Month: April 2023

म.ए.सो. ज्ञानमंदिर, कळंबोली व एम.ई.एस. पब्लिक स्कूल, कळंबोली या शाळेच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन आणि म.ए.सो. ज्ञानमंदिर प्रशालेच्या रौप्य महोत्सवी वर्षाचा सांगता समारंभ आज (शनिवार, दि. २९ एप्रिल २०२३) रोजी सकाळी १०.३० वाजता शाळेच्या प्रांगणात पार पडला. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे मा. अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला संस्थेचे मा. उपाध्यक्ष श्री. प्रदीप नाईक आणि संस्थेच्या नियामक मंडळाचे मा. अध्यक्ष आर्कि. राजीव सहस्रबुद्धे यांची विशेष उपस्थिती होती.

शाला समितीचे मा. अध्यक्ष व म. ए. सो.च्या नियामक मंडळाचे सदस्य श्री. देवदत्त भिशीकर, शाला समितीचे महामात्र डॉ. गोविंद कुलकर्णी, शाळेचे माजी महामात्र प्रा. वि. ना. शुक्ल, शाळेच्या माजी मुख्याध्यापिका सौ. सविता काजरेकर, माजी शिक्षक, माजी विद्यार्थी, पालक प्रतिनिधी , विद्यार्थी प्रतिनिधी तसेच समाजातील प्रतिष्ठित नागरिक, हितचिंतक आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मा. डॉ. गोविंद कुलकर्णी व त्यांच्या सौभाग्यवती माया कुलकर्णी यांच्या हस्ते गणेशपूजन करण्यात आले. त्यानंतर संस्थेच्या मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या हस्ते नवीन इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले. तसेच देवी सरस्वती व संस्थेच्या संस्थापकांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.

मा. श्री. देवदत्त भिशीकर यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले. ते म्हणाले की, भविष्यातील विद्यार्थी संख्येचा अंदाज घेऊन शाळेसाठी आवश्यक व्यवस्था निर्माण करण्यासाठी संस्थेने वेळीच पाऊल उचलले आहे आणि संस्था या पुढे देखील अशीच मदत करत राहील.

शाळेचे महामात्र डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले. ‘देखणी ती पाऊले ध्यासपंथी चालतात’ या उक्तीनुसार शाळेमध्ये सन्माननीय पदाधिकाऱ्यांची पावले पडल्यामुळे शाळा विकासाकडे वाटचाल करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

१९९७ साली शाळा सुरू झाली आणि तेव्हापासून शाळेचा आलेख वाढताच आहे. शाळेच्या या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेणाऱ्या ‘रौप्यधारा’ या स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

आर्कि. राजीवजी सहस्रबुद्धे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शाळेला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छां दिल्या.

मा. प्रदीप नाईक यांनी नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा अवलंब करत शाळा आणखी प्रगती करेल अशी आशा व्यक्त केली.

एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) या प्रसंगी बोलताना म्हणाले की, नवीन विद्यार्थी भरती करणे हा शाळेचा उद्देश नाही तर नवीन प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांमध्ये संस्कार व शिस्त रुजवणे हा उद्देश आहे आणि ही मोठी जबाबदारी शिक्षकांवर आहे.

आभार प्रदर्शन सौ. प्रियांका फडके यांनी तर सूत्रसंचालन सहा. शिक्षक श्री. दत्तात्रय म्हात्रे यांनी केले.

म.ए.सो. ज्ञानमंदिर शाळेतील गायक वृंदाने सादर केलेल्या संपूर्ण वंदे मातरमने या कार्यक्रमाची सांगता झाली.