्हणजे मागच्या पिढीची नक्कल करणे नाही तर यश म्हणजे मूल्य जपत आजच्या काळातील नवीन प्रश्न सोडविणे. त्यादृष्टीने नवीन प्रश्न काय आहेत, नव्या समस्या काय आहेत हे ओळखण्यासाठी आवश्यक असलेले कुतुहल आत्मसात केले पाहिजे,” असा सल्ला मा. श्री. इंद्रनील चितळे यांनी विद्यार्थ्यांना दिला.
मार्च २०२६ मध्ये झालेल्या माध्यमिक शालांत व उच्च माध्यमिक परीक्षेत महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमधून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेले गुणवंत विद्यार्थी आणि म.ए.सो. ज्ञानवर्धिनी परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ काल (बुधवार, दि. ५ ऑगस्ट २०२६) आयोजित करण्यात आला होता. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. इंद्रनील चितळे (मॅनेजिंग पार्टनर, चितळे बंधू) उपस्थित होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) होते. संस्थेचे उपाध्यक्ष मा. श्री. प्रदीप नाईक यांची या वेळी विशेष उपस्थिती होती. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाच्या मा. उपाध्यक्ष सौ. आनंदी पाटील, संस्थेचे सचिव डॉ. अतुल कुलकर्णी व्यासपीठावर उपस्थित होते.
कोथरुडमधील मयूर कॉलनीतील म.ए.सो. ऑडिटोरियममध्ये झालेल्या या समारंभात माध्यमिक शालांत परीक्षेतील ६० व उच्च माध्यमिक परीक्षेतील ३० आणि म.ए.सो. ज्ञानवर्धिनी परीक्षेतील १६ यशस्वी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
चितळे पुढे म्हणाले, “कुतुहलाची भावना विकसित करायची असेल तर त्यासाठी मोकळेपणाने विचार केला पाहिजे. कल्पना, भावना आणि माहितीची देवाणघेवाण व्हावी यासाठी लोकांशी संपर्क आणि संवाद साधण्याचे कौशल्य असले पाहिजे आणि त्यातून निर्माण झालेली विश्वासार्हता कायमस्वरुपी टिकवून ठेवण्याची क्षमता निर्माण करता आली पाहिजे. याशिवाय गुणवत्ता कायम राखण्यासाठी काय केले पाहिजे याच्याकडेही लक्ष देण्याची आवश्यकता असते. कुतुहल, शिस्त, क्षमता वाढविणे, संवादकौशल्य यातच यशाचे गमक आहे.”
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना सौ. आनंदी पाटील म्हणाल्या की, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या माजी विद्यार्थ्यांची उज्ज्वल परंपरा आहे. या माजी विद्यार्थ्यांनी केवळ देशभरातच नव्हे तर जगातील अनेक देशात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. आपल्या यशातून त्यांनी आपले पालक, शाळा आणि संस्था यांचा नावलौकिक वाढविला आहे. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सध्याच्या विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनाची दिशा ठरवावी आणि भविष्यात नोकरी मागणारे न होता नोकरी देणारे होण्याचा प्रयत्न करावा.
आपल्या अध्यक्षीय भाषणात एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांनी संस्थेच्या संस्थापकांनी दिलेले संस्कार आणि मूल्ये यांच्या आधारे नवे विद्यापीठ स्थापन करण्यासाठी संस्था प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
डॉ. अतुल कुलकर्णी यांनी आभार प्रदर्शन केले.
सौ. राही भालेराव आणि सौ. माधवी बाबरस यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
Scroll to Top
Skip to content